- नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)
- व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #3)
- प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न (Paul Buchheit)
- लाँग लिव्ह ‘वेब’! (Tim Berners-Lee)
- एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)
- इन्स्पायर्ड बाय पीपल (Axel Meyer)
गुगल, याहू, मायस्पेस, फेसबुक, क्रेग्जलिस्ट आणि अशा असंख्य साईट्स आपण रोज पाहतो. त्यांच्या प्रगतीबद्दल चर्चा करतो. त्यांच्या वार्षिक कमाईचे आकडे बघून थक्क होतो आणि जग कुठे जाणार याच्या विचारात दंग होतो. जगाच्या एका कोपऱ्यात बसून अख्खे जग बोटावर नाचवणाऱ्या या साईट्स तयार करणाऱ्यांना आणि त्या इथपर्यंत आणणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच; पण हा सगळा डोलारा ज्यावर उभा आहे त्या ‘वर्ल्ड वाईड वेब’च्या निर्मात्याला खरंच सलाम करावा लागेल. आज सगळ्यांच्या तोंडी असलेले डब्लूडब्लूडब्लू, यूआरएल सारख्या संकल्पनांच्या निर्मितीचे बीज रोवल्याला मार्च २००९ मध्ये वीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या सगळ्या संकल्पनांचे जनक टिम बर्नर्स-ली यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल जाणून घेऊयात.
‘जल्द ही होगा धरती का विनाश,’ अशा बातम्यांनी गेले वर्ष गाजवलं. ‘पार्टिकल फिजिक्स’मधील सर्वांत मोठी प्रयोगशाळा ‘सर्न’तर्फे (CERN) विश्वनिर्मितीचा शोध घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘लार्ज हायड्रॉन कोलायडर’ (एलएचसी) प्रकल्प अंतिम टप्प्यात अाला होता. त्यातील ‘एलएचसी’ प्रत्यक्षात कार्यरत होणार होता आणि त्यामुळे जगबुडी होणार असा निष्कर्ष सगळ्यांनी (अर्थात भारतातील प्रसारमाध्यमांनी) काढला होता. सांगायचा मुद्दा एवढाच की, एवढा मोठा प्रकल्प हाताळणाऱ्या ‘सर्न’ या संस्थेचे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले होते. ‘पार्टिकल फिजिक्स’ वगैरे विषयांमध्ये सर्वसामान्य लोकांना फारसा रस नसल्याने ते त्याकडे सहसा वळत नाहीत. ‘जल्द ही होगा धरती का विनाश…’ असं तिखट-मीठ-मसाला लावून सांगितलं की या बातम्या वाचल्या जातात. पण त्यामुळे विनाकारण भीतीचे वातावरण पसरते आणि प्रकल्पाशी संबंधित संस्थांचे नाव खराब होते. असो.
तर या प्रकरणामुळे तुम्हाला ‘सर्न’ हे काय प्रकरण आहे याची थोडीबहुत कल्पना असेल. कम्युनिकेशनची व्याख्या बदलून टाकणाऱ्या ‘वर्ल्ड वाईड वेब’चा उगम याच ‘सर्न’मधून झाला. टिम बर्नर्स-ली ही २९ वर्षीय ब्रिटिश व्यक्ती त्यावेळी (१९८९) ‘सर्न’मध्ये सल्लागार म्हणून काम करत होती. ‘सर्न’ ही शास्त्रज्ञांची पंढरीच. त्यामुळे तिथे जगभरातून विविध शास्त्रज्ञ येऊन विविध विषयांचा अभ्यास करत असे. येणारा प्रत्येक जण आपापले कॉम्प्युटर आणून त्यात विविध प्रकारची माहिती साठवून नेत असे. हे कॉम्प्युटर ‘सर्न’च्या सिस्टिमशी कम्पॅटिबल नसत. त्यामुळे अशा शास्त्रज्ञांना मदत करणे ही ‘सर्न’साठी एक मोठी डोकेदुखी बनली होती. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी टिम उत्सुक होता. पण या विषयाची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे अभ्यासाअंती त्याच्या लक्षात आले. ‘सर्न’ला भेट देणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कॉम्प्युटर्सची कम्पॅटिबिलिटी तपासणे, एवढ्यावर हा प्रकल्प थांबवण्यासारखा नव्हता; तर शास्त्रज्ञांना हवी असलेली माहिती व त्यांनी संशोधनानंतर मांडलेले निष्कर्ष जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून अॅक्सेस करता यावे यासाठी काहीतरी प्रणाली तयार करणे गरजेचे होते. टिम यांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. अर्थात त्यासाठी त्यांनी दैनंदिन कामाव्यतिरिक्त वेळ खर्च करावा लागणार होता. तसा वेळ मिळावा, अशी मागणी त्याने ‘सर्न’च्या व्यवस्थापनाकडे केली. त्यासोबत त्यांनी आपल्याला नेमके काय करायचे आहे याचा प्रस्तावही मार्च १९८९ मध्ये व्यवस्थापनाकडे सादर केला. ‘सर्न’च्या व्यवस्थापनाने त्यांना तशी परवानगी दिली. आज व्यावसायिक झालेल्या इंटरनेटचे बीज इथेच रोवले गेले. पुढे १९९० मध्ये रॉबर्ट कॉल्यू या सहकाऱ्याने टिमच्या सोबतीने या प्रकल्पावर काम करण्यास सुरवात केली.
ठरवल्यानुसार १९९० च्या अखेरपर्यंत टिम आणि रॉबर्ट यांनी यासाठी लागणारी प्रणाली तयार केली. यासाठी टिमने तीन संकल्पनांचे एकत्रीकरण केले. शास्त्रज्ञांच्या आणि ‘सर्न’मधल्या प्रत्येक रिसर्च डॉक्युमेंटचा एक विशिष्ट ग्लोबल अॅड्रेस असला पाहिजे, असे टिमचे म्हणणे होते. हा ग्लोबल अॅड्रेस म्हणजे ‘यूआरएल’ अर्थात ‘युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर’ किंवा साध्या भाषेत सांगायचे झाले तर लिंक. त्यानंतर टिमने ‘एचटीएमएल’ अर्थात ‘हायपर टेक्स्ट मार्क अप लँग्वेज’ ही संकल्पना विकसित केली. वेबदुनियेची भाषा म्हणून आज ‘एचटीएमएल’ सुपरिचित आहे. टेक्स्ट लिंक्स, इमेजेस आदी गोष्टींसाठी टिमने ‘एचटीएमएल’चे साह्य घेतले. इंटरनेटचे कनेक्शन असल्यास या दोन गोष्टींच्या साह्याने जगातील कोणत्याही कॉम्प्युटरवर ही रिसर्च डॉक्युमेंट्स पाहता येणे शक्य होणार होते. त्यासाठी टिमने ‘एचटीटीपी’ अर्थात ‘हायपर टेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल’ नावाने एक नियमावली तयार केली. ‘यूआरएल’, ‘एचटीएमएल’ आणि ‘एचटीटीपी’ या तीन संकल्पनांमुळे आज तुम्ही-आम्ही एकमेकांशी संवाद साधू शकतो.
टिम आणि रॉबर्ट यांनी हे सगळं ‘सर्न’ आणि तेथे येणारे शास्त्रज्ञ यांना डोळ्यासमोर ठेवून केले होते. आता या कल्पनेचे सार्वत्रिकीकरण करणे गरजेचे होते. त्यासाठी रॉबर्ट आणि टिम यांनी या प्रणालीचे ‘वर्ल्ड वाईड वेब’ असे नामकरण केले. हे ‘वर्ल्ड वाईड वेब’ म्हणजेच ‘डब्लूडब्लूडब्लू’ - ज्याच्याशिवाय आज आपला दिवस सुरू होत नाही आणि रात्र संपत नाही. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ‘फेसबुक’वर स्टेटस मेसेज अपडेट करणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये निश्चित असेल! असो.
सर्वसामान्य लोकांनी वेबकडे एक ‘सोशल मीडियम’ म्हणून पाहावे व त्याच हेतूने याचा वापर करावा, अशी टिमची इच्छा होती. ‘सोशल नेटवर्किंग’ने धारण केलेले वटवृक्षाचे रूप पाहिल्यानंतर टिमच्या दूरदृष्टीची कल्पना येते. ‘वर्ल्ड वाईड वेब’ वापरण्यासाठी लोकांना कोणत्याही क्लिष्ट कॉम्प्युटर कोडशी खेळावे लागू नये या हेतूने टिम आणि रॉबर्ट यांनी ‘वर्ल्ड वाईड वेब’ या नावानेच जगातील पहिले ‘वेब ब्राऊजर’ तयार केले. २५ डिसेंबर १९९० रोजी टिम आणि रॉबर्ट यांनी जगातील पहिली वेबसाईट http://info.cern.ch लाँच केली. रॉबर्ट हा जगातील पहिला वेब सर्फर मानला जातो.
वेबचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी टिम आतुर होती. अख्खे जग पालथे घालत टिमने आपल्या कल्पनेचे पुरस्कर्ते तयार करण्याचे काम केले. दरम्यान, एलिनॉय विद्यापीठात शिकत असलेल्या मार्क अँडरसन या विद्यार्थ्याशी त्यांची गाठ पडली. मार्कने एरिक बिना या आपल्या सहकाऱ्याच्या सोबतीने टिमच्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ साठी ब्राऊजर तयार करण्याचे ठरवले. यातून १९९३ मध्ये ‘मोझाईक’ या वेब ब्राऊजरचा जन्म झाला. पुढे ‘मोझाईक’चे रुपांतर ‘नेटस्केप’ या पहिल्या व्यावसायिक ब्राऊजरमध्ये झाले. येथून खऱ्या अर्थाने ‘वर्ल्ड वाईड वेब’चा प्रसार होण्यास सुरवात झाली. ‘नेटस्केप’ने ब्राऊजर पॅकेज असलेल्या सीडीज पोस्टाने पाठवून याचा प्रसार केला. पुढे ‘अमेरिका अॉनलाईन’ने (एओएल) ‘नेटस्केप’चे संपादन केले. पण तोपर्यंत ‘मायक्रोसॉफ्ट’चे ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’ही बाजारात आले होते. ब्राऊजरचे हे युद्ध आजही सुरूच आह; पण या युद्धात सातत्याने वेबचा आणि ग्राहकांचा विजय होत आलाय.
‘वर्ल्ड वाईड वेब’चा प्रसार करण्यात सर्नला काहीच रस नव्हता. ‘सर्न’च्या दृष्टीने टिमने दिलेला प्रकल्प वेळेत आणि यशस्वीरित्या पूर्ण केला होता. त्यामुळे टिमने वेबच्या विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून १९९४ मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजीतील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या मदतीने ‘वर्ल्ड वाईड वेब कन्सॉर्शियम’ची स्थापना केली. या कन्सॉर्शियममध्ये टिम संचालक म्हणून कार्यरत आहे. ‘वर्ल्ड वाईड वेब’चे स्टँडर्ड्स ठरवण्यासाठी हे कन्सॉर्शियम काम करते. अॅडोबी, अॅपल, मायक्रोसॉफ्टसह जगभरातील सुमारे ३९१ कंपन्या या कन्सॉर्शियमचे सभासद अाहेत.
१९९० च्या मध्यावर वर्ल्ड वाईड वेबच्या माध्यमातून इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोचलं होतं. पण इंटरनेटची सुरवात त्या अगोदर वीस वर्षांपूर्वी झाली होती. लष्करातील बड्या अधिकाऱ्यांना एकमेकांशी संपर्कात राहून माहितीची देवाणघेवाण करता यावी यासाठी अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी अर्थात ARPA ने APRANet नावाने अशी सोय उपलब्ध करून दिली होती. हे ARPANet म्हणजेच आद्य इंटरनेट! रॉबर्ट कान नावाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरने ही प्रणाली उभा करण्यात मोलाचा हातभार लावला होता. पुढे रॉबर्टने व्हिन्सेन्ट सर्फ नावाच्या सहकाऱ्याबरोबर इंटरनेट आणि इतर तत्सम नेटवर्कसाठी कम्युनिकेशन प्रोटोकॉल तयार करून त्यांची ARPANet शी सांगड घातली. TCP/IP (ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल) या नावाने हे प्रोटोकॉल प्रसिद्ध आहेत.
टिमची आई आणि वडील दोघेही गणितज्ञ होते. मँचेस्टर विद्यापीठाने तयार केलेल्या ‘मार्क १’ या जगातील पहिल्या व्यावसायिक कॉम्प्युटरच्या निर्मितीमध्ये या दोघांचाही सहभाग होता. त्यामुळे टिम अगदी लहानपणापासूनच कॉम्प्युटरच्या जगात वावरत असे. या बाप-लेकातील संवाददेखील बहुतांशवेळा कॉम्प्युटरशी संबंधितच होत. अशा या संवादांतूनच टिमला स्फूर्ती मिळत गेली आणि आज त्याच्या आविष्कारामुळे जग खऱ्या अर्थान ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले आहे. लाँग लिव्ह वेब, लाँग लिव्ह टिम!
No related posts.


April 20th, 2009 at 4:11 pm
‘यूआरएल’, ‘एचटीएमएल’ आणि ‘एचटीटीपी’ या तीन संकल्पनांमुळे आज तुम्ही-आम्ही एकमेकांशी संवाद साधू शकतो. :O You have not even mentioned TCP/IP protocol stack or ISO OSI model…
April 21st, 2009 at 12:21 am
Thanx Sameer for pointing that out. I will surely add info @ ARPAnet and TCP/IP…Thanx again for valuable addition.
April 23rd, 2010 at 9:58 am
Thank you for sharing this. Well done and very informative.