लेखकः विनायक
बहुचर्चित ‘गंध’ हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवांतून गाजल्यानंतर सर्वसामान्य प्रेक्षकांपुढे येण्यासाठी ‘गंध’ला बराच वेळ लागला. या चित्रपटाने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या किंवा कसे, हे येत्या काही दिवसांत कळेल. या चित्रपटाने माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही यावर मी लिहित आहे. कदाचित माझ्या या लिखाणातून हा चित्रपट कसा आहे, याचा काहीसा अंदाज तुम्हाला येईल. नेहमीच्या धाटणीपेक्षा हे जरा वेगळ्या अंगाने केलेले परीक्षण तुम्हाला रुचेल, ही अपेक्षा.
पहिला प्रश्न म्हणजे ‘गंध’ हा चित्रपट मी का पाहिला?
’गंध’ हे नांव अनेक फेस्टिवलमधून गाजत होतेच. त्यातच त्याला तीन ‘झी गौरव पुरस्कार’ मिळाले. त्यामुळे हा चित्रपट बघायचा, हे मनाशी ठरवले होतेच. याशिवाय सचिन कुंडलकरविषयी एक कुतूहल होते. सर्वांत शेवटचे कारण म्हणजे या चित्रपटाचा कलादिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक माझे खास मित्र आहेत. या सर्वाचा परिपाक म्हणून ‘गंध’ पाहिला.
‘गंध’ या चित्रपटामागची मूळ संकल्पना काय आहे?
‘गंध’ किंवा वास - आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा पण दुर्लक्षित घटक - अतिपरिचयात् अवज्ञा झालेला! दररोजच्या जीवनात आपल्याला क्षणोक्षणी अनेक वासांना सामोरे जावे लागते; पण आपण त्याची विशेष दखल घेत नाही. त्याला वेगळे वास म्हणून ट्रीट करत नाही. तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला असतो. त्याची दखल घेतो तो फक्त आपला ‘सबकाँशस’ मेंदू. आपल्या जाणीवा आपल्या नकळत त्यावर रिअॅक्ट होतात आणि म्हणूनच आजतागायत चित्रपटांनी ‘गंधाचा आभास’ आपल्याला करून दिला नव्हता. साधारणत: समाजातील घटकांवर चित्रपट बनवला जातो, पण त्यात ‘गंध’ नेहमीच दुर्लक्षित राहिला. म्हणूनच वातावरण निर्मितीच्या, संवादाच्या आणि संगीताच्या माध्यमातून हा आभास लोकापर्यंत पोचविणे, एखाद्या वासाची अनुभुती करून देणे ही या चित्रपटाची मूळ संकल्पना आहे.
ही संकल्पना पडद्यावर कशी साकारली गेली आहे?
‘गंधा’ला केंद्रस्थानी ठेवून तीन वेगवेगळया कथांतून ही संकल्पना साकार घेत जाते. या तीनही कथा अतिशय भिन्न अशा तीन पार्श्वभूमींवर घडतात; पण या कथेच्या सगळ्या प्रसंगातून वासाला महत्वाचे स्थान आहे. वासाशिवाय या तिन्ही कथा अपूर्ण आहेत. या कथा घडत असतात आणि ‘वास’ एक कॅरॅक्टर म्हणून काम करतो. मध्येच कधीतरी समोरच्या प्रेक्षकालादेखील अचानक तो वास आल्याचा भास होतो. आपणच त्या ठिकाणी असल्याचे वाटते. इथेच चित्रपटाचा हेतू साध्य होतो.
ही झाली आऊटलाईन, पण प्रत्यक्षात कथा कशी घडत जाते?
पहिली कथा म्हणजे अमृता सुभाष व गिरिष कुलकर्णीची - लग्नाच्या वयाची मुलगी( A Bride to be.). जुन्या पुण्याच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही खेळकर प्रेमकथा. लग्नाला आलेली व अनेकांनी नकार दिलेली अमृता सुभाष म्हणजेच वीणा - ज्या संस्थेत क्लार्क असते, तिथल्या एका चित्रकाराच्या प्रेमात पडते. हा चित्रकार रात्री अगरबत्ती वळण्याचे काम करत असतो. काही विनोदी तर काही भावनिक प्रसंगातून, ही कथा खुलत जाते. रंगभूमीवर कलाकृतीच्या धाटणीने ही कथा पुढे जात जाते आणि एके दिवशी अचानकपणे ती आपले प्रेम घरी जाहीर करते. या अनोख्या प्रेमाची ही कथा . दुसरी कथा एका फॅशन फोटोग्राफरची - औषध घेणारा माणूस ( A Man on Medicines.). सारंग त्याचे नाव. त्याला एडस् झालेला आहे. त्यामुळे तो एकाकी पडलेला असतो. बायकोसकट घरातले सगळे त्याला सोडून गेलेले असतात. अशातच त्याला दोन वर्षांनी भेटायला त्याची बायको येते. एव्हाना मधल्या काळात या रोगामुळे तो वासाची जाणीवच विसरलेला असतो आणि मग त्या दोन तासांत घडणारे प्रसंग, त्यातून उलगडत जाणारे त्यांचे नाते दुसरी कथा दाखवते. तिसरी आणि शेवटची कथा कोकणातील -बाजूला बसलेली बाई( A Woman sitting aside.) या नावाची. जानकी (नीना कुलकर्णी) नावाच्या बाईची ही कथा. या संपूर्ण कथेला पावसाची पार्श्वभूमी आहे. ही कथा एक जुने, रूढी-परंपरा मानणारे कोकणी घर दाखवते. यात मासिक पाळीच्या कारणामुळे घरातल्याच स्त्रिला चार दिवस घरात जन्मलेले बाळ कसे बघता येत नाही, त्यामुळे तिची कशी तडफड होते, याचे चित्रण केलेले आहे. पण हे वरवरचे कथाकथन झाले.
पण प्रत्यक्षात छोटया-मोठया प्रसंगातून या कथा छान रंगविल्या आहेत. या प्रसंगांतून गंधाची अनुभूती कशी मिळते, हे पडद्यावर पाहणेच उचित ठरेल.
चित्रपटातील कलाकार, पार्श्वसंगीत, दिग्दर्शन इत्यादी कामे कशी झालेली आहेत?
तीन कथांमध्ये विभागलेला हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. सोनाली कुलकर्णी, गिरिष कुलकर्णी, मिलिंद सोमण, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष यांना आपापली कामे चोख केली आहेत. ठराविक प्रसंगात अमृता सुभाषमध्ये ‘अवघाचि संसार’ डोकावलेला दिसतो. ते होणारच म्हणा! तरीही सर्वांचे काम उत्तम झालेले आहे. मिलिंद सोमण म्हटल्यावर मर्यादा येणारच; पण तरीही त्याने बऱ्यापैकी काम केले आहे असे म्हणायला हरकत नाही. नेहमीप्रमाणे नीना कुलकर्णी भाव खाऊन जाते, हे वेगळे सांगायला नको. विशेषतः दिलेल्या व्यक्तीरेखेत प्रत्येक कलाकार चपखल बसला आहे.
पण, खरं सांगायचं तर या सर्वाहून उत्तम काम पडद्यामागील कलाकारांनी केले आहे. एखाद्या गोष्टीचा, त्यातही वासाचा आभास निर्माण करणे ही काही खायची गोष्ट नाही. पण कला दिग्दर्शकांनी त्या तिन्ही सिच्युएशन्स अशा काही उभ्या केल्या आहेत की निम्मी बाजी तिथेच मारली जाते. चित्रपटनिर्मितीपूर्व अभ्यास आणि बारकावे कसे असावे याचा हा चित्रपट उत्तम नमुना आहे. याशिवाय छायाचित्रण आणि काहीशा वेगळया संगीतामुळे हा प्रभाव अधिक गडद झाला आहे. चित्रपटात एकही गाणे नसताना आणि साध्या कथा असताना हा चित्रपट एक-दोन प्रसंग वगळल्यास रटाळ वाटत नाही, यातच त्यांचे खरे यश आहे व त्याची पावती त्यांना ‘झी गौरव’ आणि ‘व्ही. शांताराम’ पुरस्कारातून मिळालेली आहे.
या चित्रपटाकडून आणि विशेषत: सचिन कुंडलकरकडून असणाऱ्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो का?
बेशक! या चित्रपटाची गेल्या काही दिवसात जी प्रसिद्धी झाली ती योग्यच होती, असे चित्रपट पाहताना जाणवते. सचिन कुंडलकरांबद्दल बोलायचे तर, गेल्या काही वर्षात ‘छोटयाशा सुट्टीत’ सारखी नाटके, ‘रेस्टॉरंट’, ‘निरोप’ सारखे काही चित्रपट यामुळे सचिन कुंडलकरांची एक इमेज तयार झाली आहे. आशयघन नाटके आणि चित्रपटे देण्यात ते माहिर आहेत. विशेषत: आपल्या कलाकृतीत विविध प्रयोग करूनही ते त्यावर ‘प्रायोगिक’ चा शिक्का बसू देत नाहीत. हे सगळे निकष हा चित्रपटदेखील पूर्ण करतो. मात्र अधे-मध्ये ‘कुंडलकरी स्टाईल’ डोकावत राहते. विषेशतः दुसऱ्या कथेत. कदाचित, कथा, पटकथा, संवाद तीनही त्यांचेच असल्याने असे झाले असावे. बाकी उत्तम.
मग या चित्रपटात काही दोष आहेत का नाहीत?
