- कलेची मूलतत्त्वे (Fundamentals of Art #1)
- रेषांचे प्रकार (Fundamentals of Art #2)
- आकार किंवा फॉर्म (Fundamentals of Art #3)
- संकल्पचित्र निर्मिती (Fundamentals of Art #4)
- िडझाईन म्हणजे नेमकं काय? (Fundamentals of Art #5)
- िडझाईन अथवा सौंदर्याकृतीची तत्त्वे (Fundamentals of Art #6)
- छायाप्रकाश किंवा शेड अँड लाईट (Shade & light) (Fundamentals of Art #7)
आपण आतापर्यंत बघितले की कलेच्या कुठल्याही आविष्काराला काही निश्चित तंत्र किंवा पद्धत अथवा नियम असतात. या तंत्रांचे किंवा नियमांचे पालन करून जी सौंदर्याकृती निर्माण होते तिला सौंदर्याकृती किंवा डिझाईन असं म्हणतात. ही तत्त्वे कोणती ते आता बघू…
१. पुनरावृत्ती (Repetition) :
याप्रकारात तुम्ही जो फॉर्म किंवा आकार घेऊन डिझाईन तयार करू इच्छिता त्या फॉर्मची पुनरावृत्ती केलेली असते. यामध्ये त्या आकाराची गती कायम ठेवणे अपेक्षित असते. यामध्येही दोन उपप्रकार आहेत.
- नियमित पुनरावृत्तीः यामध्ये ज्या आकाराची पुनरावृत्ती करणार त्या आकाराची एकसारखी, ठराविक ठिकाणी, ठराविक अंतरावर पुनरावृत्ती केलेली असते. याप्रकारच्या डिझाईनचे उदाहरण म्हणजे साडीची बॉर्डर किंवा गॅलरीच्या कठड्यांचे डिझाईन.
- अनियमित पुनरावृत्ती: आपण ज्याप्रमाणे नियमित पुनरावृत्तीचे उदाहरण बघितले त्याच्या बरोबर उलट हा प्रकार. म्हणजे फॉर्म तोच; मात्र त्याची लांबी, रूंदी कमी जास्त होत असत. तसेच कमी-अधिक अंतरावर कुठेही त्या आकाराची पुनरावृत्ती केलेली असते.
२. बदल (Interchange):
डिझाईन करताना लक्षात ठेवण्याचा हा एक महत्त्वाचा घटक. एखादा विशिष्ट आकार घेऊन डिझाईन तयार करताना त्यात स्थिती, आकारमान आणि आकार या तीन घटकांमध्ये आपण बदल करू शकतो. डिझाईन इलेमेंट किंवा फॉर्म अथवा आकाराच्या दिशेचा बदल करणे (एक सुलट तर एक उलट) हा झाला स्थितीतील बदल. एक वस्तू किंवा फॉर्म मोठ्या आकाराचा तर एक छोट्या आकाराचा वापरणे हा झाला आकारमानातला बदल. आणि या दोन्ही प्रकारांच्या आकारांची पुनरावृत्ती करणे हा झाला आकारातला बदल.
३. विस्तार (Radiation):
तुम्ही लहानपणी शाळेत असताना काढलेला सूर्य आठवा. एक गोल आणि भोवताली त्यापासून निघालेली किरणे. हा ही एक विस्ताराचा प्रकार आहे. या विस्तारामध्ये बिंदूपासून, केंद्रबिंदूपासून, आंसेपासून, पायापासून आणि वक्ररेषा असे पाच मुलभूत प्रकार आहेत. खाली दिलेली आकृती बघा म्हणजे समजायला सोपे जाईल. विस्ताराची माहिती असणे ही चांगले डिझाईन तयार करण्यासाठीची आवश्यक गोष्ट आहे.
४. प्रमाण (Proportion):
कुठल्याही वस्तूला एक ठरलेला बाह्याकार (Outline) असतो. जर डिझाईनमध्ये विविध आकार किंवा फॉर्म असतील तर त्या विविध घटकांचा एकमेकांशी त्यांच्या पार्श्वभूमीशी (Background), छायाप्रकाश (Shadow-light), रंग, रेषा इत्यादी माध्यमांतून जो परस्परसंबंध किंवा संवाद तयार होतो त्याला प्रमाण किंवा Proportion म्हणतात. अगदी सोपे उदाहरण द्यायचे तर एखाद्या माणसाचे नाक किंवा कान प्रमाणापेक्षा लहान किंवा मोठे असेल तर आपण चेहऱ्याच्या आकाराच्या मानाने प्रपोर्शन चुकले आहे, आहे असे म्हणतो. हेच प्रपोर्शनचे महत्त्व.
५. तोल (Balance):
कुठल्याही चित्रकृतीचा किंवा डिझाईनचा तोल हा रंग, आकार, रेषा यांच्या साह्याने सावरलेला असतो किंवा सावरता येतो. पाहणाऱ्याची नजर अथवा दृष्टी चित्रकृतीच्या सगळ्या भागांवरून सारखी फिरण्यासाठी हा तोल साधावा लागतो.
६. ताल (Rhythm):
यालाच लय असंही म्हणतात. ठराविक अंतराने, एकाच दिशेने उलट-सुलट वळणे घेत जाणारी वक्ररेषा किंवा अगदी सोपं उदाहरण म्हणजे सापाचे सरपटणे किंवा उदबत्तीच्या धुराचा गतीमान मार्ग हे लय दर्शवितात. चित्राकृती अथवा डिझाईनमधले घटक अथवा फॉर्म, छायाभेद (Contrast), रंग, पोत (Texture) यांच्या पुनरावृत्तीने (Repetition) जी रचना होते ती म्हणजे लय अथवा ताल होय.
आज इथेच थांबतो. परत लवकरच भेटू.
No related posts.



Leave a Reply