नमस्कार मित्रांनो…
अशी काही भाग्यवान माणसं असतात की ज्यांचं अक्षर मुळातच सुंदर असतं. काही लोकांचं अक्षर अतिशय गिचमिड असतं; तर काही लोकांचं अक्षर हे प्रत्यॆकवेळी वेगळं येतं. ज्यांना आपलं अक्षर सुधारावं असं वाटतंय, त्यांच्यासाठी आज या अक्षर सुधारण्यासाठीच्या पाच फॅन्टास्टिक टिप्स.
अक्षर सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यासाठी कॅलीग्राफी यायला पाहिजे का? मुळीच नाही. काही सोप्या गोष्टी जरी तुम्ही केल्यात तरी तुमचं अक्षर सुधारलेलं तुम्हाला आढळेल.
- सगळ्यात आधी अशा पेनची निवड करा की ज्याचा वापर करून तुम्हाला लिहायला आवडेल. मग ते फाऊंटन पेन असो वा बॉलपेन असो वा जेल पेन. योग्य त्या पेनची निवड ही एक महत्त्वाची पायरी आहे. आणि हो… महागडं पेन म्हणजे चांगलं पेन असं नाही. ज्या पेननी लिहिताना तुम्ही अगदी सहजपणे न अडखळता लिहू शकाल असं पेन तुम्ही निवडू शकता.
- या नंतर अर्थात तुम्ही ज्या कागदावर अथवा वहिवर प्रॅक्टिस करणार आहात त्या कागदाची अथवा वहीची निवड. या कागदावर आखलेल्या लाईन्स जास्त डार्क असू नयेत. कागद हा शाई फुटणारा नसावा आणि या लाईन्स अशा आखलेल्या असाव्यात की तुम्हाला लिहीताना सोपं जाईल. मग त्या डबल लाईन बुक असो किंवा फोरलाईन बुक असो. बाजारात मिळणारे चौकोनी लाईन्स असणारे आलेख पेपर्स किंवा चार्ट पेपर्सही तुम्ही वापरू शकता.
- तुमच्या मित्रमंडळींपैकी ज्यांचे हस्ताक्षर तुम्हाला आवडते त्या हस्ताक्षराचा नमुना मदतीला घ्या. जेणेकरून तुम्हाला त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होईल. अर्थात असा नमूना पाहिजेच असे काही गरजेचे नाही.
- आता प्रत्यक्ष लिखाणाला सुरवात करताना तुमचा लिहिण्याचा स्पीड बऱ्यापैकी कमी करा. प्रत्येक अक्षर काढताना त्याच्या वळणाकडे लक्ष द्या. नुसतं सुंदर अक्षर येण्यापेक्षा दोन अक्षरांमध्ये सारखेपणा येणे फार आवश्यक आहे. तुम्ही केलेले लिखाण काळजीपूर्वक बघा. त्यामधली अशी अक्षरं शोधून काढा की ज्यामध्ये सारखेपणा नाही. या अक्षरांच्या वळणांकडे नीट लक्ष द्या. या ठराविक अक्षरांची वळणे घोटवा. त्यांच्या सुरवातीच्या आणि शेवटच्या स्ट्रोक्सकडे लक्ष द्या. यानंतर अक्षरांकडे वळा. दोन अक्षरांच्या स्पेसींगकडे लक्ष द्या. आवश्यक तिथे सुधारणा करा आणि ते शब्द तसेच लिहिण्याची प्रॅक्टिस करा.
- एखादे वाक्य ‘टेस्ट सेंटेन्स’ म्हणून निवडा. आणि दर आठवडयात ठराविक दिवशी ते वाक्य लिहित जा. अक्षरलेखनाचा सराव सुरू असताना त्यात होणारी तुमची प्रगती तुम्हाला त्या वाक्याच्या लिखाणातून दिसून येईल. शेवटी सराव हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे.
(बोनस टिप: तुम्ही जर उजव्या हाताने लिहित असाल तर डाव्या हातानी लिहिण्याचाही सराव करा. त्यामुळे लिखाणाकडे आणि अक्षरांच्या वळणांकडे जास्त लक्ष केंद्रीत होते. लिहिण्याचा जास्त विचार केला जातो आणि नकळत अक्षर सुधारण्याला मदत होते.)
Related posts:


November 26th, 2009 at 1:26 pm
Good tips,
pan hya zalya mothansathi, chhotansathihi kahi tips dilya tar chhan hoil. mazi chhoti aata lihayala suruwat karat aahe. tichya hatala suruwatilach changale valan lagawe hyasathi maza prayanta chalu aahe. tya ashene ha lekh nivadala khara pan have te sapadale nahi.
pan mala swatasathi upyukta aahe. additions kelyas khup anand hoil.