आहेत. काही वेळा कथेचा वेग कमी जास्त होतो. त्यामुळे आलेला टेंपो निघून जातो, तर पहिल्या कथेला पकड घ्यायला वेळ लागतो. दुसऱ्या कथेत एडस झालेल्या माणसाला वास येत नाही असे दाखवले आहे. पण ते सत्य आहे का नाही, हे समजणे महत्वाचे आहे. असे काही ढोबळ दोष आहेत. पण चित्रपटाचा एकूण प्रभाव पाहता, ते चालून जातात.
केवळ वासाची अनुभुती या एकाच मुद्दयावर अडीच तासांचा चित्रपट बनू शकतो का?
नाही. व्यावसायिक गणिताच्या दृष्टीने तर नाहीच नाही. म्हणूनच हा एक चित्रपट नसून तीन शॉर्ट फिल्म्स आहेत - ज्या एकत्र केल्या आहेत आणि वास हा त्यांचा ‘लसावि’ आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे हा फक्त चित्रपट फक्त वासावर आधारित नाही. तसे असते तर हा चित्रपट उथळ आणि बटबटीत वाटला असता. या चित्रपटातून विविध मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत, त्याचे होणारे परिणाम, भारतीय रूढी-परंपरा अतिशय परिणामकारकरित्या दाखविले आहेत. त्यामुळेच अनेक प्रेक्षक चित्रपट संपल्यानंतर भावूक होतात. त्यामुळे साहजिकंच चित्रपटाला एक बैठक प्राप्त झालेली आहे -जी चित्रपटाला वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवते.
‘गंध’, ‘गाभ्रीचा पाऊस’,'जोगवा’ असे चित्रपट हे बदलणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचे दाखले आहेत का?
खरं सांगायचं तर एखाद्या बाबतीत बदल हा सतत होत असतो. बदल काय झाला हे पाहणे महत्वाचे असते. त्यामुळे या चित्रपटांना फार तर आपण चांगले बदल असे म्हणू शकतो. विशेषत: ‘श्वास’ आल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टी बदलली. मराठी चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञान, भरपूर पैसा आणि व्यावसायिकता आली. पण अशा बदलांना फारसे महत्व देण्याची गरज नाही. कारण कधी ना कधी हे घडणारच होतं. या चित्रपटांमुळे झालेला खरा बदल म्हणजे मराठी चित्रपटांना आशयघनता आली. तमाशापट, टुक्कार विनोदीपट यातून मराठी सिनेमा बाहेर पडला. थोडक्यात म्हणजे, क्लास आणि मास दोघांना सामावणारे चित्रपट निघू लागले.
आणि हो, सर्वांत महत्वाचा बदल झालाय तो प्रेक्षकांच्या अभिरूचीत. आजकालचा प्रेक्षक दिवसभराच्या कामकाजात, टेन्शनमध्ये इतका गुंतला आहे की, त्याला नवीन कोणती स्टोरी ऐकायला वेळच मिळत नाही. त्यामुळेच, ‘गंध’, ‘वळू’ असे आपल्या जीवनातले चित्रपट त्याला आवडायला लागले आहेत. त्या चित्रपटातील पात्रात तो स्वत:ला पाहतो. म्हणूनच त्याला ते आवडतात. मग साहजिकच तो विचारही करू लागतो. माध्यमकृपेमुळे बरेवाईट ऐकून ‘गाभ्रीचा पाऊस’ मुंबईतही हाऊसफुल असतो. हा खरा बदल! त्याचवेळी ‘शिवाजीराजे…’ ही जोरात चालतो. याचा अर्थ, आजच्या घडीला आशय आणि मनोरंजन हातात हात घालून चालत आहेत. याला आपण काहीही म्हणू, काळाचा महिमा वगैरे…पण हा बदल सुखावह आहे आणि तो टिकणे गरजेचे आहे. थोडक्यात काय, तर ‘गंध’ हा या बदलत्या प्रवाहाचा प्रतिनिधी आहे. तो नेहमीचेच सांगतो पण वेगळया भाषेत, वेगळया शैलीत. त्यामुळे सगळयात असून वेगळा असणारा हा चित्रपट पाहून एकदा तरी गंधीत होऊन याच…!
Related posts:


August 29th, 2009 at 11:14 pm
’गंध ’ चे केलेले विवेचन-परामर्ष आवडला. लवकरात लवकर गंध, गाभीचा पाऊस व शिवाजीराजे पाहावयास मिळेल अशी आशा आहे. अन्यथा मायदेशात गेल्यावरच,:(
कुंडलकरचे आधीचे सिनेमे पाहिले असल्याने उत्सुकता आहेच.ती आपल्या लिखाणाने वाढवली.
September 10th, 2009 at 5:12 am
“Gandh”che parikshan vachalyvar cinema lavkarat lavkar baghavasa vatato. Ekade yenare koni asale tar DVD magavun nakkich baghin.To yog kevha yeto te baghayache.