- नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)
- व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #3)
- प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न (Paul Buchheit)
- लाँग लिव्ह ‘वेब’! (Tim Berners-Lee)
- एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)
- इन्स्पायर्ड बाय पीपल (Axel Meyer)
The real value of ‘20%’ is not the time, but rather the ‘license’ it gives to work on things that ‘aren’t important.’ - Paul Buchheit
‘गुगल’सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत ‘कंटाळा’ या शब्दाला जागाच नाहीये. काम कितीही तांत्रिक असलं तरी त्याचा कंटाळा येत नाही; कितीही काळ चाललं, तरी त्यामुळे थकवा येत नाही; पूर्ण झालं नाही म्हणून वरिष्ठांची बोलणीही खावी लागत नाहीत…कारण ‘गुगल’मध्ये एकूण कामाच्या २० टक्के वेळ आवडेल त्या प्रकल्पावर घालवण्याची मुभा आहे. या २० टक्के वेळेतच ‘जी-मेल’ या आजच्या सर्वाधिक लोकप्रिय ई-मेल सेवेचा जन्म झाला. वर उल्लेख केलेला पॉल बुहाईट हा ‘जी-मेल’चा निर्माता! ‘जी-मेल’ने नुकतीच पाच वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने ‘जी-मेल’च्या निर्मितीचा इतिहास आणि पॉल बुहाईटचे व्यक्तीमत्त्व जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी सप्टेंबर १९९८ मध्ये ‘गुगल’ची स्थापना केली. ‘गुगल’ हा काय प्रकार आहे, हे जगाला माहित देखील नव्हतं त्यावेळी पॉलने ‘इंटेल कॉर्पोरेशन’मधील चांगली नोकरी सोडून १९९९ च्या मध्यास ‘गुगल’मध्ये नोकरी पत्करली. पॉल हा तेथील २३ वा कर्मचारी. आज याच ‘गुगल’चे जगभरात २० हजारांहून अधिक कर्मचारी अाहेत. पण या २३ व्या कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यकाळात केलेले काम अाज सुमारे १५ कोटींहून अधिक लोकांसाठी गरज बनली आहे. (‘गुगल’ आणि) ‘जी-मेल’शिवाय एक दिवसही आपण घालवू शकत नाही; किंबहुना अशी कल्पनादेखील करणे तुमच्यापैकी अनेकांना जड जाईल. काही क्षणांसाठी जरी ‘जी-मेल’ बंद पडले तर निम्म्या जगाचे काम खोळंबेल. पण आज प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘जी-मेल’ला एकेकाळी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचाच विरोध होता. या सेवेची भ्रूणहत्याच झाली असती; पण पॉलची जिद्द आणि आत्मविश्वास कामास आला आणि आज ‘जी-मेल’ने यशस्वीरित्या पाच वर्षे पूर्ण केली.
पॉलने सप्टेंबर २००१ मध्ये ई-मेल सेवेवर काम करण्यास सुरवात केली. त्यावेळी याहू, ‘हॉटमेल’ आदी ई-मेल सेवा केवळ काही मेगाबाईट्सचेच (२ ते ६ एमबींचे) स्टोरेज देत असत. त्यामुळे मेलबॉक्स सतत रिकामा ठेवण्यासाठी ई-मेल डिलीट करणे, हा स्वतंत्र उद्योग असे. शिवाय एखादा जुना मेल शोधणे म्हणजे निव्वळ अशक्य होते. एके दिवशी विविध मेल सेवांबद्दल पॉल आणि त्याच्या एका सहकाऱ्यात बराच काळ चर्चा झाली. या चर्चेनंतर पॉलने ठरवले की आपल्या २० टक्के वेळेत एक चांगली ई-मेल सेवा तयार करण्याचा प्रयत्न करायचा.
पॉल आणि ई-मेल सेवा हे समीकरण तसं खूप जुनं. कॉलेजमध्ये असताना १९९६ मध्ये पॉलने पहिल्यांदा ई-मेल सेवा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी ई-मेल करण्यासाठी इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीच्या ई-मेल क्लाएंटवर (आयएसपी बेस्ड ई-मेल) अवलंबून राहावे लागत असे. याबद्दल पॉल म्हणत ः
एखादा महत्त्वाचा ई-मेल करण्यासाठी आम्हाला हॉस्टेल रूमवर परत जावे लागत असे. खूप कंटाळा यायचा आणि वाटायचे की हे असं का आहे? कुठूनही ई-मेल करता येईल अशी एखादी सेवा नाही का?
अशी सेवा आपणच का सुरू करू नये, असे वाटून त्याने त्या दिशेने कामही सुरू केले. अर्थात त्यावेळचे त्याचे काम पुढे सरकले नाही. दरम्यान, जुलै १९९६ मध्ये सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ यांनी ‘हॉटमेल’ ही वेब-बेस्ड ई-मेल सेवा जगासमोर सादर केली आणि पुढची काही वर्षे ‘हॉटमेल’ने जगावर राज्य केले. एका वर्षाच्या आतच ‘मायक्रोसॉफ्ट’ने सुमारे ४० कोटी डॉलर्स देऊन ‘हॉटमेल’ विकत घेतले आणि ई-मेल सेवेतही आपला जम बसवला. त्याच वर्षी (१९९७) ‘याहू’नेदेखील आपली ई-मेल सेवा जाहीर केली. ‘याहू मेल’लाही तूफान प्रतिसाद मिळाला. आज जगातील किमान ५० कोटी लोक ‘हॉटमेल’ आणि ‘याहू’ची सेवा वापरतात.
‘अॅडव्हान्स्ड सर्च’ची सुविधा असलेली ई-मेल सेवा तयार करण्याची कल्पना अजूनही पॉलच्या डोक्यात घोळत होती. दरम्यान पॉल ‘गुगल’मध्ये दाखल झाला होता. ‘गुगल ग्रुप्स’ या प्रोजेक्टवर काम करताना डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी अचानक त्याच्याकडे चालत आली. त्याने लगेच त्या संधीचा स्वीकार केला. २० टक्के वेळेत ई-मेलची कल्पना साकार करण्याची त्याची इच्छाही त्यामुळे पूर्ण होणार होती.
‘जी-मेल’च्या यशाचे रहस्य सांगताना पॉल म्हणतो ः
कोणतीही नवी कल्पना आम्ही दडवून ठेवली नाही. माझ्या किंवा इतर कोणाच्याही डोक्यात आलेली कल्पना आम्ही तात्काळ प्रत्यक्षात आणत असू. ऐकताना भन्नाट वाटणारी एखादी कल्पना प्रत्यक्षात आणल्यानंतर फोल ठरत असे आणि एखादी फुटकळ वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणल्यानंतर जादुई काम करून जात. यामुळेच ‘जी-मेल’मध्ये सतत बदल होत गेले. म्हणूनच त्यावरील ‘बीटा’ टॅग अाज पाच वर्षांनंतरही कायम आहे. आता या प्रयोगांना ‘लॅब्ज’च्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ प्राप्त झाले आहे आणि हीच ‘जी-मेल’ची खरी ताकद आहे.
पॉलच्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये त्याने केवळ एका दिवसात ‘जी-मेल’चा कोड लिहून पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. पण ‘जी-मेल’ जगासमोर आणण्यापूर्वी सुमारे दोन-अडीच वर्ष पॉल आणि त्याचे सहकारी विविध प्रयोग करून त्यांची उपयुक्तता पडताळून पाहत होते. सप्टेंबर २००१ मध्ये सुरू केलेला हा प्रोजेक्ट एप्रिल २००४ मध्ये ‘जी-मेल’ नावाने आपल्यासमोर आला. २००१ मध्ये पॉल ‘गुगल ग्रुप्स’वर काम करत होता. त्यामुळे त्याने ‘गुगल ग्रुप्स’चाच कोड वापरून त्यात फेरफार केले. स्वतःच्या मेलबॉक्समध्ये सर्च करणे शक्य होते का, हे त्याने तपासले. त्यानंतर काही सहकाऱ्यांनादेखील अशीच सेवा उपलब्ध करून दिली. त्यांनीदेखील ही सेवा उपयुक्त असल्याचे सांगितले.
तथापि, गुगलमधील अनेकांच्या मते अशा ई-मेल सेवेवर काम करणे म्हणजे स्वतःचा आणि कंपनीचा वेळ वाया घालवणे होते. एखाद्या व्यक्तीला ई-मेल सेवा बदलायला लावणे अत्यंत कठीण आहे, असा त्यांचा समज होता. याऐवजी कंपन्यासाठी एखादा ई-मेल क्लाएंट विकसित करणे फायद्याचे ठरेल, असेही त्यांचे म्हणणे होते. ‘जी-मेल’ सादर करण्याच्या वेळेपर्यंत ‘गुगल’मधले अनेक कर्मचारी याच मताचे होते. ही सेवा फ्लॉप ठरणार, असे भाकितही त्यांनी केले होते. पण ई-मेलच्या क्षेत्रात ‘जी-मेल’च्या बातमीने खळबळ उडवून दिली. एक एप्रिल २००४ रोजी गुगलने १०२४ एमबी अर्थात १ जीबी (म्हणजे त्यावेळच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत किमान ५०० पट अधिक) स्टोरेज देणारी आणि उत्तम मेल सर्च असणारी ‘जी-मेल’ ही नवी ई-मेल सेवा सुरू करत असल्याचे घोषित केले आणि प्रस्थापितांचे धाबे दणाणले. एक जीबी स्टोरेज देणे केवळ अशक्य आहे, असे म्हणून अनेकांनी गुगलने ‘एप्रिल फूल’ केल्याचा समज करून घेतला; पण ते ‘एप्रिल फूल नव्हते. दिवसागणिक स्टोरेज वाढत जाणार असल्याचेही ‘गुगल’ने जाहीर केले. त्यामुळे आज ‘जी-मेल’ वापरणाऱ्यांना सुमारे सात जीबींचे स्टोरेज मिळते. तुम्हाला अतिरिक्त स्टोरेज हवे असल्यास तशी ‘पेड’ सेवाही गुगलने उपलब्ध करून दिली आहे. शिवाय पर्सनलाईज्ड डोमेन वापरून ई-मेल देणारी सेवाही ‘गुगल’कडे आहे.
उत्तम ई-मेल सेवा तयार करण्यात पॉल आणि त्याचे सहकारी यशस्वी झाले होते. पण ‘जी-मेल’मधून पैसा कसा येणार, हा मूळ प्रश्न अजून अनुत्तरित होता. संजीव सिंग या भारतीय वंशाच्या सहकाऱ्याने यावर एक उपाय सुचवला. ‘जी-मेल’ वापरणाऱ्या व्यक्तीला जे ई-मेल येतील, त्यातील शब्दांना सुसंगत अशा जाहिराती ई-मेलशेजारी डिस्प्ले करून पैसे मिळवायचे, अशी त्याची कल्पना होती. उदा. एखाद्या ई-मेलमध्ये ‘पॉडकास्ट’ असा शब्द असेल तर त्या ई-मेलच्या शेजारी ‘आयपॉड’ किंवा ‘हेडफोन्स’च्या जाहिराती दिसतील, अशी व्यवस्था करायची. सुरवातीला सर्वांनी संजीवला वेड्यात काढले. पॉलदेखील या कल्पनेबद्दल फारसा उत्साही नव्हता. पण पॉलचे एक धोरण होते - प्रयोग करून पाहिल्याशिवाय कोणतीही कल्पना बाद ठरवायची नाही. या धोरणानुसार त्याने जाहिरातींचा ‘डेटाबेस’ घेऊन त्याचे जाहिरात आणि त्यातील ‘कीवर्ड’नुसार वर्गीकरण केले. त्यानंतर ‘अॅडल्ट कन्टेन्ट ब्लॉक’ करण्यासाठी तयार केलेला एक प्रोग्राम वापरून त्यात हवे तसे बदल केले. एखाद्या सर्च रिझल्टमध्ये अॅडल्ट, पोर्न, सेक्स असे शब्द असल्यास तो रिझल्ट ब्लॉक करण्यासाठी हा प्रोग्राम तयार करण्यात आला होता. पॉलने त्यात बरोबर उलटा बदल केला. म्हणजे त्यातील ‘अॅडल्ट कीवर्ड’च्या जागी जाहिरातींचे ‘कीवर्ड’ एंटर केले व त्या ‘कीवर्ड’च्या जाहिरातीशी जोड्या लावल्या. हा प्रोग्राम त्याने ‘जी-मेल’च्या प्रोटोटाईपशी लिंक केला. त्याच्या या कुरापतींना चांगलेच यश आले. ‘डेटाबेस’मध्ये असलेल्या ‘कीवर्ड’पैकी (उदा. पॉडकास्ट) एखादा ‘कीवर्ड’ ई-मेलमधील मजकुरात असला की ई-मेलशेजारी असलेल्या छोट्या बॉक्समध्ये लगेच त्याच्याशी सुसंगत जाहिरात (उदा. हेडफोन्स) डिस्प्ले होत. हा प्रयोगदेखील पॉलने अवघ्या एका दिवसात केला. आज ‘गुगल’चा जवळपास सगळा महसूल अशा सुसंगत जाहिरातींतून येतो. हा प्रकार ‘गुगल अॅडसेन्स’ नावाने ओळखला जातो. पॉलच्या या प्रयोगामुळेच ‘गुगल’ आज इंटरनेट क्षेत्रातील आर्थिक महासत्ता बनले आहे. पुढे या प्रयोगावर काम करण्यासाठी ‘गुगल’ने स्वतंत्र टीम नेमली व या विषयाशी संबंधित काही कंपन्यांचे संपादन केले.

जी-मेलमधून महसूल मिळवण्याच्या हेतूने सुरू केलेली गुगल अॅडसेन्स सेवा आज गुगलच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत झाली आहे.
‘जी-मेल’ आणि ‘अॅडसेन्स’ या दोन महत्त्वपूर्ण सेवांखेरीज आणखी एका गोष्टीचे श्रेय पॉलला जाते. ‘डोन्ट बी एव्हिल’ हे गुगलचे प्रसिद्ध घोषवाक्यही पॉलच्याच सुपीक डोक्यातून आले आहे. ‘कॉर्पोरेट व्हॅल्यूज’ निश्चित करण्यासाठी बोलावलेल्या एका मीटिंगमध्ये पॉल बसला होता. कंपनीचे घोषवाक्य काय असावे, यावर चर्चा सुरू होती. मीटिंगला उपस्थित असलेले सहकारी सुचेल तशी घोषवाक्य सांगत होती आणि त्यांच्यापैकी एकजण ती नोंदवून घेत होता. सॉफ्टवेअर आणि इंटरनेट क्षेत्रातील काही बड्या कंपन्या प्रतिस्पर्ध्यांना बाजारातून हुसकावून लावण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करत असल्याच्या अनेक घटना त्यावेळी उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे आपण केवळ आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करून लोकांचे जीवन सुखकर कसे होईल, याचा विचार करावा. आपल्या प्रतिस्पर्ध्यास हुसकावून लावण्यापेक्षा आणखी उत्तम काम करण्याची चालना मिळावी असे आपले वर्तन असावे, असा विचार करून पॉलने Don’t Be Evil असे घोषवाक्य सुचवले. नोंदवून घेणाऱ्याने ते यादीत तळात टाकले. तथापि, पॉल आणि त्याचा सहकारी अमित पटेल यांनी ते यादीत वरच्या क्रमांकात मांडावयाचा आग्रह धरला. त्यातून सर्वोत्तम घोषवाक्य म्हणून Don’t Be Evil ची निवड झाली. ‘गुगल’च्या ‘कॉर्पोरेट व्हॅल्यूज’ सांगण्यासाठी एखादे मोठे पुस्तक वाचून दाखवण्याची अजिबात गरज नाही. पॉलने सुचवलेले हे घोषवाक्य वाचताच ‘गुगल’ची संस्कृती समजते.
१९९९ मध्ये ‘इंटेल’सारख्या बड्या कंपनीतून पॉल ‘गुगल’सारख्या नवख्या आणि छोट्या कंपनीत आला होता. ‘इंटेल’ची नोकरी सोडण्याचे कारण म्हणजे ‘इंटेल’चा विस्तार. ‘इंटेल’सारख्या महाकाय कंपनीत काम करताना तुम्हाला फारसं शिकता येत नाही. मला सतत काही ना काही शिकण्याची आवड होती. म्हणून मी एखाद्या नवख्या कंपनीत (स्टार्ट-अप) काम करणे पसंत करतो, असे पॉलचे म्हणणे होते. पॉलला ‘गुगल’मध्ये आता सात वर्षं झाली होती. ‘गुगल’ एव्हाना इंटरनेटमधील महासत्ता होण्याच्या मार्गावर होते. मोठ्या कंपनीत करण्यासारखं फार उरत नाही. म्हणून पॉलने २००६ मध्ये ‘गुगल’ला अलविदा केले. त्याने ‘फ्रेंडफीड’ नावाने एक नवी सेवा सुरू केली. सोशल नेटवर्किंग आणि सोशल बुकमार्किंग साईट्स, ब्लॉग्ज, मायक्रोब्लॉग्ज, फोटो शेअरिंग साईट्स आणि अन्य सेवांवरील अपडेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी ही सेवाही हळूहळू लोकप्रिय होत आहे. तथापि, या सेवेत अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न पॉल आणि त्याचे सहकारी (यात ‘अॅडसेन्स’वाला संजीव सिंगही आहे) करत आहेत. पण कोणत्याही नव्या उपक्रमाला एका रात्रीत यश मिळत नसते; किंबहुना असे यश मिळाल्यास अनेकदा ते दिशाभूल करणारे ठरू शकते, असे पॉलचे मत आहे. आपल्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये पॉल म्हणतो ः
This notion of overnight success is very misleading, and rather harmful. If you’re starting something new, expect a long journey. That’s no excuse to move slow though. To the contrary, you must move very fast, otherwise you will never arrive, because it’s a long journey! This is also why it’s important to be frugal — you don’t want to starve to death half the way up the mountain.
पॉलचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे…
Follow Paul on FriendFeed
( फोटोः फ्लिकर, टेकक्रंच)
Related Readings:
The Evolution of Pre-Launch Gmail In Screenshots
Interview: Gmail’s product manager on Labs, beta, the future
How Did We Survive Without Gmail?
The official Gmail Blog
No related posts.



April 15th, 2009 at 1:43 pm
mala gmail khup aawadate pan tyan don univa janavatat:
1) jevha apan mail type karato ani attachment jodato tevha attachment jodalyanantar vatate ekhadi attachment cancel karavi, tyaveli remove ha option tethe nasato.
2) tasech jevha aaplyala ekadi attachment asaleli mail forward karayachi asate tevha ekhadi attachment kadhavi ase vatale tari ti kadhata yet nahi.
apan he jar gmail chya team paryant pohochu shakalat tar mi apali abhari aahe.
April 15th, 2009 at 10:22 pm
Hello Savi,
Ya donhi prashnanche uttar ekach aahe…attachment remove karayachi asel tar tyapudhil box madhe click karayache mhanje tithe asaleli check chi khun uncheck karayachi…attachment remove hoil…
Try it out once. Aani nahi jamala tar mail pathav. Will send u stepwise solution.
Anyways, thanks for your comment(s)…Do keep reading Fantastic Five…
April 16th, 2009 at 11:37 am
Hello Savi,
Ya donhi prashnanche uttar ekach aahe…attachment remove karayachi asel tar tyapudhil box madhe click karayache mhanje tithe asaleli check chi khun uncheck karayachi…attachment remove hoil…
Try it out once. Aani nahi jamala tar mail pathav. Will send u stepwise solution.
Anyways, thanks for your comment(s)…Do keep reading Fantastic Five…