अॉनलाईन आयडेंटिटी…

Wed, Jul 22, 2009

Clone, Fantastic 5, Fantastic Lists

अॉनलाईन आयडेंटिटी…

कॉलेजच्या शेवटच्या सेमेस्टरमधली ती प्रचंड धावपळ अजूनही अाठवतेय. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करण्यापूर्वीची ती घाई-गडबड, रिपोर्टमधले दोन सेक्शन्स माझ्याकडे आणि इतर सेक्शन्स पार्टनरकडे असल्याने प्रिंट्स काढताना प्रचंड गोंधळ उडाला होता. अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट एका फ्लॉपीवर बसत नव्हता म्हणून त्याचे दोन भाग करण्याचा हा उद्योग करावा लागला होता. प्रिंटरकडे गेल्यानंतर एकाच फ्लॉपीतील फाईल ओपन होत होती. दुसरी फ्लॉपी करप्ट झाल्याचा मेसेज येत होता. पुन्हा रूमवर जाणं आलं. शेवटी चिडून दहा फ्लॉपीचा एक बॉक्स विकत घेतला. सगळ्या फ्लॉपीवर तीच फाईल कॉपी केली आणि प्रिंटरकडे आलो. म्हटलं, घ्या आता. पाहा यातली कोणती फ्लॉपी चालतेय ती. फ्लॉपी हा प्रकार म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होता. पण गेल्या चार-पाच वर्षांत हे सारं बदलून गेलंय. दीड एमबीच्या फ्लॉपीपासून आठ जीबींच्या पेनड्राईव्हपर्यंत आणि सातशे एमबींच्या सीडीपासून एक टेराबाईटच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कपर्यंतचा हा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे. फ्लॉपी (हा जीवघेणा प्रकार) आज नावलाही सापडणार नाही. अनेक गोष्टी तर अॉनलाईनच एकडून-तिकडे पाठवता येतात. त्यासाठी पेनड्राईव्ह किंवा हार्डडिस्कचीदेखील गरज उरलेली नाही.

बायोडेटा किंवा रिझ्युमच्या बाबतीतही असाच प्रकार घडायचा. मला आठवतंय - कॉलेज संपल्यानंतर नोकरी शोधण्यासाठी मी आणि माझ्या एका मित्राने थेट मुंबई गाठली होती. सोबत रिझ्युमच्या काही प्रिंट-आऊट्स आणि फ्लॉपीज होत्या. पहिल्या दोन-तीन दिवसांतच आम्ही सात-आठ एचआर कन्सल्टन्सीमध्ये जाऊन रिझ्युम देऊन आलो. प्रिंट आऊट्स संपल्या तरी फ्लॉपीवर त्याच्या कॉपीज होत्या, म्हणून आम्ही निर्धास्त होतो. पण दुसऱ्याच दिवशी फ्लॉपीने आपला रंग दाखवला. फ्लॉपी करप्ट झाल्याचा मेसेज आला आणि आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. आता काहीही करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे अगोदर ज्या कन्सल्टन्सीमध्ये रिझ्युम दिला होता तिथून फोटोकॉपीज करण्यासाठी तो परत घ्यावा लागला. आम्हाला फोटोकॉपीज काढण्यापुरता रिझ्युम परत हवा आहे, हे समजल्यावर तिथल्या मुलीने ‘न जाने कहाँ-कहाँ से चले आते है,’ अशा आशयाचे जे एक्स्प्रेशन्स दिले ते मी अाजही विसरू शकत नाही. जाम खजील व्हायला झालं होतं. त्यानंतर मेलबॉक्समध्ये रिझ्युम ठेवण्याची पद्धत मी अवलंबली. त्यामुळे असा प्रसंग पुन्हा कधी आला नाही.

आता काळ खूप पुढे गेलाय. आज अॉनलाईन विश्वात जगताना प्रिंट आऊट्सचा कमीत-कमी वापर करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. प्रत्येकाने स्वतःची पक्की अॉनलाईन ओळखही निर्माण केली आहे. अॉरकुट, फेसबुक, लिंक्ड-इनसारख्या सेवांचा वापर करून तुमच्या बद्दलची प्राथमिक माहिती एखाद्या व्यक्तीस मिळू शकते. यासह काही विशेष सेवांचा वापर करूनही तुम्ही तुमची अॉनलाईन ओळख आणखी पक्की करू शकता. अशाच पाच अॉनलाईन प्रोफाईलिंग सेवांची माहिती आज तुमच्यासाठी देतोय.

गुगल प्रोफाईल्सः

तुम्ही ‘गुगल’चे फॅन असाल असाल आणि गुगलच्या बऱ्याचशा सेवा वापरत असाल तर गुगल प्रोफाईल ही सेवा वापरून स्वतःचे छोटे प्रोफाईलही तयार करू शकता. http://www.google.com/profiles/your google username या पत्त्यावर कोणीही तुमचे प्रोफाईल अॅक्सेस करू शकेल. यात नाव, पत्ता, पद, कंपनी, शिक्षण आदींसह तुम्ही स्वतःबद्दल थोडक्यात माहिती लिहू शकता. तुमच्या ब्लॉग्जसह इतर सोशल मीडिया प्रोफाईलच्या लिंक्सही तुम्ही येथे देऊ शकता. या प्रोफाईलची लिंक तुम्ही ई-मेल किंवा इतर सेवांच्या माध्यमातून इतरांशी शेअर करू शकता.

श्मॅप मीः

एखाद्या नवख्या शहरात फिरताना कुठे रहावे, काय पाहावे, कुठे खावे आदी प्राथमिक गोष्टींची माहिती आपल्याला सतत लागत असते. याचा कितीही पूर्वाभ्यास केला तरी ऐनवेळी गोंधळायला होतं. अशा वेळी श्मॅपचे डेस्कटॉप आणि मोबाईल गाईड्स तुमच्या उपयोगास येऊ शकतात. या मूळ संकल्पनेला पुढे नेत श्मॅपने ‘श्मॅप मी’ नावाची पर्सनल प्रोफाईलिंग सेवाही सुरू केली. http//www.schmap.me/yourname या पत्त्यावर तुमचे प्रोफाईल अॅक्सेस करता येऊ शकते. यात तुम्ही नाव, घर किंवा अॉफिसचा पत्ता, ई-मेल, फोनसह तुमची थोडक्यात माहिती लिहू शकता. घर किंवा अॉफिसच्या पत्त्यावरून शेजारी गुगल मॅपवर तुमचे लोकेशनही दाखवले जाते. Schmap.me वरील प्रोफाईल मोबाईलवरही डिस्प्ले होतात. अॉनलाईन बिझनेस कार्ड म्हणून तुम्ही या सेवेचा वापर करू शकाल.

रिटॅगर

तुमच्या सर्व सोशल मीडिया साईट्सचे महाद्वार म्हणून तुम्ही रिटॅगरचा वापर करू शकता. वेब २.० बिझनेस कार्ड म्हणूनही ही सेवा प्रचलित आहे. इतर कोणत्याही प्रोफाईलिंग सेवेच्या तुलनेत रिटॅगर एक पाऊल पुढे असल्याचे आढळून येते. प्रोफाईल कार्ड, प्रोफाईल पेज, प्रोफाईल विजेट, स्टेटस मेसेज इमेज, इमेज टॅगिंग, ई-मेल सिग्नेचर, बॅजेस असे अनेक फीचर्स यात तुम्हाला आढळतील. http://www.retaggr.com/page/yourname या पत्त्यावर तुमचे प्रोफाईल पेज आणि http://www.retaggr.com/card/yourname या पत्त्यावर तुमचे बिझनेस कार्ड अॅक्सेस करता येऊ शकते.

लिंक्ड-इन

तुमच्यापैकी अनेक जण लिंक्ड-इन या नेटवर्किंग सेवेचा नक्कीच वापर करत असतील. यावरील तुमचे पब्लिक प्रोफाईल http://www.linkedin.com/in/yourname या पत्त्यावर अॅक्सेस करता येऊ शकते. लिंक्ड-इनच्या Account & Settings > Public Profile मध्ये जाऊन तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही पब्लिक प्रोफाईलमध्ये दाखवू शकता.

व्हिज्युअल सीव्हीः

यापूर्वीच्या चार सेवा तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती देणाऱ्या होत्या. पण याहीपुढे जाऊन तुम्ही तुमचा अख्खा रिझ्युमही अॉनलाईन तयार करून इतरांशी शेअर करू शकता. व्हिज्युअल सीव्ही ही सेवा वापरून तुम्ही http://www.visualcv.com/yourname या पत्त्यावर तुमचा मल्टिमीडिया रिझ्युम अॅक्सेस करू शकता. व्हिज्युअल सीव्ही वापरून रिझ्युम तयार करणे केवळ काही मिनिटांचे काम आहे. यात नाव, गाव, पत्त्यासह तुमचा अनुभव, कौशल्य, प्रशिक्षण, तुम्ही केलेले कामही (उदा. एखादे प्रेझेंटेशन, एखादा व्हीडिओ, इ.) इथे दाखवता येते. याखेरीजही यात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत. त्यांचाही फायदा तुम्ही घेऊ शकता.

बोनस - फेसबुक व्हॅनिटी यूआरएल:
फेसबुकवर असणाऱ्यांनी व्हॅनिटी यूअारएल अर्थात तुमच्या पब्लिक प्रोफाईलची खास लिंक अगोदरंच सेट केलेली असेल. तुम्ही अद्याप तुमच्या फेसबुक पब्लिक प्रोफाईलची लिंक सेट केली नसल्यास http://www.facebook.com/username/ या लिंकवर जाऊन सेट करू शकता.

अॉनलाईन जगात जगायचे असेल तर सेल्फ प्रमोशनचे असे अाधुनिक पर्याय वापरायलाच हवे. तुम्हाला काय वाटतं? यासारख्या आणखी काही सेवा तुम्हाला माहित असतील तर त्याही जरूर शेअर करा.

google-profileschmapme-profileretaggr-profilelinkedin-public-profilevisualcv-profile

No related posts.

, , , , , , , , , , , , , , , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro