- नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)
- व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #3)
- प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न (Paul Buchheit)
- लाँग लिव्ह ‘वेब’! (Tim Berners-Lee)
- एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)
- इन्स्पायर्ड बाय पीपल (Axel Meyer)
मागील भागांतः ‘अॅपल’चा पुनरुद्धार आणि ‘अायपॉड’ क्रांती
‘आयफोन’ नावाची जादू ः
२००१ मध्ये सादर केलेल्या ‘आयपॉड’साठी स्टीव्हने ‘आयट्यून्स’ नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. या सॉफ्टवेअरच्या आधारे ‘आयपॉड’ आणि कॉम्प्युटर एकमेकांना जोडता येऊ शकत होते. ‘अॅपल’च्या ‘आयस्टोअर’मधून गाणी विकत घेणे, पॉडकास्ट्स डाऊनलोड करणे वगैरे गोष्टींसाठी ‘आयट्यून्स’चा वापर करता येतो. ‘आयपॉड’ बाजारात आल्यानंतर ‘पोर्टेबल म्युझिक प्लेयर’ म्हणताच तरुण पिढीच्या डोळ्यासमोर फक्त ‘आयपॉड’ येत असे. पण मोबाईल फोन ही देखील गरज बनल्याने लोकांना मोबाईल, ब्लॅकबेरी आणि आयपॉड अशा दोन-दोन तीन-तीन गोष्टी बाळगाव्या लागत असे. या तिन्ही गोष्टी देणारे एखादे ‘डिव्हाईस’ बाजारात आणावे, असा विचार स्टीव्हच्या डोक्यात घोळू लागला.
अर्थात, त्यावेळी ‘अॅपल’ अशा नव्या ‘डिव्हाईस’साठी तयार नव्हते; कारण त्यासाठी नव्याने अॉपरेटिंग सिस्टिम तयार करावी लागणार होती, मोबाईल फोन अॉपरेटर्सशी बोलणी करावी लागणार होती आणि नेटवर्क स्पीडसारख्या बाबींचाही अभ्यास करावा लागणार होता. २००४ पर्यंत सर्वकाही उत्तम चाललेले असताना स्टीव्ह एका वेगळ्याच चिंतेत पडला. ‘अायपॉड’च्या माध्यमातून येणारा महसूल वरचेवर वाढत होता हेच स्टीव्हच्या चिंतेचे कारण होते. बाजारात येणाऱ्या नवनव्या मोबाईल फोन्समुळे भविष्यात ‘आयपॉड’ला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार होता, हे स्पष्ट होते. त्यामुळे ‘अॅपल’लादेखील नव्याने विचार करणे भाग होते. यातून मार्ग काढण्यासाठी स्टीव्हने एक शक्कल लढवली.
‘मोटोरोला’सोबत करार करून ‘मोटो रॉकर’ या फोनवर ‘अायट्यून्स’ उपलब्ध करून दिले. पण सिंपल आणि मिनिमल डिझाईनचे चाहते असलेल्या स्टीव्ह आणि जोनाथनला ‘मोटो रॉकर’चे डिझाईन पाहून हसावे की रडावे, हे कळेना. स्वतःची कंपनी नसल्याने ‘मोटो रॉकर’च्या डिझाईनमध्ये ते हस्तक्षेपही करू शकत नव्हते. स्टीव्हने त्याचवेळी ठरवले की, म्युझिक, इंटरनेट आणि मोबाईल फोन यांचा संगम असलेले एक ‘डिव्हाईस’ तयार करायचे आणि तिथेच ‘आयफोन’च्या निर्मितीचे बीज रोवले गेले.

'मॅकवर्ल्ड २००७' मध्ये स्टीव्ह जॉब्जने 'अायफोन' जगासमोर सादर केला. 'आयफोन'चा डिझायनर जोनाथन ईव्हला पहिला कॉल करून स्टीव्हने त्याला त्याच्या कामाची शाबासकीच दिली.
स्टीव्हच्या कल्पनेतील हे ‘डिव्हाईस’ तयार करण्यासाठी पुन्हा एकदा जोनाथनवर विश्वास टाकण्यात आला. जोनाथनने १९९२ मध्ये ‘अॅपल’मध्ये काम करण्यास सुरवात केली होती. त्यावेळी त्याने ‘अॅपल मेसेज पॅड’ नावाच्या एका उत्पादनावर काम केले होते. ‘टचस्क्रीन पर्सनल डिजिटल असिस्टंट’ असे त्या उत्पादनाचे स्वरूप होते. ‘अॅपल न्यूटन’ नावाने हे उत्पादन बाजारात सादर देखील करण्यात आले; पण ते अल्पायुषी ठरले. हा अनुभव लक्षात घेता या नव्या फोनच्या डिझाईनची जबाबदारीदेखील जोनाथनवर टाकण्यात आली. पण यावेळचे आव्हान जड होते. स्टीव्ह अनेक डगरींवर पाय ठेवून होता. जोनाथनच्या नेतृत्त्वाखाली २०० इंजिनिअर्सच्या समूहाला कामाला लावून तो मोबाईल अॉपरेटर्ससोबत चर्चा करत होता. ‘२००७ च्या मध्यास माझ्या कल्पनेतील उत्पादन जगासमोर असेल; आणि या उत्पादनाने तुमच्या ग्राहकसंख्येत आणि कॉलसह डेटा युसेजमध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होईल,’ अशी खात्री तो मोबाईल अॉपरेटर्सना देत होता. २००६ संपायला तीन-चार महिने उरलेले असताना स्टीव्हने या ‘डिव्हाईस’चे प्रोटोटाईप पाहण्यासाठी मीटिंग बोलावली. त्या मीटिंगमध्ये स्टीव्ह इतका शांत होता की, त्यामुळे इतरांना कापरे भरले. स्टीव्ह एवढा शांत कधीच नसतो. पण त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये जे प्रोटोटाईप सादर केले गेले, त्यात अनेक त्रुटी राहून गेल्या होत्या. ‘परफेक्शनिस्ट’ स्टीव्हला हे अजिबात सहन झाले नाही. मीटिंगच्या शेवटी तो केवळ एक वाक्य बोलला, “We don’t have a product yet.”
पुढचे तीन-चार महिने ‘प्रोजेक्ट पर्पल २’ (‘आयफोन’ प्रोजेक्टचे कोडनेम) मधील सर्व इंजिनिअर्स अक्षरशः रात्रीचा दिवस करून काम करत होते. ‘आयफोन’च्या निर्मितीदरम्यान प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. ‘प्रोजेक्ट पर्पल २’ वर काम करणाऱ्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनिअर्सच्या टीम्स स्वतंत्र बसवण्यात आल्या होत्या. हार्डवेअर टीम ज्या सर्किट बोर्डवर काम करत असे त्यात फेक सॉफ्टवेअर लोड केलेल असायचे आणि सॉफ्टवेअर टीम ज्या सर्किट बोर्डवर काम करत असे ते सर्किट बोर्ड लाकडी खोक्यात बसवलेले असायचे. ‘आयफोन’ जगासमोर सादर करण्यापूर्वी अॅपलमधील केवळ तीस उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीच ‘आयफोन’चे मॉडेल पाहिले होते. एटी अँड टीशी बोलणी करायला जाणारे अधिकारी ‘इन्फिनिअॉन’ कंपनीच्या नावाने जात असत.
अशा पद्धतीने गोपनीयता पाळत स्टीव्हच्या कल्पनेतील फोन साकार झाला. स्टीव्हने जानेवारी २००७ मध्ये झालेल्या ‘मॅकवर्ल्ड एक्स्पो’मध्ये पहिल्यांदा ‘आयफोन’ सादर केला. तोपर्यंत त्याने अमेरिकेतील ‘एटी अँड टी’ (पूर्वीची ‘सिंग्युलर’) सोबत करार केला होता. केवळ ‘एटी अँड टी’ची सेवा वापरणारे अमेरिकन ग्राहक ‘आयफोन’धारक बनू शकणार होते. प्रसारमाध्यमांतून झालेल्या ‘हाईप’मुळे ‘आयफोन’ने केवळ अमेरिकेतील ग्राहकांनाच नव्हे; तर जगभरातील तरुणांना वेड लावले होते. अखेर जून २००७ मध्ये ‘एटी अँड टी’ आणि ‘अॅपल’ने ‘आयफोन’ लाँच केला. ‘आयफोन’ घेण्यासाठी लोकांनी रात्रीपासून रांगा लावल्या होत्या. अॉनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या अमेरिकेत २००७ मध्ये असे दृश्य पाहायला मिळेल, अशी कल्पनादेखील कोणी केली नव्हती. पहिल्या तीस तासांत सुमारे दोन लाख सत्तर हजार ‘आयफोन्स’ची विक्री झाल्याची नोंदही आहे. स्टीव्ह आणि जोनाथनने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले होते. नंतर टप्प्याटप्प्यांत ‘आयफोन’ इतर देशांत सादर करण्यात आला. आज जगातील सर्व प्रमुख देशांत ‘अायफोन’ उपलब्ध असून एकूण पावणेदोन कोटी लोक ‘आयफोन’धारक झाले आहेत.
१९९२ ते २००९ या १७ वर्षांच्या काळात ईव्हने फक्त ‘अॅपल’ आणि ‘अॅपल’चाच विचार केला आहे. ‘अॅपल’शी असलेल्या घट्ट ऋणानुबंधांमुळे त्याला ग्राहकांच्या गरजा पुरत्या समजल्या आहेत. त्यामुळेच जोनाथनच्या ‘सिंपल’ आणि ‘मिनिमलिस्टिक’ डिझाईन्सनी जगाला भुरळ पाडली आहे. एवढे यश पाठिशी असूनदेखील जोनाथनचे पाय जमिनीवर आहेत. माझे बहुतांश डिझाईन्स निसर्गावरून प्रेरित असतात, असे तो प्रांजळपणे सांगतो. पत्नी हीथर आणि जुळ्या मुलांसह तो सॅनफ्रान्सिस्कोतील ट्विन पीक्स भागात दोन बेडरूमच्या घरात राहणाऱ्या जोनाथनकडून भविष्यातही अशीच ‘इनोव्हेटिव्ह’ उत्पादने पाहायला मिळतील, हे नक्की!
(संदर्भः वायर्ड, बिझनेस वीक)
(समाप्त)
Related posts:



April 16th, 2009 at 11:43 am
thanks for writing about Jonathan. Apple che products khup chhan (pan mahag) asatat. imac, ipod, macbook aani iphone che design Jonathan ne kele aahe…mag macbook air koni design kela aahe? i think mac book air che design mhanje sagalyat challenging task asel…