व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)

Thu, Apr 2, 2009

Clone, Fantastic 5

व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)
This entry is part 2 of 9 in the series Pioneers

सर्वसामान्य नोकरदार स्वतःला असा प्रश्न कधीच विचारत नाही; कारण त्याच्यावर विविध कामांचा इतका बोजा असतो की एका कामातून डोके वर निघताच दुसरे काम समोर उभे राहते. त्यामुळे ‘नेक्स्ट’ जे काही येणार आहे ते टाळता कसे येईल, याचाच विचार तो करत असतो. अर्थात याला अपवाद असतीलही, पण सर्वसाधारण नोकरदारांची काम करण्याची पद्धत अशीच असते. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळत नाही…मिळतात ती फक्त कारणं!

आता हाच प्रश्न एखाद्या आंत्रप्रिन्युअरला विचाराल तर त्याच्यासमोर त्याने स्वीकारलेल्या आव्हानांची यादीच उभी राहते. त्यातून प्राधान्यक्रम ठरवून तो पुढच्या सहा महिन्यांत अमुक प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतरच्या दीड वर्षांत तमुक प्रोजेक्ट संपवायचा आहे, असे सांगतो. आंत्रप्रिन्युअर्सकडे या प्रश्नाचं ठोस उत्तर कायम तयार असतं.

‘व्हॉट शूड आय डू नेक्स्ट,’ असा प्रश्न जे स्वतःला सतत विचारत राहतात आणि त्याची उत्तरंही देत राहतात त्यांना ‘सिरीयल आंत्रप्रिन्युअर्स’ असे म्हणतात. याची तांत्रिक व्याख्या काहीही असली तरी प्रत्यक्षात हेच खरे ‘सिरीयल आंत्रप्रिन्युअर्स’. ईव्हान विल्यम्स असाच एक सिरीयल आंत्रप्रिन्युअर. प्रस्थापित माध्यमांना आव्हान देत कोट्यवधी वेबसर्फर्सच्या विचारांना हक्काची जागा देणारी ‘ब्लॉगर’ ही सेवा इव्हान विल्यम्स याने सुरू केली. तुम्हीही ‘ब्लॉगर’ची सेवा वापरत असाल; पण आपण जी सेवा वापरतोय त्याची पार्श्वभूमी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसेल. ईव्हानच्या आयुष्यात डोकावून त्याचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न….

३१ मार्च २००९ रोजी ईव्हानने आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. सुमारे १० वर्षांपूर्वी सहकारी मेग हुरिहनसोबत स्थापन केलेली कंपनी (पायरा लॅब्ज) आज त्याच्या ताब्यात नसली, तरी तो खूश आहे. कारण त्यानंतर त्याने आणखी दोन नवे प्रोजेक्ट्स हातावेगळे केले. हे प्रोजेक्टसुद्धा साधेसुधे नव्हते. पॉडकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देणारी ‘ओडिओ’ ही सेवा आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘ट्विटर’ हे दोन प्रोजेक्ट ईव्हानच्या खात्यात जमा झाले होते. ‘ब्लॉगर’इतकीच (किंबहुना त्याहूनही अधिक) लोकप्रियता ‘ट्विटर’ला लाभली आहे. २००३ मध्ये ‘गुगल’ने ‘पायरा लॅब्ज’चे संपादन केले. त्यानंतर ‘ब्लॉगर’चा आणखी जोमाने प्रसार झाला. या संपादनानंतर ईव्हानने साधारण वर्षभर ‘गुगल’मध्ये काम केले. त्यानंतर २००४ मध्ये त्याने ‘ओडिओ’ नावाची कंपनी स्थापून त्याच नावाने पॉडकास्टिंगशी संबंधित सेवा सुरू केली. २००६ मध्ये त्याने बिझ स्टोन आणि ‘ओडिओ’तील इतर काही सहकाऱ्यांच्या मदतीने ‘अॉब्व्हियस कॉर्पोरेशन’ नावाची कंपनी स्थापली. या कंपनीने ‘अोडिओ’चे संपादन केले. दरम्यान ईव्हान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘ट्विटर’वर काम सुरू केले होते. जुलै २००६ मध्ये त्यांनी ‘ट्विटर’ लाँच केले. या सेवेला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे पाहून २००७ च्या सुमारास ईव्हानने ‘ट्विटर’ नावाने स्वतंत्र कंपनी स्थापन केली. त्यानंतर मे २००७ मध्ये ‘सोनिक माऊंटन’ या कंपनीने ‘ओडिओ’चे संपादन केले. आज ईव्हान आपल्या ३३ सहकाऱ्यांसह ‘ट्विटर’चा कारभार सांभाळत आहे.

‘ब्लॉगर’चा जन्मः
प्रोजेक्ट मॅनेजर, कॉन्टॅक्ट्स मॅनेजर आणि टू-डू लिस्ट यांना एकत्र करणारे ‘पायरा’ नावाचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तयार करण्याच्या उद्देशाने ईव्हान आणि मेग यांनी ‘पायरा लॅब्ज’ची स्थापना केली. यातील ‘नोट टेकिंग’ अॅप्लिकेशन ईव्हानच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. या अॅप्लिकेशनची ताकद त्याने हेरली होती. पण त्याचा वापर कसा करावा याचा अंदाज त्याला येत नव्हता. शेवटी पायराचा बायप्रॉडक्ट म्हणून त्यांनी इंटर्नल पब्लिशिंगसाठी ‘ब्लॉगर’ (ब्लॉगर या नावाचा जन्म झाला कसा?) या नावाने पर्सनल वेबलॉग तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पुढे हीच सेवा मुख्य प्रवाहातील माध्यमांना आव्हान देईल, याची पुसटशी कल्पनाही ईव्हान आणि मेग यांनी कधी केली नव्हती. तत्पूर्वी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जायचे होते. पूर्णपणे मोफत दिल्या गेलेल्या या सेवेमुळे ‘पायरा लॅब्ज’समोर लवकरच आर्थिक संकट उभे राहिले. कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे वेतन थकले. या संकटातून कंपनीला बाहेर काढण्यासाठी ईव्हानकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जाण्याची चिन्हे दिसत नव्हती. अशा वेळी मेगनेही त्याची साथ सोडली. ईव्हान हतबल झाला. पण तशा परिस्थितीतही त्याने एकहाती कंपनीचा कारभार चालवला.

२००१ मध्ये डॅन ब्रिकलिन याच्या ‘ट्रेलिक्स’ कंपनीने पर्सनल वेबसाईट्स चालवण्यासाठी ‘ट्रेलिक्स वेब एक्स्प्रेस’ नावाची सेवा सुरू केली होती. या सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॅन अस्वस्थ होता. दुसरीकडे ‘ब्लॉगर’ला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची अस्वस्थता आणखी वाढत चालली होती. या दोन्ही सेवा एकमेकांच्या उपयोगास येऊ शकतात का, असा विचार सहज डॅनच्या मनात आला आणि त्याने त्याच रात्री ईव्हानला एक ई-मेल पाठवला. ईव्हाननेही त्या ई-मेलला अपेक्षित उत्तर दिले. पुढे ईव्हान आणि डॅन यांची भेट झाली आणि ‘ट्रेलिक्स’ने ‘पायरा लॅब्ज’ला आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले.

‘ट्रेलिक्स’च्या मदतीमुळे ‘पायरा लॅब्ज’ला जीवदान मिळाले होते. या संधीचा फायदा घेऊन उपलब्ध काळात ‘ब्लॉगर’ला स्वयंभू बनवण्यासाठी एक पक्के ‘रेव्हेन्यू मॉडेल’ तयार करणे आत्यंतिक गरजेचे होते. ईव्हानने ‘ब्लॉगर प्रो’ आणि इतर काही ‘पेड’ सुविधा जाहीर करून ‘ब्लॉगर’साठी एक सशक्त ‘रेव्हेन्यू मॉडेल’ विकसित केले. ईव्हानची चिकाटी फळाला आली. फेब्रुवारी २००३ मध्ये ‘गुगल’ने ‘पायरा लॅब्ज’चे संपादन केले. या व्यवहाराचा आर्थिक तपशील अजूनही उपलब्ध झालेला नाही. पण या व्यवहाराची उलट-सुलट चर्चा मात्र होत राहिली.

‘ओडिओ’ची निर्मितीः
या संपादनानंतर ईव्हानने सुमारे वर्षभर ‘गुगल’मध्येच काम केले. पण त्यातील आंत्रप्रिन्युअर त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. २००४ मध्ये त्याने नोआह ग्लासच्या सहकार्याने ‘ओडिओ’ ही पॉडकास्टसंदर्भातील सेवा सुरू केली. ब्लॉगिंगप्रमाणेच या काळात पॉडकास्टिंग लोकप्रिय झाले होते. ‘ओडिओ’ला याचा प्रचंड फायदा झाला. ‘ओडिओ’ची सेवा वापरून रेकॉर्डिंग आणि शेअरिंग सोपं झालं होतं. त्यामुळे ईव्हानची ही सेवाही अल्पावधीत लोकप्रिय झाली. २००६ च्या सुमारास ईव्हान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘ट्विटर’वर काम करावयास सुरवात केली होती. त्यामुळे त्यांचे ‘ओडिओ’वरील लक्ष कमी झाले. आर्थिकदृष्ट्या ‘ओडिओ’चा बोजा कंपनीवर येत नव्हता. तथापि, ‘ओडिओ’ला सुयोग्य पालक मिळावा, अशी ईव्हानची इच्छा होती. त्यामुळे फेब्रुवारी २००७ मध्ये त्याने आपल्या ब्लॉगवर ‘ओडिओ’ विकणे आहे’, अशा आशयाची पोस्ट लिहिली. त्याला प्रतिसाद देऊन ‘सोनिक माऊंटन’ या कंपनीने ‘ओडिओ’चे संपादन केले.

नेक्स्ट इज ट्विटरः
‘व्हॉट शूड आय डू नेक्स्ट’, हा प्रश्न ईव्हानला सारखा सतावत असे. २००६ मध्ये त्याच्या हातात ‘ओडिओ’चा कारभार होता. पण पॉडकास्टिंगचा जनक असलेल्या ‘अॅपल’कडून ‘ओडिओ’ला जबर स्पर्धेचा सामना करावा लागत होता. हे पाहून ‘ओडिओ’च्या भविष्याची चिंता ईव्हानला लागली होती. ‘ओडिओ’ विकणे आहे,’ या पोस्टमध्ये त्याने ‘ओडिओ’चे बरे चालले आहे,’ असा उल्लेख केला असला तरी या सेवेला फारसे भविष्य नसल्याची जाणीव त्याला झाली होती. आता काहीतरी नवीन करायला हवं, असा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी ब्रेनस्टॉर्म करण्याचे योजले. ‘ओडिओ’तील १४ सहकारी संपूर्ण दिवस ब्रेनस्टॉर्म करण्यासाठी एकत्र आले. वेगवेगळ्या गटांमध्ये बसून त्यांनी नव्या योजनांची चर्चा केली. दिवसअखेरीस प्रत्येक गटाने आपापल्या प्रोजेक्टची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर त्यातील तीन प्रोजेक्ट्स निवडण्यात आले. यातील एक प्रोजेक्ट होता- तुम्ही आता काय करत आहात, हे एसएमएसच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा…जॅक डोर्सीच्या डोक्यातील ही कल्पना म्हणजे आजचे ‘ट्विटर’…

Twttr या कोडनेमने या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरवात झाली. सुरवातीला ट्विटरवरून १६० किंवा त्याहून अधिक कॅरेक्टर्सचे अपडेट्सही पोस्ट करता येत होते. पण त्यामुळे मोबाईलचे बिल वाढण्याची शक्यता होती. शिवाय ट्वीट करणाऱ्याचे नाव देण्यात अडचण येत होती. म्हणून कॅरेक्टर्सची मर्यादा १४० इतकी ठेवण्यात आली. केवळ एसएमएसच्या माध्यमातून ट्वीट करणे मर्यादित ठेवले गेले नाही. वेब इंटरफेस आणि मोबाईल अॅप्लिकेशनवापरून देखील ट्वीट करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. आज एकट्या अमेरिकेत ८० लाख लोक ‘ट्विटर’ची सेवा वापरतात. याच कारणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ‘ट्विटर’चा वापर करून फायदा करून घेतला. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यादरम्यानही ‘ट्विटर’चा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. ‘ट्विटर’ वापरणारे घटनांचे ताजे अपडेट्स देत होते. या १४० कॅरेक्टर्सच्या सेवेने अनेक वेळा १४० पानांच्या वर्तमानपत्रांनाही मागे टाकले आहे…

जॅक डोर्सी सध्या चेअरमन म्हणून ‘ट्विटर’चे काम पाहतोय आणि ईव्हानला नेहमीप्रमाणे ‘व्हॉट शूड आय डू नेक्स्ट,’ हा प्रश्न पडला आहे…

Series Navigation«नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)»

Related posts:

  1. प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न (Paul Buchheit)
  2. आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
  3. आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #3)
  4. आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2)
  5. इन्स्पायर्ड बाय पीपल (Axel Meyer)

, , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

1 Comments For This Post

  1. Kedar Says:

    I think next should be selling Twitter to Google!!!
    What say?

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro