साधारण दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घरगुती कार्यक्रमाला गेलो होतो. एक आजी आपल्या नातवाला अडगुळं मडगुळं म्हणत हसवत होती… ते दृश्य खरोखरच छान होतं; पण त्या गाण्याचा अर्थ काही लागत नव्हता. शेवटी आजींनाच विचारलं… “आजी या अडगुळं मडगुळंचा अर्थ काय गं?’
“तसा काही अर्थ नाही रे त्याला. बाळाला तीट लावताना काहीतरी म्हणायचं एवढंच! असं काहीतरी म्हटलं, की पोरं छान खुदकन हसतात…’
त्यानंतर लहान मुलांच्या संगोपनावर असलेलं एक पुस्तक पाहिलं. त्यातही हे गाणं होतं. गाण्यानंतर लेखिकेनं लिहिलं होतं, “बाळाला आंघोळीनंतर तीट लावताना हे गाणं म्हणावं. नेहमी म्हटल्यानंतर बाळाला सवय होते. त्याचा कान तयार होतो आणि ते खुदकन हसतं!’
या दोघींच्याही दृष्टीनं बाळ हसणं महत्त्वाचं होतं. त्यात वावगं काहीही नाही म्हणा. हसणारं बाळ गोंडसच दिसतं… पण तरीदेखील काहीतरी खटकत होतं. अशा निरर्थक ओळी आपण वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या का म्हणत असतो, हा प्रश्न काही मनातून जात नव्हता. बाळ हसण्यासाठी असं एखादं निरर्थक गाणं का तयार केलं असेल कोणी?
एके दिवशी अचानकच “कुटुंब रंगलंय काव्यात,’ हा कार्यक्रम करणाऱ्या विसुभाऊंशी गाठ पडली. मी एकाशी गप्पा मारत बसलो होतो. त्याचे हे मित्र… ते आल्यावर गप्पा अधिकच खुलल्या. त्यांनी बहिणाबाईंच्या अनेक कविता अगदी छान समजावून सांगितल्या, “कवितांमधून एखादी गोष्ट किती छान पद्धतीनं समजावून सांगितलेली असते. एखाद्या गोष्टीचे कितीतरी पदर उलगडून दाखविलेले असतात… कविता मनातून येते, त्यामुळे ती जास्त भिडते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच काव्य जगत असतात. त्यांना त्याची जाण नसते एवढंच! तुम्ही जरा विचार करा. अगदी पाळण्यातल्या बाळासाठीदेखील वेगवेगळी गाणी गायली जातात. त्यातून त्याला वेगवेगळे संदेश दिले जातात. ते ऐकत ऐकत ते बाळ मोठं होतं तेव्हा ते कवितेशी, गाण्याशी कायमचं जोडलं गेलेलं असतं…’ विसूभाऊ मनापासून बोलत होते.
“तुम्ही म्हणता ते खरं. बाळाच्या जन्मापासूनच गाण्याचा संस्कार होतो; पण मग बाळांसाठी काहीतरी निरर्थक गाणी वर्षानुवर्षे का गायली जातात?’ मी विचारलं.
“निरर्थक? कोणती? हां कधीकधी आई, आजी काहीतरी म्हणतात, ते बाळाला रमविण्यापुरतं. पण बाकीच्या गाण्यांना छान अर्थ आहेत.’
“आहो, ते अडगुळं मडगुळं नाही का म्हणत तीट लावताना… त्याला काय अर्थय सांगा बरं…’
“तुम्हाला ते गाणं माहीत नाही म्हणून म्हणताय… तुम्हाला पाठ आहे ते? असेल तर जरा म्हणा पाहू…’
“अडगुळं मडगुळं, सोन्याचं कडगुळं,
रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट लावू…
“आता तुम्हीच सांगा मला. अडगुळं म्हणजे काय, मडगुळं म्हणजे काय आणि सोन्याचं कडगुळं म्हणजे काय?’
“काय झालंय माहिती आहे का… आपल्याकडे खूपसाऱ्या गोष्टींचे अपभ्रंश होत गेले आहेत. त्यामुळे या सुंदर ओळी तुम्हाला निरर्थक वाटतात. या ओळींतून बाळाला गोलाकार समजावून दिला आहे. तोदेखील वेगवेगळ्या उदाहरणांसकट… या ओळी ऐकल्यानंतर बाळाच्या डोक्यात गोल या शब्दाचा अर्थ अगदी फिट्ट बसतो… थांबा मी तुम्हाला मूळ ओळी सांगतो…
आड गोल, माड गोल, सोन्याचं कडं गोल
रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट लावू…
आलं लक्षात. तुम्ही कधी आड पाहिला आहे का? गावाकडे असतात. विहिरीपेक्षा लहान. तो गोल असतो. माड गोल असतो. सोन्याचं कडंही गोल असतं. रुप्याचा वाळा, म्हणजे चांदीचं पायातलं तेही गोल असतं आणि बाळाला लावण्यात येणारी तीटही गोल असते… गोल हा आकार बाळाला किती छान प्रकारे समजावून सांगितलाय बघा… पुढे कधीतरी त्याचा अपभ्रंश होत गेला आणि हे अडगुळं मडगुळं जन्माला आलं. त्याचं मूळ शोधण्याचा कोणी कधीच प्रयत्न केला नाही, हे दुर्दैव बाकी काय…’
विसूभाऊंचं बरोबर होतं ना… आपण अनेक गोष्टी पाहात असतो, वाचत असतो, ऐकत असतो… काहीवेळा अपरिहार्यतेनं त्या पाठ करतो किंवा आपोआपच डोक्यात जाऊन बसतात. त्यांचं मूळ शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही आणि त्यापेक्षा मोठ्या आनंदाला मुकतो… नात्यांचंही असंच असतं म्हणा… बऱ्याचदा आपण अपभ्रंशातच रमतो आणि शुद्धतेचा निखळ आनंद मिळविण्यापासून वंचित राहतो. कधीतरी एकदा तेही तपासून पाहायला हवं. मुळं शोधायला हवीत…
Related posts:


May 8th, 2009 at 6:29 am
सुडोकु, छान पोस्ट! तुझ्या माहितीत आणखी एक भर घालतो…कठोर आणि मृदु स्वर यात मृदु स्वर बाळांना जास्त आवडतो…क, ठ, ट यापेक्षा, ग, ड वगैरे जास्त छान. द्सरं म्हणजे भावना व्यक्त करतांनाही आपला कल मृदु स्वरांकडे जास्त असतो. आड गोल यापेक्षाही अडगुळं हे अधिक मृदु. बाळांसाठी (आणि लाडाने बोलतांना) यापद्धतीने अनेक अपभ्रंश झाल्याचे दिसून येईल…
May 8th, 2009 at 8:15 am
छान माहीती. मलाही बऱ्याच गाण्यांचे अर्थ माहीत नाहीत, आणि खरं तर तो जाणुन घेण्याचा प्रयत्न ही केला नाही.
May 9th, 2009 at 8:29 am
mast hoti hi mahiti !
May 20th, 2009 at 8:46 am
विश्वनाथ खैरे यांच अडगुल-मडगुल नावाचं एक पुस्तक आहे. ही कविता वा ओळी तमिळ भाषेतल्या काही शब्दांवरून कशा मराठीत आल्या याची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.
May 27th, 2009 at 8:38 am
my thoughts on this topic are different. I think purpose of these meaningless songs are to make sure baby should listen lots of word in a language and try to imitate it.
So that baby will start speaking early. In almost all languages, we are having such a songs e.g. Hickory Dickory Dock, (English)
June 5th, 2009 at 11:17 am
khoop chhan mahiti ahe hi. Ajunahi kahi ganyanche artha wachayala nakkich avadel. Dhanyawad.
September 8th, 2009 at 1:19 am
खुपच छान. हा प्रयोग मी माझ्या मुलिच्या बाबतीतही केला होता. या दोन ओळींमुळे अनेक उद्देश सफ़ल झाले होते.
१- तिला छान ऐकू येतं हे समजलं
२-परिचित हसण्यामुळे तिला समजतंय आणि मजा येतेय हे संमजलं
३-हे सगळे शब्द लडिवाळ असल्यानं तिलाहे म्हणायला मजा यायची
४-सर्वात महत्वाचं म्हणजे तीट लावताना ती शांत रहायची,