सोमवारः
सकाळी आठ वाजता अॉफिसमध्ये पोचलो तेव्हा डेस्कवरील लोकं ‘लीड स्टोरी’च्या शोधात होते. पानं भरण्यासाठी साठ ओळींच्या दोन ‘बेसमेंट स्टोरी’ज (पानाच्या तळातील बातम्या) आणि शंभरेक ओळींच्या संक्षिप्त बातम्याही त्यांना हव्या होत्या. सहसा वीकेन्डला काही चांगल्या स्टोरीज नक्की सापडतात. पण सर्दीचा प्रचंड त्रास होत असल्याने मला स्टोरीज करता आल्या नव्हत्या. आज शहराच्या मध्यवर्ती भागातील एक मोठी इमारत जमीनदोस्त करण्यात येणार होती. याचा ‘फॉलो-अप’ घेण्यास मला सांगण्यात आलं. डेस्कवरच्या लोकांना मोठे फोटो असलेल्या स्टोरीज खूप आवडतात; कारण त्याने खूप जागा भरली जाते. बिल्डरशी आणि पालिकेतील काही अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून मी एक स्टोरी तयार केली. त्यानंतर लंचसाठी बाहेर पडलो. रस्त्यावरून जाताना नव्याने लागलेल्या जाहिराती, सेल, सांस्कृतिक कार्यक्रम, ध्यानधारणा शिबिर यांची पोस्टर्स पाहत त्यावरील माहिती लिहून घेत होतो. अॉफिसमध्ये परत आल्यानंतर या सगळ्यावरून मला स्टोरीज तयार करायच्या होत्या. डेस्कवरील मंडळी प्रचंड काळजीत होती - कारण त्यांच्याकडे अजूनही ‘लीड स्टोरी’ नव्हती. मग त्यांनी स्पोर्ट््स डेस्कवरील एका शिळ्या बातमीला नव्याने फोडणी देण्याचे ठरवले. शहरातील एका १२ वर्षीय फुटबॉल स्टारची बातमी देण्याचे ठरले. या मुलाच्या वडिलांचा ‘कोट’ घे, असं मला सांगण्यात आलं. मी अमुक-अमुक पेपरमधून बोलतोय हे ऐकताच त्याच्या वडिलांनी खाड्कन फोन ठेवून दिला. त्यांना आमच्या पेपरशी बोलण्याची इच्छा नव्हती; कारण गेल्या वेळी आम्ही त्यांची ‘अतिरंजित’ स्टोरी छापली होती. संपादकांनी मला सांगितलं की त्यांनी पुन्हा फोन कर आणि तुमच्या ‘कोट’सह किंवा ‘कोट’शिवायदेखील आम्ही स्टोरी लावू, अशी धमकी दे. या धमकीला घाबरून त्याच्या वडिलांनी नाईलाज म्हणून ‘कोट’ दिला. मी ती स्टोरी फाईल केली आणि ‘पोस्टर स्टोरीज’ करण्यात दिवस घालवला.
आज मी एकूण ११ स्टोरीज फाईल केल्या. तीन लोकांशी फोनवर बोललो; एकालाही प्रत्यक्ष भेटलो नाही. एकूण १० तास काम केले आणि त्यापैकी केवळ एक तास अॉफिसबाहेर घालवला.
मंगळवारः
गूड न्यूज - स्टोरी छापून आल्यानंतरही त्या मुलाच्या वडिलांनी कोणताही तक्रार केली नाही!
बॅड न्यूज - संपादकांनी मला शहरातल्या विविध क्रीडा मंडळांना फोन करून आजच्या स्टोरीचा ‘फॉलो-अप’ घेण्यास सांगितलं. आता त्या मुलाचे वडिल नक्कीच भडकणार होते; कारण त्यांना नेमकं हेच नको होतं. मी सगळ्यांना फोन केले. कुणीही थेट प्रतिक्रिया देण्यास तयार होत नव्हतं. मग डेस्कवरील लोकांनी मला जुन्या स्टोरीज मधून त्यांचे ‘कोट्स’ काढून एक नवी स्टोरी तयार करायला सांिगतली. काल त्या मुलाच्या वडिलांशी तुझं बोलणं झालंय ना, त्यातून काही ‘कोट्स’ घे, असंही सांगितलं. यावरून त्यांची उद्याची ‘लीड स्टोरी’ होणार होती. माझ्या मनाविरूद्ध सगळं होत असल्यानं मी खचलो होतो. पण सांगणार कुणाला? मी निमूटपणे ती स्टोरी फाईल केली. अाणखी काही छोट्या-मोठ्या स्टोरीज देऊन जागा भरण्यास मदत केली. त्यानंतर त्यांनी मला दोन-तीन ‘स्मायलीज’ देण्यास सांगितले. रोज पान सातवर आम्ही दोन-तीन ‘फील गुड स्टोरीज’ लावतो. त्याला ‘स्मायलीज’ म्हणतात. या स्टोरीज वाचून वाचक आनंदी व्हावेत, असा मुख्य उद्देश असतो. पण आज माझ्याकडे अशी एकही स्टोरी नव्हती. मग शेजारच्या उपनगरात राहणाऱ्या माझ्या आईला मी फोन केला. आईने घरी येणाऱ्या स्थानिक पेपरातून दोन-तीन स्टोरीज वाचून दाखवल्या. मी त्या ‘स्मायलीज’मध्ये ‘कन्व्हर्ट’ करून फाईल केल्या.
आज मी एकूण १० स्टोरीज फाईल केल्या. आठ लोकांशी फोनवर बोललो; त्यापैकी दोघांना प्रत्यक्ष भेटलो. एकूण नऊ तास काम केले आणि एक मिनिटही अॉफिसबाहेर घालवला नाही.
बुधवारः
आज मी दोन तास चक्क अॉफिसबाहेर घालवले!
पालिकेतर्फे आज आणखी दोन इमारती पाडण्यात येणार होत्या. त्यामुळे उद्याची ‘लीड स्टोरी’ जवळपास पक्की होती. पण या इमारती पाडण्यासाठी मागवण्यात आलेली क्रेनंच रस्त्यात अडकली. मी त्या जागेवर पोचलो. तेथे हजर असलेल्या अधिकाऱ्यापैकी कुणीही बोलण्यास तयार नव्हतं. मी अॉफिसमध्ये परत आलो आणि यावर एक स्टोरी फाईल केली. ही स्टोरी उद्या ‘लीड स्टोरी’ करायचे ठरले! मग मी आणखी काही लोकांना फोन करून नव्या स्टोरीज फाईल करण्याचा प्रयत्न केला. सर्दी पुन्हा बळावल्याने डोकं जाम दुखत होतं. मी अॉफिसमधून लवकर निघालो. पण यामुळं इतर ट्रेनीज नाराज झाले; कारण त्यांना अचानक नवी ‘लीड स्टोरी’ तयार करण्यास सांगितलं गेलं. मी फाईल केलेली स्टोरी ‘लीड स्टोरी’ होऊ शकत नाही, याची डेस्कला ‘अचानक’ जाणीव झाली.
आज मी एकूण सात स्टोरीज फाईल केल्या. पाच लोकांशी फोनवर बोललो; एकाला प्रत्यक्ष भेटलो. एकूण साडे नऊ तास काम केले आणि त्यापैकी चक्क दोन तास अॉफिसबाहेर घालवले!
गुरूवारः
आज एक ‘लीड स्टोरी’ चक्क चालत अॉफिसमध्ये आली होती. एक तरुण आई आपल्या मुलांची तक्रार घेऊन आली. तिच्या मुलांच्या म्हणण्यानुसार ती त्यांचा नीट सांभाळ करत नव्हती. त्यामुळे तिला ‘महिला सुधार केंद्रात’ टाकावे, अशी त्या मुलांची मागणी होती. ती कामावरून परत आल्यावर तिची मुलं तिला दारही उघडत नसल्याची तक्रार तिने केली. अनेकवेळा पावसात तिला घराबाहेर उभं राहावं लागल्याचं ती सांगत होती. मी तिला म्हटलं, ‘काळजी करू नका. मी तुम्हाला पुन्हा फोन करून सविस्तर माहिती घेतो.’ पण मला मािहत होतं की, डेस्कवरील लोकांना या अशा स्टोरीत मुळीच रस नसणार. त्यांना ‘इन्स्टन्ट स्टोरीज’ लागतात. सखोल चौकशी वगैरे करण्याइतका वेळ त्यांच्याकडे कधीच नसतो. उद्याच्या ‘लीड स्टोरी’साठी मला एका मॅरेथॉनपटूची मुलाखत घेण्यास सांगितलं गेलं. हा नुकताच (म्हणजे महिन्याभरापूर्वी झालेल्या) एका मॅरेथॉन स्पर्धेत धावला होता आणि पन्नासावा आला होता. हे सगळं विसरून मी त्याला फोन केला आणि त्यावरून ‘लीड स्टोरी’ तयार केली. त्यानंतर काही ‘बेसमेंट स्टोरीज’ आणि संक्षिप्त बातम्यांची चळत करून दिली. वहीची मागची पानं चाळून एक मस्त ‘रिसायकल्ड स्टोरी’ तयार केली. पालिकेच्या साईटवरून माहिती डाऊनलोड करून आणखी एक-दोन स्टोरीज फाईल केल्या.
आज मी एकूण तेरा स्टोरीज फाईल केल्या. सहा लोकांशी फोनवर बोललो; त्यापैकी एकाला प्रत्यक्ष भेटलो. एकूण नऊ तास काम केले आणि त्यापैकी एकही मिनिट अॉफिसबाहेर घालवला नाही.
शुक्रवारः
शहरातील एक नव्या सुपरमार्केटवर एक स्टोरी कर, असं मला सांगण्यास आलं. या सुपरमार्केटमुळे किरकोळ दुकानदारांच्या व्यवसायावर कसा परिणाम होणार आहे, हा अँगल घेऊन स्टोरी करायची होती. बऱ्याच दिवसांनंतर एक चांगली स्टोरी करायला मिळणार, म्हणून मी आनंदात होतो. पण माझा आनंद लगेच मावळला; कारण ही स्टोरी करण्यासाठी त्यांनी मला केवळ दोन तास दिले होते. शिवाय आणखी काही स्टोरीज फाईल करायच्या होत्या. दुकानदारांना प्रत्यक्ष भेटून स्टोरी करण्याचे माझ्या मनात होते. पण ते शक्य नव्हतं. मग मी त्यातल्या काही जणांचे फोनवरंच ‘कोट्स’ घेतले. सुपरमार्केटच्या प्रतिनिधींशी बोलता आलं नाही. पण यावरून मी जी स्टोरी केली ती ‘लीड स्टोरी’ म्हणून चांगली झाली. आठवड्याच्या शेवटी आमच्या पेपरमध्ये एक चांगली ‘लीड स्टोरी’ छापून येणार होती. एकूण, आजचा दिवस छान गेला!
आज मी एकूण सात स्टोरीज फाईल केल्या. चार लोकांशी फोनवर बोललो; त्यापैकी एकासही प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. एकूण आठ तास काम केले आणि एकही मिनिट अॉफिसबाहेर घालवला नाही.
आठवड्याचा हिशोबः
या आठवड्यात मी एकूण ४८ (दररोज सरासरी १०) स्टोरीज फाईल केल्या. एकूण २६ लोकांशी बोललो, त्यापैकी केवळ चार लोकांना प्रत्यक्ष भेटू शकलो. रिपोर्टर असूनही संपूर्ण आठवड्यात अॉफिसबाहेर केवळ तीन तास घालवता आले.
तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला वाटतं, तसं वातावरण वर्तमानपत्रांच्या अॉफिसमध्ये कधीच पाहायला मिळत नाही. आम्ही कसे ‘चूझी’ आहोत (म्हणजे अशा बातम्या आमच्याकडे येत नाहीत), आम्ही किती काळजीपूर्वक ‘फॅक्ट्स’ तपासून पाहतो किंवा आम्ही कसे निःपक्षपाती आहोत, असा दावा वर्तमानपत्रात काम करणारे लोक करत असतात. पण आपण रोज ‘उघडे’ पडत असतो, ही साधी गोष्टदेखील यांच्या लक्षात येत नाही. यांची काम करण्याची पद्धतंच जरा निराळी असते. आपल्यासारख्या सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा औद्योगिक प्रकल्पात काम करणाऱ्यांना याची कदाचित जाणीव होणार नाही. आपल्याला फार-फार तर अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागतो; पण वर्तमानपत्रात काम करणाऱ्यांना मात्र दररोज मनाला मुरड घालून काम करण्याचे आव्हान असते. वरच्या डायरीवरून ही गोष्ट अधिक स्पष्ट झाली असेल. सगळं काही माहित असताना, समजत असताना, असं करणं बरोबर नाही, हे कळत असतानादेखील बहुतांशवेळा तसंच करावं लागतं, हे दुर्दैव!
असो. वर्तमानपत्रातील अशा अनेक गोष्टींचा उहापोह करणारं एक पुस्तक - ‘फ्लॅट अर्थ न्यूज’ सध्या वाचतोय. लंडमधल्या एका ‘टॅब्लॉईड’ वर्तमानपत्रात ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या रिपोर्टरच्या डायरीतली काही पानं लेखक निक डेव्हिस (‘गार्डियन’मधील वरिष्ठ पत्रकार) यांनी या पुस्तकात प्रसिद्ध केली आहेत. ती वाचल्यानंतर मन विषण्ण झालं. आपण जे काही वाचतो-पाहतो आणि ज्यावर विश्वास ठेवतो त्यामागे किती उथळ विचार असतो, याची जाणीव झाली. व्यावसायिक स्पर्धेतून रोज तीस-तीस, चाळीस-चाळील पानांचे वर्तमापत्र देण्याची चढाओढ सुरू असताना या पानांतून दिल्या जाणाऱ्या कन्टेन्टकडे कुणीच बघत नाही. या डायरीतील पानं वाचून हे ‘जर्नालिझम’ (Journalism) आहे की ‘चर्नालिझम’ (Churnalism), अशी शंका निकने व्यक्त केली आहे. ट्रेनी अवस्थेपासूनच असं बाळकडू पाजलं गेलं तर ही लोकं भविष्यात काय प्रकार करतील, अशी भीतीही वाटते. स्वतःला ‘मीडिया मोगल’ म्हणवून घेणाऱ्या रूपर्ट मरडॉकचं ‘खरं’ रूपही लेखक निक डेव्हिस यांनी आपल्यासमोर उलगडलं आहे. हे पुस्तक कुठे मिळाल्यास अवश्य वाचा आणि आपली मतं शेअर करा.
(अॅमेझॉनवर हे पुस्तक ११ डॉलरला उपलब्ध आहे.)
No related posts.


Leave a Reply