आकार किंवा फॉर्म (Fundamentals of Art #3)

Tue, Jun 23, 2009

Fantastic 5, Grid

आकार किंवा फॉर्म (Fundamentals of Art #3)
This entry is part 3 of 7 in the series Fundamentals of Art

नमस्कार मंडळी,

आजचा विषय वरवर सोपा वाटला तरी तो समजायला मात्र तितकासा सोपा नाही. याचे एक कारण मराठी भाषाही असू शकेल, कारण बरेच अवघड शब्द आज वापरायला लागणार आहेत. अर्थात गरज भासेल तिथे इंग्रजीचा आधार घेऊच. चला तर मग, आज आपण आकार किंवा फॉर्म म्हणजे काय याची माहिती घेऊ.

कसं बरं सांगू? आकार ही संकल्पना थोडी काल्पनिक आहे, असं म्हणालात तरी हरकत नाही… कारण तुम्हाला माहित आहे की, शब्दाला आकार नसतो. पण कवी हा त्याच्या मनातील कल्पनांच्या साह्याने त्या शब्दांना किंवा कवितेला आकार देतो. आवाज किंवा सूर यांनाही आकार नसतो. पण जेव्हा पं. भीमसेन जोशींसारखा शास्त्रीय संगीत गाणारा गायक षड्ज लावतो तेव्हा त्या सूराला किंवा आवाजालाही एक आकार प्राप्त होतो. या सगळ्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला त्यातून सारखाच आकार किंवा फॉर्म दिसेल असं नाही. तो प्रत्येकाला वेगळाही दिसू शकतो.

व्हिज्युअल आर्टच्या बाबतीत विचार करताना मात्र हा आकार दृश्य स्वरूपात प्रकट होतो. उदाहरणार्थ चित्रकार हे रंग आणि रेषेच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनेला आकार देतात. वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांच्या मिश्रणाने चित्रकार वेगवेगळे आकार तयार करतात. रेषांना विशिष्ट आकार देऊन त्या आकारांद्वारे चित्रकार स्वतःच्या कल्पना व भावना चित्रात उतरवत असतो. वास्तूरचनाकार दगड, विटा, सिमेंट यांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पना साकार करतात.

या आकारांना विशिष्ट स्थान मिळाले किंवा या आकारांची विशिष्ट पद्धतीने रचना केली की, त्यांच्यातून विविध अर्थ प्रकट होऊ लागतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, जेव्हा चित्रातील अनेक आकारांमध्ये एक विशिष्ट परस्परसंबंध साधला जातो तेव्हा ते चित्र आपल्याशी बोलू लागते. अशा विविध आकारांची कौशल्यपूर्ण योजना करून अपेक्षित परिणाम साधणे, हीच चित्रकाराची खरी कसोटी असते. अर्थात हे अर्थही बऱ्याचवेळा व्यक्तीसापेक्ष असतात. या आकारांना रंगांची जोड मिळाली की, ते आकार अक्षरशः बोलू लागतात. त्यामुळे एखाद्या चित्रकृतीत आपले लक्ष आकार व रंग यांच्यावर खिळून राहते आणि त्यातून भावना निर्माण होते.

चित्रामध्ये या आकारांचा समतोल असणे फार महत्त्वाचे असते. समतोलाचे प्रकार आपण पुढच्या भागात बघू. उत्तम चित्रकृती त्यालाच म्हणतात की, ज्या चित्रात असे काही काम्पोझिशन केलेली असते की पाहणाऱ्याची दृष्टी ही संपूर्ण चित्रावर फिरते…चित्राचा एखादा भाग किंवा आकार इतर आकारांच्या मानाने अधिक उठावदार किंवा लक्षवेधक झाला तर पाहणाऱ्याचे लक्ष तिथेच खिळून राहते व चित्रातल्या बाकीच्या आकारांकडे दुर्लक्ष होते. परिणामी अपेक्षित परिणाम साधण्यात ते चित्र कमी पडते.

आकार म्हणजे व्याप्ती. मग ती द्विमितीय असो किंवा त्रिमीतीय असो. आकारामुळे त्या जागेला मर्यादा पडतात. या मर्यादा किंवा मर्यादा घालणाऱ्या बाह्यरेषा (Outline) म्हणजेच आकार. या आकाराचे ज्ञान आपल्याला त्याची लांबी, रुंदी, जाडी, खोली, दिशा यामुळे होते. एखादी वस्तू ही तीन फूट लांब, दीड फूट रूंद दोन फूट जाड असल्याचे सांगितल्यावर आपल्याला त्या वस्तूचा आकार कळतो.

या आकारांच्या साह्यानेच आपण चित्राची निर्मिती करतो, द्विमिती किंवा त्रिमितीचा भास निर्माण करतो. यांच्या साह्यानेच संकल्पचित्राची निर्मिती होते. संकल्पचित्र म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते, हेही आपण पुढच्या काही भागात बघू. बस्स. आज इथेच थांबतो… लवकरच भेटू… आणि हो, प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

Series Navigation«रेषांचे प्रकार (Fundamentals of Art #2)संकल्पचित्र निर्मिती (Fundamentals of Art #4)»

No related posts.

,

This post was written by:

Grid - who has written 29 posts on Fantastic Five.


Contact the author

1 Comments For This Post

  1. Subhash Says:

    आणखी एक उत्तम माहितीपूर्ण मालीका सुरू केल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro