हॅव यू बिंग्ड?

Mon, Jun 1, 2009

Clone, Fantastic 5

हॅव यू बिंग्ड?

‘मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ स्टीव्ह बाल्मर यांनी सॅन्डिएगोतील ‘अॉल थिंग्ज डिजिटल’ या परिषदेत दोन दिवसांपूर्वी आपल्या नव्या सर्च इंजिनची घोषणा केली आणि आज हे नवे सर्च इंजिन भारतातील इंटरनेटधारकांसाठी उपलब्ध झालं. कोणीही नवीन सर्च इंजिन काढलं की त्याची तुलना लगेचच ‘गुगल’शी केली जाते. Bing हे मायक्रोसॉफ्टच्या नव्या सर्च इंजिनचं नाव. या नावासाठी बराच खल झाल्याचं स्टीव्ह बाल्मर यांनी सांगितलं. नाव छोटं असावं आणि सर्च या शब्दाला रिप्लेस करणारं क्रियापद व्हावं (I am Googling असं), अशा उद्देशानं Kumo, Hook, Bing, आणि Sift या चार नावांमधून Bing हे नाव निवडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नावात काय ठेवलंय, हे मान्य केलं तरी लोकांनी But It’s Not Google असं म्हणत आतापासूनच Bing ची हेटाळणी करावयास सुरवात केलीय. ‘गुगल’ची सवय मोडणे सहज शक्य नसलं तरी ‘बिंग’ काही बाबतीत ‘गुगल’हून सरस वाटतंय.

‘गुगल’प्रमाणे ‘बिंग’चं होम पेज अत्यंत साधं आणि डोळ्यांना आल्हाददायक आहे. ‘गुगल’च्या होमपेजवर लोगोव्यतिरिक्त कोणतीही इमेज नसते. ‘बिंग’ने इथं साच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होमपेजवर सतत बदलत राहणारे वॉलपेपर अशी संकल्पना राबवलेली दिसतेय. ‘गुगल’तर्फे कस्टम लोगो वापरले जातात. ‘मायक्रोसॉफ्ट’ या इमेजेसचा तशा पद्धतीने वापर करेल, असं वाटतंय.

आता या साईटच्या मुख्य कामाबद्दल बोलूयात. ‘मायक्रोसॉफ्ट’ पहिल्यांदा सर्च बिझनेसमध्ये उतरतंय, असं नाही. ‘लाईव्ह’ या सर्च इंजिनच्या माध्यमातून ते या व्यवसायात पूर्वीपासून होते. पण ‘लाईव्ह’ सर्चमधून मिळणारे रिझल्ट्स तितकेसे रिलेव्हन्ट नसल्याने एकदा वापर केल्यानंतर त्यातील ३० टक्के सर्फर्स ‘लाईव्ह’ सर्चपासून दूर जात असल्याची आकडेवारी ‘मायक्रोसॉफ्ट’कडे होती. याचा गांभीर्याने विचार करून त्यांनी सर्च रिझल्ट्सचा दर्जा आणि रिलेव्हन्सी वाढवण्याचा प्रयत्न केला. ‘बिंग’ या साईटमध्ये याचे परिणाम स्पष्टपणे जाणवतात. आता ‘लाईव्ह’ सर्च बंद होऊन त्याची जागा ‘बिंग’ घेणार आहे. Internet Users In India असा सर्च दिल्यानंतर ‘बिंग’ आणि ‘गुगल’ या दोन्हीवरून मिळणारे रिझल्ट्स जवळपास सारखेच होते. याचा अर्थ ‘मायक्रोसॉफ्ट’ने केलेली मेहनत फळाला अाली, असाच घ्यावा लागेल.

‘बिंग’वरून मिळणाऱ्या रिझल्ट्सच्या शेजारी रिझल्ट पेजवरील ‘मोस्ट रिलेव्हन्ट’ माहिती वाचता येते. थोडक्यात रिझल्टपेजचा ‘प्रिव्ह्यू’ पाहता येतो. संबंधित पेजवरील इतर लिंक्सही त्यात दाखवल्या जातात. त्या पेजवर किंवा थेट त्यातील एखाद्या लिंकवर जाता येतं. या नव्या फीचरमुळे ‘रिझल्ट पेज हॉपिंग’ करावे लागणार नाही. परिणामी वेळेची मोठी बचत होणार आहे. बहुअर्थी कीवर्डसाठी डाव्या बाजूस दाखवल्या जाणाऱ्या ‘रिलेटेड सर्चेस’मुळेही तुमचा वेळ वाचू शकतो. उदा. ‘Madagascar’ असा सर्च दिल्यास शेजारी मादागास्कर मूव्ही, एअर मादागास्कर, मादागास्करचा इतिहास असे ‘रिलेटेड सर्च’ येतात. ‘बिंग’ला एक ‘इंटेलिजन्ट’ सर्च इंजिन म्हणून प्रस्थापित करण्याचा पुरेपूर प्रयत्न ‘मायक्रोसॉफ्ट’ करत असल्याचे ‘बिंग’च्या रिझल्ट्सवरून दिसून येते. उदा. मुंबई ते दिल्ली अशा आशयाच्या सर्चसाठी शेजारच्या पॅनेलमध्ये ट्रॅव्हल अॉप्शन्स येतात, एलसीडी टीव्ही असा सर्च दिल्यास शेजारी नवे एलसीडी टीव्ही, स्वस्त एलसीडी टीव्ही आदी माहिती येते, टायफॉईड असा सर्च करणाऱ्यास टायफॉईडची लक्षणे जाणून घेण्याची इच्छा आहे हे समजून शेजारी त्याची लक्षणे, उपचार आदी माहिती येते.

इमेज सर्चमध्येही ‘बिंग’ ‘गुगल’च्या तोडीने उतरले आहे. ‘गुगल इमेज सर्च’ सर्वाधिक लोकप्रिय असले तरी त्यातून हवी तशी इमेज मिळवण्यासाठी बराच वेळ खर्ची घालावा लागतो, याचा अनुभव तुम्हाला अाला असेलच. ‘गुगल’मध्ये इमेज साईज, कलर आणि कन्टेन्ट (फेसेस, न्यूज, क्लिप आर्ट, लाईन ड्रॉईंग) या निकषांच्या आधारे अॅडव्हान्स सर्च करता येतो. ‘बिंग’मध्ये साईज, लेआऊट, कलर, स्टाईल आणि पिपल या पाच निकषांच्या आधारे इमेज सर्च करणे शक्य आहे. उदा. तुम्हाला भारतीय संस्कृती दर्शविणारा चेहरा हवा असेल तर India असा सर्च देऊन पिपल या निकषामधून फेसेस असा उपनिकष लावत तुम्ही भारतीय व्यक्तीचा चेहरा मिळवू शकता. ‘गुगल’मधून मिळणाऱ्या इमेज सर्च रिझल्टपेक्षा ‘बिंग’मधून मिळणाऱ्या सर्चचा दर्जा तुलनेने वाटतोय. ‘बिंग’ इमेज सर्चची अाणखी एक चांगली बाब म्हणजे यात ‘पेज नेव्हिगेशन’ वापरलेले नाहीये. त्यामुळे तुम्ही स्क्रोल करत पेजच्या शेवटी आलात की पुढे आणखी एक पेज लोड होते. या ‘इनफायनाईट स्क्रोल’मुळे बराच वेळ वाचू शकतो. व्हिडीओ सर्चसाठीही लेन्थ, स्क्रीन साईज, रिझोल्यूशन आणि सोर्स असे चार निकष ठेवण्यात आले आहेत. याशिवाय सर्च रिझल्टमध्ये येणाऱ्या व्हिडीओवर कर्सर नेल्यास व्हिडीओ थेट प्ले होतो. या ‘प्रिव्ह्यू’ फीचरशिवाय ‘बिंग’मध्येच व्हिडीओ प्ले करून पाहताही येतो.

एखाद्या व्यक्तीची सर्च पॉप्युलॅरिटी किती आहे हे सांगणारे xRank हे फीचरही ‘मायक्रोसॉफ्ट’ने सुरू केले आहे. एखाद्या व्यक्तीच्या अॉनलाईन लोकप्रियतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हे फीचर कामाला येऊ शकते.

ही पोस्ट लिहण्यासाठी जो काही वेळ लागला, तेवढ्या वेळातच मी ‘बिंग’च्या प्रेमात पडलोय. ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ म्हणतात ना, तसंच काहीसं झालंय. ‘गुगल’शी दोन-हात करण्यासाठी अनेक सर्च इंजिन आले आणि गेले; पण ‘मायक्रोसॉफ्ट’ यावेळी नक्की बाजी मारेल, असं दिसतंय. ‘बिंग’ लोकप्रिय करण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ सुमारे आठ ते दहा कोटी डॉलर्स खर्च करणार असल्याचेही सांगण्यात येते. या कॅम्पेनचा ‘बिंग’ला सुरवातीला फायदा नक्कीच होईल…आणि तो कायम राखण्याइतपत ताकद त्याच्यात नक्कीच आहे! ‘बिंग’ वापरल्यानंतर तुम्हालाही ही गोष्ट नक्कीच जाणवेल. तेव्हा - गो, बिंग युवरसेल्फ!

Click on images and navigate to see Bing in action.

bing-home

india-general-image-search

india-advanced-image-search

madagascar-related-search

related-searches

Read: Some tips on using Bing

No related posts.

, , , , , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro