ती दोघं म्हणजे मेड फॉर इच अदर! त्याला ती आणि तिला तो! बास याशिवाय दुसरं काही घडूच शकणार नव्हतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांनी एकमेकांना पाहिलं होतं. अगदी त्या क्षणाला त्या दोघांनाही या “मेड फॉर इच अदर’ची जाणीव झाली होती. पहिले काही दिवस चोरटे कटाक्ष, लपूनछपून पाहणे, असे नेहमीचे प्रकार झाल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीमुळे ते एकमेकांशी बोलू लागले. म्हणजे तिची ती मैत्रिण, सविता, त्याच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहात होती. तिनं याच्याशी बोलणं सुरू केलं. त्यामुळे “ती’देखील याच्याशी बोलू लागली. हळूहळू त्यांचा सहा जणांचा मस्त ग्रुप जमला. ती दोघं, सविता, प्रशांत, अनुराधा आणि संतोष. हो… बोलण्याच्या ओघात त्या दोघांची नावं सांगायचीच राहिली… तर “तो’ म्हणजे अमित आणि “ती’ म्हणजे कीर्ती!
कॉलेजचे दिवस मस्त चालले होते. अभ्यास, उनाडक्या, पिक्चर, हॉटेलिंग, ट्रेकिंग सारं काही उत्तम चाललं होतं. या प्रवासात अमित आणि कीर्ती जवळ येत होते. त्यांच्या ग्रुपलाही ते जाणवलं होतं आणि त्यांनी एकमेकांशी याबाबत लवकरात लवकर बोलावं म्हणून ते प्रयत्नही करत होते. सवितानं तर ही जबाबदारी स्वतःवर घेतली होती. आणि एक दिवस नेहमीच्या कट्ट्यावर वडापाव आणि चहाच्या फेऱ्या सुरू असताना अमितनं साऱ्यांना हवीहवीशी वाटणारी घोषणा केली. तो आणि कीर्ती आता एकमेकांचे होते. त्यानं तिच्याकडे पाहिलं. ती गोड लाजली आणि साऱ्या ग्रुपनं जल्लोष केला. या गोड बातमीनिमित्त वेगवेगळे प्लॅन्स ठरवले. येऊ घातलेला रविवार मुकर्रर झाला. सकाळी सिंहगड. संध्याकाळी सिनेमा आणि रात्री जेवण असा बेत ठरला! त्यादिवशी फक्त अमित आणि कीर्तीच नाही, तर सारा ग्रुप जमिनीपेक्षा चार बोटं वर होता…
सिंहगडाची ट्रीप एकदम धमाल झाली. पिठलं, भाकरी आणि भजीनं रंगत आणली. आता वेध लागले होते, ते संध्याकाळच्या सिनेमाचे. प्रशांतनं तिकिटं काढून आणली होती. पिक्चर कोणता, हे कोणालाच माहिती नव्हतं. प्रशांत अजिबात सांगायला तयार नव्हता. बरं, तो थिएटरचं नावही सांगत नव्हता. नाहीतर पेपरमध्ये पाहता आलं असतं. सगळ्यांची उत्सुकता प्रचंड ताणून प्रशांतनं त्यांना ई-स्क्वेअरपाशी आणलं. त्यानं स्क्रीन कोणता ते सांगितलं आणि बाकीच्यांनी त्याला फक्त आडवा पाडून मारायचं बाकी ठेवलं. प्रशांतनं तिकिटं काढली होती “द रिंग’ या प्रचंड थरकाप उडवणाऱ्या भूतपटाची. व्हिडिओ पाहता पाहता त्यातून बाहेर येणारा आत्मा आणि मरणारी माणसं, अशी काहीशी थीम होती त्या सिनेमाची. एक प्रेम जुळल्याच्या आनंदात सिनेमा पाहायचा होता आणि प्रशांतनं तिकिटं आणली होती हॉरर फिल्मची! प्रशांतवरचा राग थोडाफार कमी झाल्यानंतर मंडळी जरा थिएटरमध्ये फिरू लागली… फिरता फिरता प्रशांतला टपल्या मारणं सुरूच होतं. बरं पिक्चरला टांग मारावी, तर त्यानं चांगली 143 रुपये दराची तिकिटं काढली होती. शेवटी अमितनंच सगळ्यांची समजूत काढली आणि प्रशांतची थोडावेळ का होईना, सुटका केली.
“”पण प्रशांत तुला हाच पिक्चर सापडला?” सवितानं विचारलं.
“”खरं सांगू का… अगं पिक्चर हॉरर आहे हे समजलंच नाही मला. नाव होतं “द रिंग’. त्यामुळे मला वाटलं, रोमॅंटिक असेल. आजच्यासाठी रोमॅंटिकच सिनेमा हवा ना… म्हणून मी ही तिकिटं काढली…” प्रशांतनं खरं कारण सांगितलं आणि बाकीच्यांना हसावं की रडावं ते समजेना…
बेल वाजली. सगळे थिएटरमध्ये गेले. अंधार झाला आणि सिनेमाला सुरुवात झाली. कोणी घाबरत, कोणी धीट असल्याचं दाखवत सिनेमा पाहू लागले…
“”आयला… काय रे हा पिक्चर… पोरींनो सॉरी; पण माझी सॉलिड फाटली…” प्रशांतनंच कबुली दिली.
“”शी बाई, यापुढे या प्रशांतला नको पाठवायला कुठल्याही कामासाठी,” अनुराधा म्हणाली.
“”च्यायला, ही केवढी घाबरली होती. मला घट्ट पकडून बसली होती. मधेच डोळे मिटायची. मधेच देवाचं नाव घ्यायची… माझा दंड दुखायला लागला राव…” संतोषनं अनुराधाला चिडवलं.
“”मग काय… संतोष तुझं बरंच आहे की… नाहीतर तुला एवढं चिकटून एक तरी मुलगी बसली होती का आजपर्यंत?” प्रशांतनं संतोषची खेचली.
“”शी काहीतरी काय…” आता अनुराधा कातावली.
“”आणि ही सविता… अरे बापरे. मला वाटलं आता ही सीटखालीच जाऊन लपते की काय…”
“”सीटखाली नाही; पण मला घरी पळून जावंसं वाटत होतं…” सवितानं कबुली दिली.
“”अरे पण हे नवदांपत्य का बोलत नाहीये?” प्रशांतनं विचारलं.
“”गप रे. ते अजून दांपत्य झालेले नाहीत. अजून वेळ आहे त्याला.” सविता म्हणाली.
“”आता तू माझ्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स काढू नकोस. मुद्दा एवढाच आहे, की ही दोघं गप्प का? का त्यांनी सिनेमा पाहिलाच नाही? आणि किमान त्या दोघांना कोपऱ्यातल्या सिटा मिळवून दिल्याबद्दल तरी मला शाब्बासकी द्या…” प्रशांत म्हणाला.
“”हो रे हो… शाब्बास हां बाळा… झालं समाधान? पण हे दोघं गप्प का? ए आम्या बोल की…” संतोषनं अमितला हाकारलं.
अमित आणि कीर्ती या सगळ्यांचं बोलणं ऐकत शांतपणे उभे होते. दोघांचाही चेहरा भेदरल्यासारखा दिसत होता.
“”काय रे आम्या… अरे बोल की… की वाचा बसली तुझी? अगं कीर्ती तू तरी बोल…” प्रशांत
“”काय बोलू मी. आत्ता नको बाई काही बोलायला. आपण जेवायला जाऊयात कुठेतरी. मग जेवता जेवता बोलू. आधी इथून बाहेर पडू…” कीर्ती म्हणाली.
“”आयला. दोघंही जाम टरकलेले दिसतायत. चला, कुठे जाऊया? राजवाडा?” संतोषनं विचारलं.
“”चालेल…”
राजवाड्यावर साऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. “प्लीज फक्त एकच, आज एवढा चांगला दिवस आहे…’ अशा अनेक विनवण्या करून त्यांनी पोरींकडून बिअरपुरती परवानगी मिळवली. “एक घोट तरी घेऊन पाहा. टेस्ट तरी करा…’ असं म्हणत सविताला एक घोट घेण्यासाठीही पटवलं. तिनंही धीर करून ग्लास तोंडाशी नेला; पण वासानंच तोंड वाकडं करून खाली आपटला. तिचं पाहून आसावरी मागे झाली. कीर्तीनं मात्र आख्खा ग्लास संपवला.
हॉटेलमधून बाहेर पडून सारे आपापल्या मार्गाला लागले. अमित आणि कीर्ती एकत्रच होते. “जपून जा रे…’, ‘अमित सांभाळून…’ “अरे तो कसला सांभाळून.. कीर्ते तूच सांभाळून राहा गं…’ असे अनेक सल्ले त्यांना निघेनिघेपर्यंत मिळत होते.
दुसऱ्या दिवशी ग्रुप अमित आणि कीर्तीची वाट पाहात होता; पण ती दोघं आलीच नाहीत. दोघांचे सेलही बंद होते. खरंतर, “आम्ही गेल्यावर तुम्ही काय काय केलंत…’ असं त्या दोघांना विचारण्यासाठी आणि उत्तर काढून घेण्यासाठी सगळे अगदी अधीर झाले होते… पण त्यांचा हिरमोड झाला. अखेरीस सवितानं अमितच्या घरी जावं, असा पर्याय निघाला.
“”काय झालं अमितला एकदम? आहो, काल तर चांगला होता. आज एकदम एवढं?” सविता अवाक होऊन अमितच्या आईशी बोलत होती.
“”अगं आम्हालाही कळत नाहीये. डॉक्टर म्हटले त्याला कशाचीतरी खूप भीती वाटली असावी. आजचा दिवस पाहू, नाहीतर उद्या त्याला ऍडमिट करू. काल काही झालं नाही ना गं? तुम्हाला काही वेगळं दिसलं का?”
“”नाही हो काकू. तसा काल आम्ही एक हॉरर पिक्चर पाहिला; पण एवढं आजारी पडण्यासारखं काहीही नव्हतं त्यात. मी नाही का उभी तुमच्यासमोर…”
“”पण मग नक्की झालं तरी काय?”
“”मी बोलू का अमितशी?”
“”आत्ताच झोपलाय तो. त्याला इंजेक्शन दिलंय डॉक्टरांनी.”
“”ठीक आहे. झोपू द्या त्याला. मी उद्या येते. आणि काही लागलं तर सांगा मला. मी समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहाते. 13 नंबरच्या फ्लॅटमध्ये.”
“”अनुराधा. अगं मी बोलतीये. अमित खूप आजारी पडलाय. त्याला कशाचीतरी भीती बसलीये म्हणे.
नाही गं… माझ्याशी नाही बोलला तो. झोपला होता.
मी नाही विचारलं. असं कसं विचारू, कीर्ती आली होती का म्हणून?
हो… त्यांना माहिती नाहीचए पण मला ऑड वाटलं; पण तू एक काम कर ना. तू जाऊन बघ ना कीर्तीकडे…
नाही आजच जा आणि मला फोन कर लगेच. तसं काही वाटलं, तर मग आपण बाकीच्यांशीही बोलू रात्री… जा… लगेच जा…”
“”काकू, कीर्ती आहे का?
मी अनुराधा.”
“”हो… ये गं ये.”
“”आज कीर्ती आली नाही ना कॉलेजला, म्हणून आले होते मी.”
“”अगं तिला ताप आलाय. काहीतरी बरळत होती. काय झालंय काहीच कळत नाहीये. डॉक्टरांना विचारलं, तर ते म्हणाले मोठा मानसिक धक्का किंवा खूप भीतीमुळे होतं असं. आज बरं वाटलं नाही, तर ऍडमिट करूया म्हटले…”
“”काय सांगता? पण झालं काय तिला? आणि कधीपासून बरं नाहीये तिला?”
“”अगं काल रात्री किंचाळत उठली ती. त्यानंतर हे असंच आहे. तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा काही झालं नाही ना?”
“”नाही हो. काही नाही. उलट खूप मजा केली आम्ही. बरं मी भेटू का तिला?”
“”झोपलीये ती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलंय.”
“”ठीक आहे. मग मी उद्या येते. माझा नंबर लिहून ठेवा तुम्ही आणि काही लागलं तर फोन करा…”
“”सविता… अगं कीर्ती पण आजारीच आहे. तिला पण कसलीतरी भीती वाटली असावी, असं डॉक्टरांनी सांगितलं.
नाही गं. झोपली होती ती…
असं कसं पण एकदम? आणि या दोघांनाच? काल रात्री आपण गेल्यावर काही झालं की काय?
नको. आत्ता नको बाकीच्यांना उठवायला. आपण उद्या बोलू कॉलेजवर. चल भेटू उद्या.”
“”छे… काहीतरी काय. असं कसं होईल. आणि एकावेळी दोघंही…” प्रशांत आणि संतोष चक्रावले होते.
“”हो. आम्ही दोघीही जाऊन आलोय त्यांच्या घरी.”
“”अगं पण…”
“”एक मिनिट… कीर्तीच्या घरून फोन आहे…”
“”हां काकू… काय? काय सांगता? ठीक आहे, मी येते. हो लगेच येते.”
“”काय झालं गं?”
“”कीर्तीला ऍडमिट केलंय. तिचा ताप उतरत नाहीये आणि ती किंचाळून उठते आहे.”
“”अरे बापरे… काय चाललंय काहीच कळत नाही.”
“”एक काम करू. सविता तू आणि मी हॉस्पिटलला जाऊ आणि तुम्ही दोघं अमितच्या घरी जा.”
“”ठीक आहे. लगेच निघूया मग…”
“”हॅलो… हां संतोष… नाही रे, कीर्ती अजूनही तशीच आहे. रादर तिची तब्येत अजून बिघडतेच आहे. सविता बसलीये तिच्याजवळ…. नाही रे… ती जवळच येऊ देत नव्हती तिला. खूप अस्वस्थ होती; पण कोणीतरी हवं ना जवळ… हो… तिची आई पण आहे तिथे. मी पण थांबते आहे… तुला कळवेन सगळं. बहुतेक सविता आज थांबेल इथं. मी घरी जाईन…. अरे, तिला काही प्रॉब्लेम नाही रे. एकटीच राहाते ती. मला जावंच लागेल ना… बरं ते सोड, अमित काय म्हणतोय?” अनुराधा.
“”अगं अमितही डाऊनच आहे. त्यालाही ऍडमिट करावं लागणार आहे. अगं किती भयानक ओरडतोय तो… आम्ही ऐकलं ना. फाटली आमची… सॉरी सॉरी… पण फार भयानक ओरडला गं तो… हो आम्ही पण थांबतोय इथं. त्याला ऍडमिट करावं लागलं, तर मदत होईल. आणि ऐक घरी निघताना फोन कर. जमलं तर मी येईन घ्यायला, म्हणजे कीर्तीलाही पाहीन. चल ठेवतो.”
***
“”सॉरी कीर्ती… मला काहीही पर्याय नाहीये… आता तू आणि तुझ्यानंतर अमित…”
******
“”सविता…”
“”काय हो काकू?”
“”जा जरा तुम्ही दोघी पाय मोकळे करून या. काहीतरी खाऊन या. मी आहे इथं.”
“”सविता… एक विचारू का?”
“”बोल की…”
“”काहीतरी भुताबिताचं नसेल ना गं?”
“”छे… काहीतरीच काय?”
“”मला उगाचच वाटलं बाई…”
“”खरं सांगू का… आता मलाही तसंच वाटायला लागलंय. यांच्यापैकी एखादा जरी शुद्धीवर आला, तरी समजेल.”
“”हो बाई… आणखी एक…”
“”बोल की…”
“”काही नाही.. तू फेशिअल केलंस का आज? तुझी स्कीन छान दिसते आहे…”
“”अनु… प्रसंग काय… पण लक्ष बारीक आहे हं तुझं… फेशिअल नाही केलं. गावाकडून आईनं लेप पाठवलाय. आंघोळीच्या आधी दहा मिनिटं लावायचा आणि नंतर धुवून टाकायचा… तुलाही देते उद्या. बघ वापरून…”
“”देच… बरं चल… काकू एकट्या असतील. काकांना वेळ लागेल बहुतेक. ते डॉक्टरांकडे गेलेत ना…”
“”चल… आणि तू निघ हवंतर. मला काय, इथं झोपले काय आणि रूमवर झोपले काय? हातातली कामं उरकते बसल्या बसल्या. फक्त उद्या लवकर ये. म्हणजे मी घरी जाऊन आवरेन…”
“”ठीक आहे.”
“”पण जाणार कशी तू?”
“”संतोष येतो म्हटला होता…”
“”वा… एकात एक जुळतंय वाटतं…”
“”काहीतरी बोलू नकोस…”
***
“”सॉरी अमित… मला काहीही पर्याय नाहीये… आता कीर्ती थांबली आहे बघ तुझी वाट पाहात… अरे… असे डोळे नको मोठे करूस… एक ताजी जोडी मिळाली, की माझं वर्ष सुटतं. नाहीतर काय त्रास होतात ते आमचं आम्हाला माहीत. तुमचं बरंय रे. मेलात की संपलं. आमच्या नशीबी तेही नाही. अरे आमचे हे भोग मेल्यानंतरचे आहेत ना… अरे… घाबरू नकोस असा… त्या पिक्चरसारखं नाही करणार मी… मला माहिती आहे, त्यावेळी तो पिक्चर बघताना तुम्हा दोघांनाही त्या आत्म्याच्या जागी मीच दिसत होते. नंतर घरी जातानाही… अगदी तू तिच्या जवळ आलास, तेव्हा तिला तुझा आणि तुला तिचा चेहरा त्या आत्म्यासारखा दिसला… नंतरही झोपेत तुम्हाला मीच दिसले होते… अरे… ओरडू नकोस. ओरडून काहीही फायदा नाही. मी काय बोलते आहे, ते कोणालाही समजत नाही; कारण मी फक्त तुलाच दिसते आहे. हो… तसं पाहायला गेलं तर मी आत्ता कीर्तीबरोबर आहे. म्हणजे तिच्या प्रेतासोबत. काल रात्रीच गेली ना ती… सगळे जमलेच इथं. आणि थोड्यावेळानं तुझ्याकडे धावतील… जाऊ दे. चालायचंच… चल डोळे मीट पाहू… तुझा जीवनरस पिऊ दे मला. अरे… पांढरा पडू नकोस असा… मी पाडणारच आहे तुला पांढरा…”
***
“”सविता… अमितच्या दवाखान्यातून फोन होता. तो पण गेला गं….”
एवढाच निरोप सांगून संतोष मटकन खाली बसला.
सविता, अनुराधा, संतोष आणि प्रशांत सुन्न होऊन बसले होते. परवा अगदी आनंदात असणारं ते जोडपं अचानकच संपलं होतं… का? काय झालं त्या रात्री? त्यांना अशी कोणती भीती वाटत होती?
अनेक प्रश्न होते त्यांच्या मनात; पण उत्तर? उत्तर देऊ शकणारे दोघंही शांत झाले होते…
***
अभिजितनं रूपारेलमध्ये पाऊल टाकलं… त्याला हेच कॉलेज हवं होतं. घरापासून लांब होतं; पण ते रूपारेल होतं… अर्थात अकरावीच्या, त्यातही मुलांच्या शाळेतून आलेलं पोरगं जेवढं “धीट’ असेल, तेवढाच तोही होता. बिचकत बिचकत वर्ग शोधत होता. बरोबर बरीच मुलं-मुली होती. त्यांच्याही चेहऱ्यावर “पहिला दिवस’ दिसत होता. अभिजित असाच अधांतरी फिरत असताना त्याला “ती’ दिसली… शिल्पा नाव तिचं. तिला पाहिलं आणि त्याला जाणवलं, की आपण “मेड फॉर इच अदर’ आहोत… शिल्पानंही त्याच्याकडे पाह्यलं. त्यांची दृष्टीभेट झाली आणि तिनं लाजून खाली मान घातली… तिच्याबरोबर तिची एक मैत्रिण होती. तिच्या ही गोष्ट लक्षात आली असावी… तिनं शिल्पाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांचा वेध घेत अभिजितकडेही पाहिलं… ती शिल्पाचा हात धरून अभिजितकडे जाऊ लागली. शिल्पाच्या ते लक्षात आलं. ती लटका विरोध करू लागली… पण मैत्रिण ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती अभिजितसमोर जाऊन उभी राहिली…
“”हॅलो… तू अभिजित ना? अरे मी तुमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहाते. आणि ही शिल्पा… तुझी डिव्हिजन कोणती?”
“”बी…” त्यानं चाचरत सांगितलं…
“”अरे वा… आम्ही दोघीही बी मध्येच आहोत. चला… मस्त झालं…”
“”अगं पण तुझं नाव सांग की..”
“”सॉरी सॉरी… बोलण्याच्या नादात राहूनच गेलं… मी सविता…”
Related posts:


September 16th, 2009 at 10:33 pm
अप्रतिम… शेवट एकदम रत्नाकर मतकरी स्टाईल केला आहे..
September 17th, 2009 at 3:34 pm
फ़ॅन्टास्टिक!!!!!…….
September 17th, 2009 at 8:50 pm
कसलं सही… जबदस्त!!!
October 6th, 2009 at 5:04 pm
sahi.mast ekadam
November 11th, 2009 at 6:58 pm
Mastach, vachalyache samadhan milale!
pan prashna punha ubha rahila jo mi lahan asatanahi mazyapudhe ubha rahayacha, bhoot he khare astitwat aahe ka? hahahahaha……
chhan aahe!
shevat bhannat aahe!
savi
December 28th, 2009 at 6:16 pm
Ekdum Bhannat…
January 4th, 2010 at 3:45 pm
shiiiiiiit……. mala kahi kallach nahi!! mi donda vachala… kay zala mhahje nakki?? ani madhunach abhijit n shilpa kay??? n te pandhara padnare te kon hota??? aaiga… solid complicated, in short mazya dokyavarun geliy…. mala vatala bhari love story asel… pan he kahitari bhalatach nighala….
March 9th, 2010 at 4:24 pm
Sunder!! Naad-Khula! Shewat awadala!!!
March 10th, 2010 at 4:52 pm
aiillllaaa …kay amazing story aahe … mala wachtana sudha bhiti watat hoti … mhanje ti sawitach aaste ka ji atma banun amit ani kirti chya marnacha karan bante … sorry han .. horror stories samajnyasathi majha iq thoda kami aaahe
April 28th, 2010 at 9:53 pm
great! zakkas jamliy…! lekhakacha naav kalel kaa?
August 29th, 2010 at 2:37 pm
hey, really good one..! suspense , excitement till end..!
मधले मधले “duffer” comments पण सही आहेत.!