सोशल नेटवर्क्स आणि वेबसाईट्सची ताकद भारतीय कंपन्यांना आता कळू लागली आहे. एकेकाळी केवळ सोपस्कार म्हणून ब्रोशररूपी वेबसाईट करणाऱ्या कंपन्या आता तरुणांना आकर्षित करून गुंतवून ठेवणाऱ्या वेबसाईटकडे वळू लागल्या आहेत. व्हायरल मार्केटिंग, सोशल मीडिया कॅम्पेनिंग असे शब्द आता वारंवार ऐकायला मिळताहेत. सनसिल्क गँग अॉफ गर्ल्सपासून भारतात एक नवा मार्केटिंग ट्रेंड सुरू झाला. सध्या लोकप्रिय असलेल्या अशाच पाच वेबसाईट्स आणि कॅम्पेन्स…
१. कॅडबरी पर्क्सः
टेक इट लाईटली डॉट कॉम नावाने कॅडबरीने पर्क्सची कॅम्पेन सुरू केली आहे. एखाद्या फ्लॅश साईटवर लॉग-इन होताना लोडिंग असे पाहण्याची आपल्याला सवय झालेली असते. पण इथे पर्सेंटेज काऊंट उलटीकडून सुरू होते आणि लोडिंगऐवजी अनलोडिंग असे येते. अनलोडिंगपुढे आजच्या तरुणांना जे-जे प्रश्न आणि टेन्शन्स आहेत त्यांची नावे येत जातात व शेवटी…आता कसं हलकं वाटतंय ना, असा मेसेज देत हातात कॅडबरी पर्क घेतलेली जेनेलिय डिसूझा येते. तुम्हाला कोणतेही सल्ले, टिप्स देण्यासाठी ही साईट केलेलीच नाही असा मेसेजही यासोबत येतो.
(ही कल्पना यापूर्वी किटकॅटने वापरली असून त्यांनी द फर्स्ट वर्ल्ड वाईड वेबसाईट व्हेअर नथिंग हॅपन्स डॉट कॉम नावाने मार्केटिंग केले आहे.)
२. टाटा स्कायः
तरुण आणि डेटिंग हे समीकरण कायम जोडले जाते. अॅडल्ट फ्रेंड फाईंडर सारख्या डेटिंग साईट्स त्यामुळेच प्रचंड लोकप्रिय आहेत. Word’s Sexiest Women, Top 10 tips to please your girlfriend, Hot Models अशा लिंक्स दिसल्या की त्यावर धडाधड क्लिक गेल्याच म्हणून समजा…(तुम्हीही फसलात!). या प्रवृत्तीचा फायदा घेत टाटा स्कायने अॅडल्ट दोस्त डॉट कॉम या साईटवरून आपल्या एका फीचरची जाहिरात केली. या फीचरबद्दल मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊनच पाहा…
३. मॅगी नूडल्सः
टू मिनट नूडल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या मॅगी नूडल्सला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी सुरू केलेल्या मार्केटिंगने त्यांनी जनतेची नाडी बरोबर पकडली आहे. मॅगी नूडल्स ही अशी गोष्ट आहे की जी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि मॅगीबरोबर प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. मलाही आठवते - आम्ही कॉलेजमध्ये असताना एकत्र अभ्यास करायचो आणि रात्री अडीच-तीनच्या सुमारास प्रचंड भूक लागायची. त्यावेळी केलेली मॅगी आम्ही कधीही विसरू शकत नाही. ‘असे क्षण पुन्हा येणार नाही,’ असं म्हणत आम्ही ती मॅगी खात असू. असेच अनुभव शेअर करण्यासाठी मॅगीने सुरू केलेली मी अॅण्ड मेरी डॉट इन ही वेबसाईट अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.
४. डेल कॉम्प्युटर्सः
टेक युवर अोन पाथ डॉट कॉम या नावाने सुरू केलेल्या वेबसाईटवर डेल कॉम्प्युटर्सने भारतातील आंत्रप्रिन्युअर्सच्या सक्सेस स्टोरीज मांडल्या आहेत. टीव्ही, प्रिंट आणि अॉनलाईन या तिन्ही माध्यमांचा वापर करून डेलने आपल्या उत्पादनांचे जोरदार मार्केटिंग सुरू केले आहे. टेक युवर ओन पाथ या साईटवर तुम्हाला ‘एनआयआयटी’चे सहसंस्थापक पी. राजेंद्रन, भारतातील बीपीओचे जनक रमन रॉय आदींची माहिती दिली आहे. शिवाय आंत्रप्रिन्युअर्ससाठी टिप्सही या साईटमध्ये दिल्या आहेत.
५. अॅक्स डिओडरन्टः
अॅक्स चॉकलेट या ब्रँडसाठी अॅक्सने भारतातील आतापर्यंतची सर्वांत रिस्की अॉनलाईन कॅम्पेन नोव्हेंबर २००८ मध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली. ११ नोव्हेंबर रोजी अॅक्सने रेडिफ, एमएसएन इंडिया, याहू इंडिया आणि झपाक या चारही साईटच्या होमपेजवर केवळ अॅक्स चॉकलेटच्या जाहिराती आणि त्याच्याशी संबंधित मजकूर ठेवला होता. यातील मजकुरावर क्लिक करणाऱ्यास अॅक्स डार्क टेम्प्टेशन डॉट कॉम या साईटवर रिडायरेक्ट केले जात असे. या साईटवर संबंधित उत्पादनाबद्दल अधिक माहिती, वॉलपेपर्स आणि गेम्सही ठेवले होते.
तुम्हाला आवडलेल्या किंवा माहित असलेल्या अशाच इतर साईट्सच्या लिंक्स जरूर शेअर करा…
No related posts.




Leave a Reply