कविता स्टेटस मेसेजच्या (Updated)

Thu, Nov 12, 2009

Fantastic 5, Sudoku

काय आहे, काही दिवसांपूर्वी ही एक सवय जडली. आपला स्टेटस मेसेज आपलाच असावा, ही त्यामागची भावना. मग सकाळी जे काही डोक्यात असेल ते खरडून ठेवायला लागलो. कधी दोन अोळी, कधी चार अोळी, कधी सहा अोळी, तर कधी एखादा शेर. मनात येईल तसं लिहिल्यामुळे या अोळींना आधी प्रेम, मग तत्वज्ञान असा कोणताही क्रम नाही. त्या त्या दिवसाच्या मूडच्या या अोळी आहेत.
या अोळी खूप दर्जेदार आहेत, मनामनांत स्थान मिळविणाऱ्या आहेत, असा कोणताही दावा मी करत नाही. तेवढी पात्रताही नाही. कारण मुळात आम्ही कवडे… एखादी रचना स्वतःलाच आवडावी. स्वतः स्वतःवर खूष व्हावं आणि त्याच आशयाची दुसरी एखादी कविता वाचून दाणकन जमिनीवर आपटावं, हा योग आमच्या आयुष्यात वारंवार येतो. खरंतर इतक्या प्रतिभावान कविंनी एतकं प्रतिभावान काव्य निर्माण करून ठेवलं आहे, की त्या सोन्याच्या काव्यराशीवर आपण आपली मातीची चिमूट का टाकावी, असा प्रश्नही मनात उमटतो. पण करणार काय, आम्ही तो जातीवंत आगाऊ… पु.ल. देशपांडे यांच्या असा मी असा मी मध्ये त्यांच्या काकांचं वर्णन आहे. ते कीर्तनकार. कीर्तनात ते ज्ञानेश्वरांचा अभंग वारंवार सांगायचे…

राजहंसाचे चालणे, जगी झालीया शहाणे
म्हणून काय कवणे चालोची नये ?

तर आमचं हे असं आहे. गण, वृत्त असं काहीही समजत नसताना, फक्त वाटलं ते लिहिलं, अशा प्रकारची ही कविता आहे. तुम्ही मायबाप ती गोड मानून घ्याल, अशी खात्री असल्यामुळेच इथं प्रसिद्ध करण्याचा धोका पत्करतो आहे.

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग
दुमडला गालिचा तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली…

अशा प्रकारचं, वाचता वाचता डोळ्यासमोर चित्र उभं करेल आणि मनात जोगियाचे सूर उमटतील, अशा प्रकारचं हे काव्य नाही. पण किमान देठ, लवंगा, सालींची तरी उंची त्यानं गाठावी, ही मात्र मनापासूनची इच्छा आहे. तुम्हा सर्वांचे आणि आई सरस्वतीचे आशीर्वाद असेच पाठीशी राहिले, तर तो दिवस नक्कीच दूर नाही, असा दुर्दम्य विश्वास मनी बाळगतो, आणि हे लांबलेलं मनोगत थांबवतो…

आपला
(कवडा) सुडोकू

कविता स्टेटस मेसेजच्या
–1–

घेऊनी बसता तुझ्या स्मृतीचे मधुररम्य ते चांदतुकडे,
हलकेच आला मंद समीर तो पाहूनी सांगे चोहीकडे,
मम प्रीतीचे कौतुक रंगे अधरलोकी त्या इंद्रपुरी,
जाणूनी उत्कट त्या प्रीतीला इंद्राणीचे भान हरे,
नेत्रही झरते इंद्राणीचे अश्रु मौत्तिक खाली गळे,
जनही विस्मित म्हणती वेडे अवकाळी पाऊस पडे…

–2–

पाहतो मी दर्पणी, प्रतिबिंबित होतेस तू,
असतो मी एकटा, मन्मनी उमटतेस तू,
दाटूनी येता नभी, कोसळत्या सरीत तू,
पोळत्या तप्त झळा, श्रांतविण्या येतेस तू,
शोधतो मी तुला, अन् आतुनी हसतेस तू,
उमगले आज मला, तूच मी अन् मीच तू…

–3–

तिरीप तेजाची शोधतो मी,
अंधारा वाकुल्या दावितो मी,
त्या सूर्याच्याही मदतीस धावे
अशा पणतीस चाहतो मी…

–4–

आलो कोठून आणि चाललो कोठून गे ?
या जन्माची हीच वारी, चालती ही पाऊले…

–5–

झाले कसे ? असे तसे ? केव्हा झाले ? का झाले ?
प्रश्नांची फैर आता थांबवा गड्यांनो…
झाले गेले… संपून गेले… आता कशाला व्यर्थ टाहो ?

–6–

रात्र झाली दाट अन् अंधार दावी वाकुल्या
द्यावयाला आधार तेव्हा शुक्र तो डोकावला…

–7–

भेटता दोघे आपण, जीव झाला कुंदसा
उजळले लख्ख दिवे अन् श्वास झाला धुंदसा…

–8–

बदनाम आम्ही, बेधुंद आम्ही, जीवन आम्ही भोगतो
क्षणापुरते आयुष्य ज्याचे त्या मृत्यूलाही खिजवतो…

–9–

पाहूनी त्याला भाव मनीचा माझ्याही हरखतो,
विरह जाहल्यास माझ्या मेंदूत काटा बोचतो…
कोण तो, कसा तो, थांबवा चवकशा,
चहाच तो चहाच तो चहाच तो गरमसा…

–10–

पाहतो स्वप्नी तिला अन् स्वप्नीच रंगू लागतो
जाणतो हे स्वप्न तरीही, स्वप्नातही सुखावतो…

–11–

वेदना मी सोसिल्या अन् घावही मी झेलले
काळजाला झेदिणारा बाण तो माझाच होता…

–12–

मला वाटते की, असे काही व्हावे,
मी स्पर्शता हर कळीचे फूल व्हावे !
पण करावे काय असे होत नाही,
कळीचे सोडा पानही दाद देत नाही !!!

–13–

कसे सांगू आज काय जाहले
मनीचे फूल मनीच कोमेजले
सांगता न ये आता या व्यथाही
व्यथांचेच गा सूख वाटू लागले…

–14–

ती तिच्या जागी
मी माझ्या जागी
घडत गेले एवढेच
आता ती संसारी अन् मी ही संसारी…

–15–

निशा सरली उषा अवतरली
विरह शशीचा होता तिजला
रातराणी ती क्लांत जाहली

–16–

झाले गेले घडून गेले, मोकळ्या झाल्या दिशा,
श्वासही हो मोकळा अन् जोगिया रंगे असा…

–17–

भरल्या गर्दीतही असतो मी एकटा,
हसतो साऱ्यांसवे तरी मनात एकटा,
बहरत्या मैफिलीतही भैरवी वसे मनी,
तुझ्या आठवणीतही एकटा मी एकटा…

–18–

तेजाळत्या रविबिंबासही ग्रासे छाया एकदिनी,
सूर्यासही लागे पाहा, ग्रहण म्हणती लोक जनी,
महातपस्वी तेजोनिधीला कधी न छाया ग्रासू शके,
डोकाविते बिंब मग त्या छायेसही शोभित करे…

–19–

झाडे फुलली, फुलेही फुलली, गंध दरवळे चोहीकडे,
फुलकित ललना, पाहून तिजला, मला दवाची भूल पडे…

–20–

तपत्या झळांत आता चालतो एकटा मी,
सूर्यास सोबतीला घेऊन वाहतो मी…

–21–

शोधतो मी तुला, सापडशी तू न परी,
डोकाविता अंतरात, तूच तू उरतेस खरी…

ता.क. : या साऱ्या कविता जेव्हा जेव्हा स्टेटस मेसेज म्हणून टाकल्या, तेव्हा तेव्हा त्या कोणी ना कोणी उचलल्या. कविता आवडल्यास ती उचलण्याला माझी अजिबात हरकत नाही, पण थोडासा मोठेपणा दाखवून आमचंही नाव झळकवायला काय हरकत आहे ?
(ही सूचना इतरेजनांसाठी… प्रेमिकांना अपवाद करण्यात आलं आहे. मैत्रिणीवर इंप मारायला आमच्या नावाच्या जागी स्वतःचं नाव लावायला पूर्ण परवानगी. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही, हे स्वानुभवावरून सांगतो. आपल्या ओळी मोडक्या तोडक्या असल्या, तरी तिला त्याच आवडतात…)

No related posts.

This post was written by:

Sudoku - who has written 39 posts on Fantastic Five.


Contact the author

2 Comments For This Post

  1. अम्रुता Says:

    खुपच छान आहेत सर कविता !!

  2. savi Says:

    chhanach, mast, vachun khup kahi janavate, jya jya mood madhe oli lihilyat tya tya mood madhe mihi jawun basate.
    asach lihit ja mhanaje don kshan ka hoina mazya sarakhila hya oli vachun sagale haravun basata yeil, vahata yeil, udata yeil… aanakhi kaay sangu.

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro