दररोज पेपर वाचण्याची सवय असलेल्यांना (आणि पेपरशिवाय ‘होत’ नसलेल्यांना) सोळा अॉगस्टचा दिवस मोठा कठीण जातो. या दिवशी एकही पेपर येत नाही. तशी काही सायंदैनिकं येतात; पण भरभक्कम वाचल्याशिवाय भूक भागत नाही. त्यामुळे सायंदैनिकं फारशी ‘प्रभावी’ ठरत नाहीत. दरवर्षीचा अनुभव असल्याने मी यावर्षी १५ अॉगस्टला आलेले दोन पेपर १६ तारखेसाठी राखून ठेवले…अगदी घडीदेखील उघडली नाही. त्यामुळे १६ तारखेला ताजा पेपर वाचण्याचा आनंद मिळाला. असो.
पंधरा अॉगस्ट म्हटलं की पेपरातील आणि चॅनेलवरच्या बातम्या ठरलेल्या असतात. १९४७ चा सोहळा, राष्ट्रध्वजाची जन्मकथा अशा बातम्या आणि गांधी, सुभाषचंद्र बोस, तिरंगा, क्रांतीवीर, मंगल पांडे, भगतसिंग, रंग दे बसंती अादी चित्रपट - एकदम पक्के. दाखवण्यात काहीही गैर नाही. पण स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षं झाली…पेपर आणि टेलिव्हिजन या माध्यमांत एवढे बदल झाले आणि सतत होताहेत, तरीदेखील यांच्या कार्यक्रमात कसलंही नावीन्य का येत नाही? या प्रश्नाचं उत्तर केव्हा सापडेल कोण जाणे. पण दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘हिंदुस्तान टाईम्स’ समूहाच्या ‘मिंट’ या बिझनेस पेपरने यंदाच्या १५ अॉगस्टला चांगलेच सरप्राईझ दिले. शनिवारी या पेपरतर्फे ‘लाऊंज’ नावाने एक अप्रतिम पुरवणी दिली जाते. पंधरा अॉगस्टचे निमित्त साधून त्यांनी गेल्या शनिवारी ‘लाऊंज’ची ‘इंडिपेन्डन्स डे स्पेशल एडिशन’ वितरित केली. विषय होता ‘मॉडर्न डे फ्रीडम फायटर्स!’
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून देऊन प्राणांची आहुती देणाऱ्यांचे आपण सदैव ऋणी राहणार आहोत, यात शंका नाही. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा, भविष्याचा कसलाही विचार न करता हे लोक लढ्यात सहभागी झाले. ते स्वार्थी असते तर कदाचित आपण आजही पारतंत्र्यात राहिलो असतो. आजची परिस्थिती अगदी उलटी आहे. आज प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःसाठी जगताना आढळून येते. समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याचा विचार मनात येईपर्यंत आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य संपलेले असते. प्रत्येकानेच समाजासाठी काही केलेच पाहिजे, असा आग्रह नाही; पण ज्या व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेऊन काही करू पाहताहेत त्यांना किमान मदत तरी केली पाहिजे. पुढाकार घेऊन विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या १४ व्यक्तींच्या कार्याचा परिचय मिंटच्या १५ अॉगस्टच्या ‘स्पेशल एडिशन’मध्ये करून देण्यात आला आहे. अर्थात, ही यादी अपूर्ण असल्याचे संपादकीयात स्पष्ट केले आहे. सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आजही अनेक लढवय्ये निश्चित असणार…गरज आहे ती त्यांना ओळखण्याची आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याची!
धरणीधर बोरोः एकीकडे वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असताना काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यातील एकशिंगी गेंड्यांची संख्या मात्र गेल्या पाच वर्षांत तब्बल तीनशेने वाढली आहे. वाघांइतकाच धोका असतानाही एकशिंगी गेंड्यांची काळजी घेऊन त्यांना सुरक्षित ठेवण्याचे कार्य काझीरंगाचे फॉरेस्ट रेंज अॉफिसर धरणीधर बोरो आणि त्यांचे अडीचशे सहकारी करत आहेत. बोरो १९८७ पासून या सेवेत आहेत.
हर्ष मंदरः २००२ मधील गुजरात दंगलीने विषण्ण झालेल्या हर्ष मंदर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि समाजातील द्वेषभावना कमी कशी करता येईल यासाठी कार्यरत राहण्याचे निश्चित केले. भुकेलेल्यांना अन्न देणे आणि बेघरांना निवारा देणे, एवढं केलं तरी भारत आज प्रगतीपथावर राहू शकतो, अशी त्यांची भावना आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आखण्यातही हर्ष यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
नितीन कारानीः समलिंगी संबंधांना कायद्याने मान्यता मिळाल्याशिवाय समाजमान्यता मिळणार नाही आणि ती मिळवण्यासाठी लढणाऱ्यांपैकी एक म्हणजे नितीन कारानी. या विषयावर मतैक्य होईल असे नाही. तथापि, यासाठी कुणीतरी लढणे आवश्यक होते. ‘हमसफर ट्रस्ट’च्या मुख्य सदस्यांपैकी एक असलेल्या नितीन कारानी यांनी नेटाने हा लढा दिला. समलिंगी व्यक्तींसाठी गेल्या ३० वर्षांपासून प्रकाशित होणाऱ्या ‘बाँबे दोस्त’ या नियतकालिकाचा पुनरूद्धार करून त्याला आधुनिक स्वरूप देण्याच्या कामातही कारानी यांचा मोठा वाटा होता.
अनीष प्रधान आणि शुभा मुद्गलः संगीताच्या बाजारीकरणामुळे अनेक प्रतिभावान कलावंताना त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी वाव मिळत नाही. स्ट्रगल हा पूर्वीही होता; पण आता तो भीषण झाला आहे. आज तुमच्याकडे प्रतिभा असली, चांगला अावाज असला, एखादा वैविध्यपूर्ण अल्बम काढण्याची पूर्ण तयारी असली तरीदेखील म्युझिक कंपन्या जे चालतं तेच प्रकाशित करण्यावर भर देतात. अशा प्रतिभावान कलाकारांसाठी इंटरनेटचा रस्ता खुला करून देण्याचे काम अनीष प्रधान आणि शुभा मुद्गल या दांपत्याने केले. अंडरस्कोअर रेकॉर्ड्स या वेबसाईटवर कलाकार आपली गाणी अपलोड करून विकू शकतात. या साईटच्या माध्यमातून देशभरातील शेकडो कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
फ्लॅव्हिया अॅग्नेसः भारतीय समाजव्यवस्थेत महिलांचे स्थान उंचावण्यासाठी व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या फ्लॅव्हिया अॅग्नेस आज ६१ व्या वर्षीही तितक्याच हिरीरीने काम करतात. पेशाने वकील असलेल्या अॅग्नेस यांनी महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी १९९० मध्ये ‘मजलिस’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर शेकडो महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले अाहेत आणि पुढेही देत राहतील.
अनिल सद्गोपालः शिक्षणाच्या हक्कासाठी उभे आयुष्य वेचणाऱ्या ७० वर्षीय अनिल सद्गोपाल यांचा लढा आता कुठे यशस्वी होतोय. गेल्याच आठवड्यात लोकसभेत शिक्षण हक्क विधेयक मंजूर करण्यात आले. सहा ते १४ वर्षे वयोगटातील सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण आता दिले जाणार आहे.
महेश जयचंद्रः भारतीय भाषांमध्ये टाईप करण्यासाठी प्रमाणित कीबोर्ड ही अजूनही मोठी अडचण ठरते. इंग्लिश भाषेत केवळ २६ मुळाक्षरं असतात. आपण वापरतो त्या कीबोर्डवर १०१ कीज असतात. भारतीय भाषेतील प्रत्येक अक्षराला स्वतंत्र की असाईन करायची झाल्यास १५०० कीजदेखील पुरणार नाहीत. इंग्लिशमधील QWERTY कीबोर्डइतकाच सुलभ कीबोर्ड करण्यासाठी ‘ब्राह्मी कॉम्प्युटर्स’चे महेश जयचंद्र यांनी ‘ब्राह्मी’ हा नवा कीबोर्ड विकसित केला आहे. अर्थात, यासाठी त्यांना प्रचंड कष्ट उपसावे लागले आहेत. या रंजक प्रवासाची माहिती ‘मिंट’चे व्यवस्थापकीय संपादक आर. सुकुमार यांनी शब्दब्ध केली आहे.
अरुंधती नागः कलेला वाव देण्यासाठी अत्यंत माफक दरात व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साकेत ट्रस्टच्या संस्थापिका अरुंधती नाग. कर्नाटक सरकार आणि सर्वसामान्यांच्या मदतीतून उभ्या राहिलेल्या ‘राग शंकर’ सभागृहात केवळ अडीच हजार रुपयांत कोणत्याही कलेचा प्रयोग सादर केला जाऊ शकतो. दररोज एक प्रयोग झालाच पाहिजे, असा नाग यांचा आग्रह असतो.
सुमेरा अब्दुलालीः मुंबई आणि राज्यातील ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून सातत्याने लढा देणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्या. २००२ मध्ये त्यांनी सर्वप्रथम मुंबईतील ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. वर्षभरानंतर त्याचा विचार झाला व मुंबईसह राज्यभरात ‘सायलेन्स झोन’ तयार करून तिथे ध्वनीप्रदूषण होता कामा नये, असा आदेश न्यायालयाने दिला. गणेशोत्सवासह इतर सर्व सार्वजनिक उत्सवादरम्यान कमीतकमी ध्वनीप्रदूषण कसे होईल, याबाबत त्या प्रयत्नशील असतात.
नवीन किशोरः १९८२ पासून सातत्याने कला आणि संस्कृतीशी संबंधित पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या सीगल बुक्सचे संस्थापक. रविंद्रनाथ टागोर, महाश्वेतादेवी, मृणाल सेनांसह अनेक आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तकं सीगलने प्रकाशित केली आहेत.
दीप जोशीः फिलीपिन्स सरकारतर्फे देण्यात येणारा यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार दीप जोशी यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भारताच्या विकासासाठी गेल्या तीस वर्षांपासून झटणाऱ्या दीप यांनी १९८३ मध्ये ‘प्रदान’ (Professional Assistance for Development Action - PRADAN) या संस्थेची स्थापना केली. आज देशातील तीन हजारांहून अधिक खेड्यांत या संस्थेचे कार्य चालते.
सुनिती सॉलोमनः एड्सग्रस्तांच्या साठी चेन्नईत उभारलेल्या ‘वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रीसर्च अँड एज्युकेशन’च्या (वायआरजी केअर) संस्थापिका. भारतात १९८६ च्या दरम्यान सर्वप्रथम एड्सचे रूग्ण आढळले होते. देशातील पहिल्या सहा रूग्णांत चेन्नईतील एक १३ वर्षीय बालिकेचा समावेश होता. अपहरण करून वेश्याव्यवसायात ढकलून दिलेल्या या मुलीस एड्स झाला होता. ते पाहून डॉ. सुनितीचे हृदय हेलावले. एड्ससारख्या महाभयंकर रोगास कोणतीही निष्पाप व्यक्ती बळी पडू शकते याची जाणीव त्यांना झाली. या जाणीवेतून एड्सबाबत जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी १९९३ मध्ये ‘वायआरजी केअर’ची स्थापना केली.
सतीश कालराः दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून मुलांना नवे आयुष्य देणाऱ्या ‘द स्माईल ट्रेन’ या स्वयंसेवी संस्थेच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक. पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सतीश कालरा देश-विदेशातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये तब्बल तीस वर्षे सेवा करून २००० मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ‘द स्माईल ट्रेन’ या संस्थेशी स्वतःला जोडून घेतले. केवळ दहा हजार रुपयांत आणि ४५ मिनिटांच्या आत दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून संबंधित मुलाचे किंवा मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलता येऊ शकते, असे कालरा म्हणतात. कालरा यांच्या कार्यावर आधारित ‘स्माईल पिंकी’ या माहितीपटास यंदाचा ‘अॉस्कर’ पुरस्कारही मिळाला आहे.
या लोकांच्या कार्याची महती दोन-चार ओळींत खरंच सांगता येणार नाही. त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असल्यास ‘लाऊंज’ची ही ‘स्पेशल एडिशन’ तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा लाईव्हमिंट डॉट कॉम या साईटवर वाचू शकता.
No related posts.



August 20th, 2009 at 7:35 am
f-story open hot nahi ho