जे अविद्याराती रुसोनियां।

Thu, May 21, 2009

Fantastic 5, Sudoku

जे अविद्याराती रुसोनियां।

जे अविद्याराती रुसोनियां।
गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां।
जो सुदिनु करी ज्ञानियां।
स्वबोधाचा।।

ज्ञानेश्‍वर माऊलींनी किती सोप्या शब्दांत सांगून ठेवलंय सगळं… फक्त ते आपल्याला कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही हेच खरं… कदाचित आतापर्यंत काहींच्या मनात प्रश्‍न उभा राहिला असेल, की आज हे काय? हा माणूस एकदम ज्ञानेश्‍वरांवर का घसरला? तर त्यामागे कारण आहे…

किस्सा कालचाच आहे. काम आटोपून, म्हणजे माझ्या हातातलं काम उरकून मी इतरांना त्रास देत भटकत होतो. (ही माझी शाळेपासूनची सवय. मधल्या सुटीत आपला डबा पटापट खायचा आणि इतरांच्या डब्यावर हात मारायला सुटायचं…) शेवटी एक भिडू सापडला आणि आम्ही कॅन्टीनला जाऊन बसलो. शेजारच्या टेबलवर जोरजोरात वाद सुरू होता. “अरे ते प्रोजेक्‍ट खरंतर माझं; पण त्या सम्याला मिळालं. याला काही अर्थय का? मी सिनिअर आहे…’ आता वाद सुरू झालाय, तो रंगतोय म्हटल्यावर आम्ही मागे थोडीच हटणार होतो? आम्हीही मग त्यात सामील झालो, अगदी साळसूदपणानं… “काय झालं काय? का वैतागलास एवढा?’
“काही नाही रे… तो प्रोजेक्‍ट मला मिळायला हवा होता. मी सिनिअर आहे; पण बॉसनं सम्याला दिला… हा माझ्यावर अन्याय नाही का?’
“जाऊ दे ना यार… त्यात काय एवढं. हा नाही तर दुसरा…’
“तसं नाही. प्रश्‍न तत्त्वाचा आहे.’
“ए… उगाच मोठे शब्द वापरू नकोस. तुला का हवा होता तोच प्रोजेक्‍ट…’
“अरे मी सिनिअर आहे…’
“खरं कारण सांग की… अरे तो प्रोजेक्‍ट हाती असणं म्हणजे ऑन साइट जाण्याचा चान्स… तो हुकला ना महाराजांचा…’
“म्हणून पेटलाय हो एवढा… जाऊ दे ना… हा नाही तर दुसरा प्रोजेक्‍ट मिळेल…’
“इथं बोंबाबोंब चाललीये कामाची. पूर्वीसारखं आहे का आता? आता पुढचं काम येणार कधी आणि मी जाणार कधी…’
“पण मित्रा ही काही तुझी पहिली संधी नव्हती. तू चार-पाचदा तरी जाऊन आला असशील… मग त्याला जाऊ दे की एकदा…’
“प्रश्‍न ऑनसाइट जाण्याचा नाही… बॉसनं काय सांगितलं माहितीये… त्याला या प्रोजेक्‍टची, या विषयाची चांगली माहिती आहे. तो टीमही चांगली लीड करतो. प्रोजेक्‍ट महत्त्वाचं आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला त्यांच्यावर इंप्रेशन पाडायलाच हवं आणि इथं तो कामाला येऊ शकतो. एकतर त्याला त्यांच्या देशाची चांगली माहिती आहे. त्यांच्या भाषेतले चार-दोन शब्दही तो बोलू शकतो. त्यांचे सणवार त्याला पक्के माहिती आहेत… तिथले कलाकार, सिनेमा, स्टेज, राजकारण अशा सगळ्यांची त्याला पुरेशी माहिती आहे. परवा आम्ही कॉलवर होतो, तेव्हा त्यानं त्यांच्यावर गारुडच करून टाकलं. बोलता बोलता तो त्यांच्या समजतील, एवढंच नाही तर त्यांना एंजॉय करता येतील, अशा कॉमेंट टाकत होता. त्यांच्या परंपरांशी त्याचा संबंध जोडत होता. कस्टमर खूष झालं. आमचं काम हाच उत्तम करेल, असं त्यांनी सांगितलं… म्हणून हा प्रोजेक्‍ट तोच हॅंडल करेल… आता मला सांगा, तुम्हाला काम नीट करून हवंय, की तुमच्या हवापाण्यावर गप्पा मारणारा माणूस हवाय? कामाच्या बाबतीत मी कुठं कमी पडतो का?’
“आयला पण तो भारीच आहे… एवढं सगळं कसं जमतं त्याला?’
“त्यात काय… कुठले कुठले क्‍लास लावत असतो ना तो… एवढी चांगली नोकरी आहे; पण शिकायची हौस काही संपत नाही… काय उपयोग आहे त्याचा?’
“तुला दिसला नाही उपयोग?’
“अरे वेड्या यालाच तर अपग्रेडेशन म्हणतात. आता तू मान्य करत किंवा नको करूस सम्या त्याच्या कामात पण चांगलाच आहे… याचाच अर्थ त्याच्या खात्यात जास्त मार्क जमा होतात… म्हणून त्याला प्रोजेक्‍ट मिळालं आणि तुला नाही…’

अर्थात हे काही त्याला पटणार नव्हतं. आम्ही त्याला धुमसतं ठेवून पुन्हा जागेवर येऊन बसलो. सम्याचं कौतुक वाटत होतं. लहानपणापासून आपण ऐकत असतोच ना… शिकत राहा… शिक्षण कधीच थांबत नाही. आपण ते ऐकून सोडून देतो. काहीजण मात्र खरोखरच शिकत राहतात. जे जमेल ते आणि जमेल तेवढं… सम्या त्यातलाच. कोणतंही शिक्षण कधीच वाया जात नाही म्हणतात… अर्थात सम्याचं शिक्षण डोळस होतं. तो आपले क्‍लायंट कोण, कोणकोणत्या देशांशी डील करायचं आहे, भविष्यात करावं लागेल, हे जाणून घेऊन ती ती माहिती गोळा करत होता. मनात साठवत होता. कायम अपडेट राहात होता… त्याच्या या स्वभावाचा ऑफिशियल लाइफमध्ये त्याला फायदा झाला. तसा तो पर्सनल लाइफमध्येही होत असणार…

वर ज्ञानेश्‍वरांची जी ओवी दिली आहे ना, ती तेच तर सांगते… अर्थात त्याचा अर्थ अधिक सखोल आहे. अविद्येवर रुसा, ज्ञानाच्या चांदण्या पचवा आणि स्वबोध घ्या… ज्ञानेश्‍वर माऊली आपल्याला स्वत:मध्ये डोकवायला सांगताहेत. त्यासाठी काय करायचं? तर दिसायला अगदी सोपा मार्ग… ज्ञानी व्हायचं… ज्ञानी माणूस अंतर्मुख होतो… तो आत डोकावू लागतो. तसं ज्या दिवशी होईल तो सुदिन…

आता हे आत डोकावणं वगैरे अवघड झालं; पण आपण किमान अविद्येवर रुसू तरी शकतोच ना? त्यासाठी अहं बाजूला ठेवावा लागेल… ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच शिक्षण का? आपण तसंच समजतो, म्हणून तर सम्याची टर उडवली जाते… त्याही पलीकडे पाह्यलं, की मार्ग दिसायला लागतात… हे मार्ग दिसले आणि आपण त्यावरून चालू लागलो, की ज्ञानचांदणिया हसतातच!

No related posts.

, ,

This post was written by:

Sudoku - who has written 45 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro