आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)

Mon, Apr 6, 2009

Clone, Fantastic 5

आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
This entry is part 3 of 9 in the series Pioneers

अडीच वर्षांची कठोर मेहनत आणि तब्बल २०० पेटंट्सनंतर ‘अॅपल’चा क्रांतीकारी ‘आयफोन’ जगासमोर आला. २००७ मधील ‘मॅकवर्ल्ड एक्स्पो’त ‘अॅपल’चे सीईओ स्टीव्ह जॉब्ज यांनी हातात ‘आयफोन’ घेऊन जॉनी ईव्हचा नंबर डायल केला. जॉनी समोर प्रेक्षकांत बसला होता. सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या क्रांतीकारी मोबाईल फोनवरून पहिला कॉल जॉनीला करून स्टीव्हने त्याला त्याच्या कामाची शाबासकीच दिली होती. जॉनी उर्फ जोनाथन पॉल ईव्ह - स्टीव्हच्या डोक्यातील अफलातून कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करतो. स्टीव्ह जॉब्जसारख्या ‘परफेक्शनिस्ट’ व्यक्तीसोबत काम करणे किती कठीण असते याची जॉनीला पूर्ण कल्पना आहे; कारण तो स्वतःदेखील तितकाच ‘परफेक्शनिस्ट’ आहे. ‘अॅपल’चा डोलारा कोसळत असताना स्टीव्हचे झालेले पुनरागमन आणि त्यानंतर झालेल्या कायापालटाचा साक्षीदार म्हणून जॉनीकडे पाहिले जाते. आयमॅक, पॉवरबुक मॅकबुक, आयपॉड आणि अायफोन अशा एकाहून एक सरस उत्पादनांचा निर्माता जोनाथन आणि त्याने तयार केलेल्या उत्पादनांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात.

Update: ‘फास्ट कंपनी’ या नियतकालिकाने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 Most Creative People च्या यादीत जोनाथन ईव्ह पहिल्या क्रमांकावर आहे.

जुलै १९९७ मध्ये ‘अॅपल’ची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. १९९३ पासून लागलेली आर्थिक घरघर थांबण्याचे नाव घेत नव्हती. कंपनीचा शेअर वरचेवर ढासळत होता. दरम्यान अंतर्गत वादामुळे ‘अॅपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांची संचालक मंडळाने हकालपट्टी केली होती. त्यानंतर स्टीव्ह काही काळ अज्ञातवासात गेले आणि कंपनीचा कारभार गिल्बर्ट अमेलियो यांच्या हातात गेला. गिल्बर्ट यांनी कंपनीची परिस्थिती सुधारण्याकरता भरपूर प्रयत्न केले. तथापि, महत्त्वाचे निर्णय चुकल्यामुळे कंपनीच्या शेअर्सने तीन वर्षांतील नीचांक गाठला. या कारणामुळे संचालक मंडळाने गिल्बर्ट यांना हटवून स्टीव्ह जॉब्ज यांची हंगामी ‘सीईओ’पदी नेमणूक केली. स्टीव्हने सूत्रे हातात घेतल्यानंतर कंपनीच्या उत्पादनांची संख्या साठवरून थेट चारवर आणली. या तडकाफडकी निर्णयामुळे त्याने अनेक कर्मचाऱ्यांची नाराजी अोढवून घेतली. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायदेखील नव्हता. किंबहुना, त्याच्या डोळ्यांसमोर पुढच्या दहा वर्षांचा प्लॅन स्पष्ट होता. कमीतकमी, पण दर्जेदार आणि आकर्षक उत्पादनांची निर्मिती करून अॅपलचा पुनरुद्धार करणे!

स्टीव्ह जॉब्ज आणि जोनाथन ईव्ह या जोडगोळीने कॉम्प्युटर, म्युझिक प्लेयर आणि मोबाईल फोन यांची व्याख्याच बदलून टाकली.

स्टीव्ह जॉब्ज आणि जोनाथन ईव्ह या जोडगोळीने कॉम्प्युटर, म्युझिक प्लेयर आणि मोबाईल फोन यांची व्याख्याच बदलून टाकली.

स्टीव्हच्या स्वप्नातले पहिले उत्पादन होते ‘आयमॅक’. ‘अॅपल’ची मॅकिन्तोष अॉपरेटिंग सिस्टिम वापरून एक आकर्षक पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आणण्याचे त्यांनी योजले. Apple is the most design-savvy company in the world, and it’s because of Steve Jobs - ‘अॅपल’चे माजी डिझायनर रे रिली यांचे हे वाक्य अनेक गोष्टी सांगून जाते. ‘अॅपल’ची घसरलेली गाडी पुन्हा रूळावर आणण्याचा विडा उचललेल्या स्टीव्हने या ‘ड्रीम प्रोजेक्ट’साठी ‘आयबीएम थिंकपॅड’चा डिझायनर रिचर्ड सॅपर, प्रसिद्ध कार डिझायनर जॉर्जेटो ज्युजारो (फेरारी, बीएमडब्लू, लँबोर्घिनीच्या अनेक मॉडेल्सचे डिझायनर) आणि सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि इंडस्ट्रियल डिझायनर एटोर सोत्सास यांना पाचारण केले. प्रोजेक्टवर काम करण्यास सुरवात करण्यापूर्वी स्टीव्हची नजर जोनाथनच्या प्रोफाईलवर पडली. जोनाथनचे प्रोफाईल पाहून स्टीव्ह प्रचंड खूश झाला. त्याला ज्या प्रकारचा माणूस हवा होता, तो त्याला कंपनीतच मिळाला. स्टीव्ह आणि जोनाथन यांच्या तारा जुळल्या आणि दोघांनी मिळून एक नवा इतिहास रचला.

२५ वर्षीय जोनाथनने १९९२ मध्ये ‘अॅपल’मध्ये नोकरी करण्यास सुरवात केली. लंडनमधील न्यू कॅसल पॉलिटेक्निकमधून डिझाईन विषयातील शिक्षण पूर्ण केलेल्या जोनाथनने वयाच्या २२ व्या वर्षीच एका मित्राच्या सहकार्याने लंडनमध्ये ‘टँगरीन’ नावाची डिझाईन कन्सल्टन्सी सुरू केली. पुढे एका फेलोशिपसाठी अमेरिकेत गेला असताना ‘अॅपल’मधील काही सहकाऱ्यांशी त्याची ओळख झाली आणि १९९२ मध्ये त्याने ‘अॅपल’मध्ये नोकरी पत्करली.

जोनाथनची पहिली निर्मिती...

जोनाथनची पहिली निर्मिती...

‘आयमॅक’ या नव्या उत्पादनासह ‘अॅपल’च्या सर्व उत्पादनांचे रिडिझाईन करण्याची जबाबदारी स्टीव्हने जोनाथनवर सोपवली. घराच्या एका कोपऱ्यात धूळ खात पडलेला मळकट डबा म्हणजे कॉम्प्युटर ही व्याख्या बदलून कॉम्प्युटर म्हणजे शो-अॉफचे एक साधन, एक स्टाईल स्टेटमेंट अशी करण्याचे काम जोनाथनने सुरू केले. गर्द निळ्या रंगाच्या पारदर्शक केसिंगमुळे ‘आयमॅक’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १९९८ मध्ये अमेरिकेत इंटरनेटने वेग घेण्यास सुरवात केली होती. त्यामुळेच स्टीव्हने या उत्पादनाला ‘इंटरनेट फ्रेंडली’ करण्याचे ठरवून त्याच्या नावातच ‘आय’ (इंटरनेट) जोडले होते. केवळ दोन स्टेपमध्ये इंटरनेट अॉन करा, अशी जोरदार जाहिरात झाल्याने ‘अॅपल आयमॅक’चे ब्रँडनेम प्रस्थापित होण्यास फार वेळ लागला नाही. पहिल्या पाच महिन्यांतच आठ लाख ‘आयमॅक’ची विक्री झाली आणि ‘अॅपल’मध्ये पाच वर्षांनंतर पहिल्यांदा ‘प्रॉफिट’ हा शब्द ऐकायला मिळला. जोनाथन ईव्हसह न्यूझीलंडच्या डॅनी कोस्टरने (आयमॅक प्रोजेक्टवरील डिझायनर) ‘अॅपल’ला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले होते.

‘आयमॅक’च्या स्वरूपात बाजारात आलेल्या ट्रेन्डी पर्सनल कॉम्प्युटरने तरुण पिढीला आकर्षित केले. स्टीव्हची योजना यशस्वी झाली होती. स्टीव्हने१९९८ मध्ये जोनाथनला इंडस्ट्रियल डिझाईन विभागाच्या उपाध्यक्षपदी बढती दिली. पुढे जोनाथनच्या टीमने ‘आयमॅक जी ५’ ची निर्मिती करून डेस्कटॉप कॉम्प्युटरदेखील किती आकर्षक असू शकतो, हे सिद्ध करून दाखवले. आज आपण ‘अॅपल’चे जे डेस्कटॉप वापरतो ते ‘आयमॅक जी ५’ मालिकेतले आहेत. ‘पॉवरबुक’, ‘मॅकबुक’ आणि नुकत्याच लाँच झालेल्या ‘युनिबॉडी मॅकबुक’च्या डिझाईनचे श्रेयही जोनाथनलाच जाते.

१९९८ मध्ये पहिल्यांदा जगासमोर सादर झालेल्या आयमॅकचे रूप असे बदलत गेले.

१९९८ मध्ये पहिल्यांदा जगासमोर सादर झालेल्या आयमॅकचे रूप असे बदलत गेले.


They (Jonathan Ive and his team) have turned these gray frumpy objects called computers into desirable pieces of sculpture you’d want even if you didn’t use them.

जोनाथनचा मित्र फॅशन डिझायनर पॉल स्मिथने दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया जोनाथनला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल…
(पुढील भागातः ‘अायपॉड’ क्रांती)

Series Navigation«व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2)»

No related posts.

,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

0 Comments For This Post

2 Trackbacks For This Post

  1. आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2) | Fantastic Five Says:

    [...] Clone, Fantastic 5 Hello there! If you are new here, you might want to subscribe to the RSS feed for updates on this topic.Powered by WP Greet Boxआधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1) [...]

  2. आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #3) | Fantastic Five Says:

    [...] the RSS feed for updates on this topic.Powered by WP Greet Boxमागील भागांतः ‘अॅपल’चा पुनरुद्धार आणि ‘अायपॉड’ क्रांती ‘आयफोन’ [...]

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro