पुस्तकाचे नाव : इन द नेम ऑफ ऑनर
लेखक : मुख्तार माई
अनुवाद : उल्का राऊत
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत : 80 रुपये.
का वाचावे? : मुख्तारच्या वेदनांशी, तिच्या लढ्याशी एकरूप होण्यासाठी आणि एका अबलेचा सबल लढा अनुभवण्यासाठी…
बलात्कार म्हणजे काय?
कायदेशीर भाषेत या शब्दाची व्याख्या असली, तरी जिच्यावर बलात्कार झालाय, तिच्यासाठी तो कितीतरी भयानक अनुभव असतो. स्त्रीचं “शील’ किती महत्त्वाचं असतं, हे मुलीच्या मनावर अगदी लहानपणापासूनच बिंबवलं जातं. याशिवाय खरंतर शरीरसुख किंवा सेक्स हा ज्याचा त्याचा अतिशय खासगी अनुभव असतो. त्याबाबत ज्याची त्याची काही मतं असतात. ती कोणासाठीतरी राखून ठेवलेली असतात. तो एक सुंदर भावनिक कोष असतो.
बलात्कार होतो, तेव्हा हा कोष तर फुटतोच; पण त्याचबरोबर जी मानखंडना होते, जो अपमान होतो, तो वेगळाच असतो. तो माणूस म्हणून तर असतोच; पण त्याहीपेक्षा स्त्रीत्वाचा असतो. पुरुषांची ही अरेरावी आणि ओरबाडणूक अतिशय किळसवाणी आणि अपमानास्पद असते. त्यात आपला समाज त्या स्त्रीच्या जखमांवर फुंकर न घालता मीठ ओतण्यातच धन्यता मानतो. अशावेळी त्या स्त्रीसमोर आत्महत्या हाच पर्याय शिल्लक राहतो… आणि जी स्त्री आत्महत्येचा “सर्वमान्य’ पर्याय सोडून ठामपणे जगण्याचा प्रयत्न करते, तिच्यावर होणारे शाब्दिक अत्याचार तर अतिशय टोकदार आणि धारदार असतात.
त्यातच ही स्त्री, जर पाकिस्तानमध्ये राहणारी असेल तर? तिच्यावर झालेला सामूहिक बलात्कार ही तिच्या भावाने केलेल्या एका “गुन्ह्या’ची शिक्षा असेल तर?
पाकिस्तानातील मुख्तार माईवर हा प्रसंग 2002सालच्या जून महिन्यात ओढावला होता. तिचा अवघा बारा वर्षांचा भाऊ गावातील उच्च जातीतील मुलीशी बोलला, असा तिच्यावर आरोप होता. तिच्या भावाला अमानुष मारहाण झाली, ती झालीच; पण मुख्तारवर साऱ्या गावासमोर सामूहिक बलात्कार करण्याचा आदेश पंचायतीनं दिला. मुख्तार या अत्याचारानं खचून गेली नाही. तिनं या गोष्टीची तक्रार पोलिसांत गुदरली. न्याय मिळविण्यासाठी ती लढली. तिला यशही मिळालं. त्या साऱ्या बलात्काऱ्यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं शिक्षा ठोठावल्या. पाकिस्तान सरकारनं तिला नुकसान भरपाईही दिली.
मुख्तारचं काम संपलं नाही. तिनं त्या भरपाईचा उपयोग करून गावात मुलींसाठी एक शाळा बांधली. त्या शाळेत ती स्वत:ही शिकते आहे. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू अशी ठाम समजूत असणाऱ्या गावात मुलींसाठी शाळा चालवणं किती कठीण असतं, हे तिचं तिला ठाऊक. आजही मुख्तार ताठ मानेनं जगते आहे. तिनं मुलींना शहाणं करण्याचा, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचा विडाच उचलला आहे. काही मानवाधिकार संघटनांमुळे तिची कहाणी जगाला समजली. तिला वेगवेगळ्या देशांतून बोलावणी येऊ लागली. मग मात्र पाकिस्तान सरकार बिथरलं. त्यांनी तिच्यावर निर्बंध घातले. तिचा पासपोर्टही जप्त करण्यात आला.
तिच्यावर पहिला अन्याय झाला होता, तेव्हा तिला किमान सरकारची तरी साथ होती. आज सरकार आणि समाज तिच्या विरोधात आहे, तरीही मुख्तार ठामपणे लढतेच आहे. तिच्या खटल्यातील काही आरोपींची सुटका झाल्यानं तिच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. मुख्तार माईनं आपली ही हृदयद्रावक तरीही प्रेरक कहाणी “इन द नेम ऑफ ऑनर’ या पुस्तकातून शब्दबद्ध केली आहे. मेहता पब्लिशिंग हाउसनं हे पुस्तक मराठीमध्ये प्रकाशित केलं आहे. उल्का राऊत यांनी हा अनुवाद केला आहे. जिनं हे सारं सोसलं आणि सोसते आहे, तिनंच मूळचं पुस्तक लिहिल्यामुळे त्यात एकप्रकारचं प्रवाहीपण आहे. ते पुस्तक वाचत असताना वाचकही तो अनुभव घेत असतो. अनुवादामध्ये हे ओघवलेपण हरविण्याची शक्यता असते; कारण प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्याच्या वेदना भाषांतरकारानं घेतलेल्या नसतात. या पुस्तकाचं मात्र तसं झालेलं नाही. अनुवाद असूनही हे पुस्तक वाचताना आपण मुख्तारच्या वेदनांशी, तिच्या लढ्याशी एकरूप होतो, हे विशेष. हा एका अबलेचा सबल लढा आहे, हे आत कुठेतरी जाणवत राहतं हे या पुस्तकाचं “यश’ म्हणावं का?
No related posts.



Leave a Reply