मी, बायको आणि भांडण…

Sat, Jun 27, 2009

Fantastic 5, Sudoku

मी, बायको आणि भांडण…

काल आम्ही दोघं बोलत होतो. विषय भांडणांचा होता. बायको म्हणाली, पूर्वी तू माझ्याशी एवढा भांडत नव्हतास. तिनं चक्क पाच वर्षांचा हिशेबच काढला. पहिल्या वर्षी अजिबात भांडण झालं नाही. थोडेफार चिडवाचिडवीतून खटके उडाले असतील-नसतील; पण ते सारं मजेमजेनंच होतं. दुसऱ्या वर्षीही तशी भांडणं झाली नाहीत. तिसऱ्या वर्षी थोडीफार. आणि गेलं वर्षभर मी पाहते आहे, दर दोन-तीन दिवसांनी भांडतोस तू माझ्याशी… काय झालंय मलाच समजत नाही… लेकीवरही खूप वैतागत असतोस. काल रात्री तिला चक्क फटके दिलेस. तिच्या त्रास देण्यापेक्षा ना मला तुझीच भीती जास्त वाटते… लहान आहे ती अजून. तुझ्या रागामुळे एखाद्या दिवशी काहीतरी होऊन बसायचं…

ऐकून मीच हादरलो. मी तर अजिबात भांडकुदळ नाही. मला रागही खूप कमी येतो, असं मी समजत होतो. कालच्या चर्चेनं थोडासा अंतर्मुख की काय म्हणतात, तो झालो. मग लक्षात आलं, आजकाल खरोखरच खटके जरा जास्तच उडायला लागले आहेत. तिला कळत नाही, तिला कुठे काय बोलावं हेच समजत नाही, असं काहीसं वाटत असतं मला. दरवेळी खटका उडाल्यानंतर ती तेव्हा तशी का वागली, हे उशिरानं लक्षात येतं आणि स्वत:चीच चूक जाणवत राहते… लेकीच्या बाबतही असंच होतं. एकतर ती रात्री 12 शिवाय झोपत नाही. माझे डोळे मिटायला लागलेले असतात आणि तिला खेळायची हुक्की येते. आधी थोडावेळ ती लाडीगोडी लावते… तरीही मी उठलो नाही की चक्क आक्रमणच करते. बोचकारणं तर रोजचंच झालंय… मग संताप येतो मला. कधीकधी तो अगदी डोक्‍यात जातो… कदाचित आपण असं वागलो की हा खेळायला येईल. किमान डोळे उघडून आपल्याकडे पाहील, असं काहीतरी वाटत असावं तिला… पण नेहमीप्रमाणे माझं हे उशिराचं शहाणपण आहे. सकाळी उठलं की मलाच कसंतरी वाटतं. त्यात ती कुशीत येऊन झोपते, तेव्हा तर इतकं गिल्टी वाटतं की विचारू नका… बाप म्हणूनही मी कमी पडतो आहे की काय…

बायकोच्या बाबतीतही तोंड उघडायच्या आधी या गोष्टी का जाणवत नाहीत, हेच समजत नाही. दुसरी बाजू का दिसत नाही? आधी आपण तोंड चालवून मोकळं व्हायचं… नंतर चूक लक्षात येते. तेव्हाही लगेच सॉरी वगैरे म्हणण्याची पद्धत नाहीच आपल्याकडे… कधी सुधारणार आहे मी… अक्षरश: हताश झालो मी. आता मात्र सुधारायचं ठरवलंय… आधी ऑफिसमधले, बाहेरचे ताण-तणाव, ओढाताण असे सगळे पर्याय आणि कारणं स्वत:लाच देऊन झालीत. पण ती सारी स्वत:च्याच मनाची समजूत आहे, हे लक्षात आलंय. आपलं वागणं चुकतंय, आपणच सुधारायला हवं, हेच खरं…

उजेड पडलाय हेही कमी नाही ना… काही दिवसांतच रिझल्ट समजेल…

No related posts.

, ,

This post was written by:

Sudoku - who has written 45 posts on Fantastic Five.


Contact the author

2 Comments For This Post

  1. nilesh Says:

    aatmachintanachya fairi zadalyat ……..hehi kahi kami nahi.haluhalu hoil sudharana.

  2. Chintu Says:

    He asa sagalyanchach hot asata tyat kahi navin nahi. Thodyafar farakane asech. Mala vatate ki lahan mulanvar chidanyat kahi arth nahi.
    Tyana babach have asatat tyanchyashi khelayala.
    Thode samajun ghyayacha prayatna karava.

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro