िबजनेस बढेगा क्या?

Sat, Jul 4, 2009

Clone, Fantastic 5

िबजनेस बढेगा क्या?

हे ‘ट्विटर’ नेमकं वापरायचं कसं रे, असा प्रश्न एका कंपनीच्या मालकाने मला विचारला.
मी म्हटलं, सोप्पंय. ‘ट्विटर डॉट कॉम’ या साईटवर जाऊन रजिस्टर व्हा आणि तुम्हाला आता, या क्षणी काय वाटतंय किंवा तुम्ही काय करताय हे १४० शब्दांत इतरांशी शेअर करा.
ते ठीक आहे रे, पण याचा माझ्या व्यवसायासाठी काय फायदा होईल? त्यांचा प्रतिप्रश्न.
मी म्हटलं, तुमच्या नव्या प्रॉडक्टची लाईफसायकल तुम्ही यातून इतरांशी शेअर करू शकता. त्यांची मतं आजमावू शकता. त्यांच्याकडून काही नव्या कल्पना मागवू शकता. या नव्या प्रॉडक्टवर तुमच्यासोबत काम करण्यासाठी काही समविचारी व्यक्तीही तुम्हाला या माध्यमातून मिळू शकतात. प्रॉडक्ट लाँचची घोषणा तुम्ही इथे करू शकता, एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण तुम्ही येथून देऊ शकता…अशा अनेक गोष्टी ‘ट्विटर’च्या माध्यमातून साध्य होऊ शकतात.

माझ्यासाठी हे असं सांगणं सोपं होतं. इकडे-तिकडे वाचूनच मी त्यांना हे समजावून सांगत होतो. वास्तविक वैयक्तिक मेसेजेस शेअर करण्यापलीकडचा अनुभव माझ्याकडेही नव्हता; पण या माध्यमातून असं करता येतं, याची खात्री होती. कदाचित माझ्या या सांगण्यानं त्यांचा गोंधळ आणखी वाढला असावा. असो. पण ‘ट्विटर’ कसं वापरायचं, हे त्यांनी आपणहून विचारणं देखील थोडकं नव्हतं. त्यानंतर काही दिवसांनी मला ते चक्क ‘ट्विटर’वर दिसले आणि हल्ली ते बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असतात!

‘ट्विटर’ किंवा ‘फेसबुक’ वापरलं की तुमच्या व्यवसायात भरघोस वाढ होते, असे यातून मुळीच म्हणायचे नाही. नव्या माध्यमांशी जवळीक साधून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला पाहिजे, एवढंच यातून सुचवायचं आहे. त्यासाठीच हे एक प्रातिनिधिक उदाहरण तुमच्यासमोर मांडलं. भारतातल्या असंख्य लहान-मोठ्या कंपन्यांत कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आढळून येईल. कंपनीतले कर्मचारी ‘फेसबुक’, ‘ट्विटर’वर आढळतात; पण टॉप मॅनेजमेंट आणि मालक मंडळींना याचा गंधही नसतो. ‘फॉर्च्युन’च्या यादीतील १०० सीईओदेखील सोशल मीडियाचा अत्यल्प वापर करतात, असे संशोधन नुकतेच UberCEO या वेबसाईटने केले आहे. या संशोधनातून समोर आलेल्या काही ठळक बाबी अशाः

  • शंभर सीईओंपैकी केवळ दोन सीईओ ‘ट्विटर’ आणि १९ सीईओ ‘फेसबुक’ वापरतात.
  • तीसेक जणांनी ‘विकिपेडिया’वर स्वतःबद्दलची माहिती लिहिली असली तरी यातील बरीचशी माहिती अद्ययावत नाही.
  • केवळ १३ सीईओ ‘लिंक्डइन’वर असून एकाही सीईओचा स्वतःचा ब्लॉग नाही.

यातील काही बाबी खरंच धक्कादायक असल्या तरी एखादी मोठी कंपनी सांभाळणाऱ्या सीईओने सोशल मीडियासाठी किती वेळ द्यावा, याला नक्कीच काही मर्यादा आहेत. तसं पाहिलं तर सोशल मीडियाचा वापर, ही अगदी खासगी बाब अाहे. एखाद्याने याचा किती वापर करावा किंवा करू नये, हे कोणी लिहून ठेवलेलं नाही. ‘शादी डॉट कॉम’सारख्या साईटवरून कुठे लग्न होतं का? निव्वळ वेडेपणा आहे…असं जर आज कोणी म्हटलं तर आपण त्यालाच वेड्यात काढू. कारण, आज या माध्यमातूनही शेकडो गाठी जुळून येताहेत. हीच बाब ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’ची आहे. तुमचा विश्वास बसो अथवा न बसो, पण या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्सनल आणि प्रोफेशनल ब्रँडिंग होऊ शकतं; आणि यातूनच व्यवसायवाढीस मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकते.

पण सोशल मीडियाच्या वापराला दिशा नसेल तर मात्र तुमचा वेळ आणि श्रम दोन्हीही वाया जाण्याचीच शक्यता जास्त अाहे. तुम्ही दिवसातील तीन-चार तास ‘फेसबुक’वर घालवत असाल तर त्यातून तुम्हाला नेमका काय फायदा झालाय, हे केव्हातरी तपासून पाहायलाच हवं ना? तुम्ही एखाद्या प्रॉडक्टचा नकळत प्रचार करत असाल, तर आम्हाला हे प्रॉडक्ट हवंय असं विचारणारे किंवा किमान त्यासंबंधी अधिक माहिती मागण्यासाठी या माध्यमातून किती जण आले, याचा विचार तरी करायला हवा ना? जिथे मोठ्या प्रमाणावर लोक येतात, अशा ठिकाणी येऊन आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करणे, हा कोणत्याही व्यावसायिकाचा मूळ स्वभाव. त्यामुळे एक व्यावसायिक म्हणून तुम्ही ‘फेसबुक’ किंवा ‘ट्विटर’वर यायलाच हवं. यात काही शंका नाही. काही संबंध हळू-हळू प्रस्थापित होत शेवटी बिझनेसमध्ये परिवर्तित होतात, हे ही मान्य. पण यासाठी सोशल मीडियावर किती वेळ रमायचं, कोणाशी संवाद वाढवायचा, तो कुठल्या पातळीपर्यंत न्यायचा या गोष्टींचे भानही ठेवायला हवे.

‘म्युझियम २.०’ या ब्लॉगवर निना सायमनने सोशल मीडियाच्या वापरासंबंधी खूप छान माहिती दिली आहे. एका आठवड्यांत तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळात तुम्ही सोशल मीडियावर कोणकोणत्या अॅक्टिव्हिटीज करू शकता, यासंदर्भात तिने विस्ताराने लिहिले आहे. अर्थात, ही माहिती तिच्या विशिष्ट व्यवसायाच्या अनुषंगाने लिहिली गेली अाहे; पण ती इतरांनाही नक्कीच लागू पडेल.

one-week-of-web-20

तिच्या म्हणण्यानुसार आठवड्याला एक ते पाच तासांपर्यंतचा वेळ देऊ शकत असाल तर तुम्ही ‘फेसबुक’, ‘ट्विटर’सारख्या सेवा सहज हाताळू शकाल. या सेवांवर अॅक्टिव्ह राहण्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे. याखेरीज तुम्हाला आवडणाऱ्या किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित ब्लॉग्जवर जाऊन कॉमेन्ट करू शकता.

तुमच्याकडे आठवड्याला पाच ते दहा तास असतील तर तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर ब्लॉगिंग करू शकता. ब्लॉगिंग सुरू केल्यानंतर मात्र तुम्हाला त्यासाठी काही तास राखून ठेवायलाच लागतात. आठवड्याला एक पोस्ट टाकली तरी चालू शकते; पण ब्लॉग हलता ठेवण्यासाठी किमान दोन-तीन पोस्ट्स तरी टाकायला हव्या.

आठवड्याला १० ते २० तास बाजूला काढू शकत असाल तर एवढ्या वेळेत तुम्ही एखादी स्वतंत्र साईटदेखील चालवू शकता. याशिवाय तमाम सोशल नेटवर्किंग साईट्सवर अॅक्टिव्ह राहणे, इतर ब्लॉग्ज आणि फोरम्सवर सविस्तर चर्चा करणे, अशा अॅक्टिव्हिटीही करणे शक्य होऊ शकते.

स्टीव्ह गॅसर या ब्लॉगरने निनाच्या पुढे जाऊन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यासाठी दिवसाचे आणि आठवड्याचे नियोजन कसे असावे, याबद्दल आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे. त्याने केलेले नियोजन असेः

ब्लॉग (दिवसाला एक तास):

  • आठवड्याभरात झालेल्या गाठी-भेटी, ट्विटर आणि इतर ब्लॉगवरील चर्चांच्या आधारे आठवड्यात किमात तीन पोस्ट्स लिहिणे.
  • ब्लॉगवर आलेल्या कॉमेंट्सना उत्तर देणे
  • इतरांच्या ब्लॉगवर किमान दिवसाला किमान तीन-चार कॉमेंट्स टाकणे.

अॅनॅलिटिक्स (दररोज अर्धा तास):
गुगल अॅनॅलिटिक्स आणि फीडबर्नरच्या आधारे कोणती पोस्ट सर्वाधिक वाचली गेलीय, याचा आढावा घेऊन त्या अनुषंगाने फॉलो-अपचे विषय ठरवणे.

ट्विटर (दिवसातून एक ते दोन तास):

  • एखादी उत्तम कल्पना किंवा काहीतरी प्रबोधनात्मक मेसेज ट्विट करणे
  • एखाद्या अनोळख्या व्यक्तीच्या मेसेजला प्रतिसाद देणे
  • एखाद्या ताज्या किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित संभाषणात भाग घेणे.

गुगल रीडर (आठवड्यातून चार तास):

  • गुगल रीडर किंवा इतर फीड रीडर सेवांमध्ये तुम्ही सबस्क्राईब केलेल्या विविध साईट्स आणि ब्लॉग्जवरील महत्त्वाच्या पोस्ट्सवर नजर टाकणे.
  • त्यातील विशेष वाटलेल्या किंवा आवडलेल्या लेखांवर किंवा पोस्टवर कॉमेंट्स टाकणे.

लिंक्डइन (दिवसाला १५ मिनिटे)

  • स्टेटस अपडेट करणे
  • नव्या कनेक्शनचा आढावा घेणे
  • तुमच्या कॉन्टॅक्ट्समधील किमान दोन लोकांना एकमेकांशी जोडून देण्याचा प्रयत्न करणे

स्लाईडशेअरः

  • महिन्याला एखादे नवे प्रेझेंटेशन अपलोड करणे
  • प्रेझेंटेशनवरील कॉमेंट्सचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेणे

फेसबुक (दिवसाला १५ मिनिटे):

  • स्टेटस अपडेट करणे
  • इतरांचे स्टेटस मेसेजेस वाचणे व त्यावर कॉमेंट्स करणे
  • इतरांच्या ताज्या फोटोवर नजर टाकणे

यू ट्यूबः

  • महिन्यातून एकदा तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडीओचा आढावा घेणे
  • एखादा नवा व्हिडीओ असल्यास तो अपलोड करणे

डेलिशियसः

  • क्लाएंट्स किंवा कर्मचाऱ्यांसोबत शेअर करण्याजोग्या लिंक्स बुकमार्क करणे
  • आठवड्याभरात बुकमार्क केलेल्या लिंक्सचा भविष्यातील पोस्ट्ससाठी किंवा एखाद्या प्रॉडक्टसाठी काही उपयोग होतोय का, याचा आढावा घेणे

ई-मेल:

  • वेळ असल्यास तुम्ही अगदी १५ मिनिटालादेखील ई-मेल्स चेक करू शकता. पण एवढा वेळ नसल्यास दिवसातून किमान तीन वेळा तरी ई-मेल्स चेक करा.
  • नव्याने आलेल्या सर्व ई-मेलना उत्तर द्या. सविस्तर उत्तर देण्यास वेळ नसला तर किमान “I will get back to you,” असे उत्तर पाठवा.

इतर अॅक्टिव्हिटीजः
या व्यतिरिक्त तुम्ही इतर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर आठवड्यातून किमान एकदा तरी त्या साईटला भेट देऊन तिथला आढावा घ्या.

एखादी छोट्या आकाराची कंपनी चालवणाऱ्या व्यावसायिकास या नियोजनाचा नक्कीच फायदा होऊ शकतो. अर्थात, अगदी याच पद्धतीने गेलं पाहिजे असं मुळीच नाही. स्टीव्हने स्वतःसाठी हे नियोजन केलेलं असल्याने त्यात व्यक्तीनुसार, त्याच्या कामानुसार बदल निश्चितच होणार. केवळ उदाहरणादाखल स्टीव्हचे नियोजन इथे मांडले आहे.

काही जणांच्या मनात अजूनही या नव्या माध्यमांच्या उपयुक्ततेबद्दल शंका असेल. आपल्याकडे सतत काही ना काही ‘फॅड’ येत असतं. सोशल मीडियादेखील त्यापैकीच एक आहे. त्यामुळे याकडे फारसं लक्ष देऊ नये, असंही काहींना वाटत असेल. हे मान्य केलं तरी या तुमचा व्यवसाय वाढण्यास या ‘फॅड’ची मदत होणार असेल तर तुमची काही हरकत? सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रस्थापित झालेली नातीही प्रत्यक्ष भेटीतून प्रस्थापित होणाऱ्या नात्यांइतकीच बळकट असू शकतात. यावर विश्वास बसत नसेल तर सोशल मीडिया एकदा आजमावून पाहाच.

सोशल मीडिया आणि मार्केटिंग याविषयी अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. पण मराठी उद्योगविश्वात याबाबत फारशी जागरूकता नसल्याचे लक्षात येते. म्हणूनच याबद्दल थोडी प्राथमिक माहिती इथे शेअर करावीशी वाटली. यातील काही संकल्पना तुम्हाला समजल्या नसतील तर किंवा तुमच्या व्यवसायासाठी सोशल मीडियाचा कसा फायदा होऊ शकतो, याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला ffive.in@gmail.com वर ई-मेल पाठवा.

Related Readings:
Social Media For Small Business
Social Media For Small Business: Blue Paper

Suggested Presentation:

No related posts.

, , , , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro