नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)

Thu, Mar 26, 2009

Clone, Fantastic 5

नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)
This entry is part 1 of 9 in the series Pioneers

रतन टाटा यांनी बाळगलेलं ‘नॅनो’चं स्वप्न २३ मार्च, २००९ रोजी अखेर पूर्ण झालं. गेल्या सहा वर्षांपासून संशोधन सुरू असलेली जगातली सर्वांत स्वस्त कार भारतीय रस्त्यांवर उतरवून रतन टाटा यांनी आपलं वचन पाळलं. मध्यमवर्गीय भारतीयांचं कार बाळगण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यासोबत जगातली सर्वांत स्वस्त कार तयार करण्याचा मानही मिळवला. पण नॅनोचा हा प्रवास खडतर होता हे आपणास ज्ञात आहेच. राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने टाटांच्या सिंगूर येथील प्रकल्पास विरोध दर्शविला. टाटांनी समेट घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले. अखेर पाणी डोक्यावरून जातेय, असे दिसून आल्यानंतर त्यांनी अख्खा प्रकल्प गुजरातेत हलवण्याचा निर्णय घेतला. रतन टाटा मनाने आणि पैशाने खंबीर होते म्हणून आज नॅनो रस्त्यावर दिसतेय. पण एरिक ड्रेक्स्लर मात्र एवढे खंबीर नव्हते…

कोण आहेत हे एरिक ड्रेक्स्लर?

कल्पना करा की, अथांग पसरलेल्या समुद्रात असंख्य छोटे-छोटे रोबोट्स तरंगत आहेत. या सगळ्या रोबोट्सचं काम एकच - त्यांना जसा आदेश मिळेल तसं ‘मॉलेक्युलर स्ट्रक्चर’ तयार करायचं. म्हणजे सुटे भाग घेऊन त्यांचं ‘मॉलेक्युलर स्ट्रक्चर’ बदलायचं आणि एखादं जहाज बनवायचं किंवा दोन-तीन केमिकल्स घेऊन त्यांचं ‘मॉलेक्युलर स्ट्रक्चर’ बदलायचं आणि पेट्रोल, डिझेल तयार करायचं. हे रोबोट्स इतके लहान आहेत की, ते माणसाच्या रक्तातदेखील सोडता येतील. म्हणजे उद्या एखाद्या गंभीर आजार झालेल्या व्यक्तीच्या रक्तातदेखील इंजेक्शनद्वारे हे विशिष्ट रोबोट्स किंवा मशीन्स सोडता येतील. रक्तात जाऊन त्यांना मिळालेल्या आदेशानुसार ते जीवाणू-विषाणूंवर हल्ला करून आजार पळवतील. एखाद्या सायन्स फिक्शनला शोभेल, अशी ही कल्पना मांडली होती ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी’तील (एमआयटी) एका विद्यार्थ्याने…१९७७ मध्ये!

drexlerbydavidorban
के. एरिक ड्रेक्सलर हे त्या विद्यार्थ्याचं नाव. तुम्ही म्हणाल, ‘एमआयटी’ म्हणजे संशोधकांची खाण. तिथे असे अनेक ड्रेक्सलर्स तयार होत असतात. यात विशेष ते काय? विशेष एवढंच की अफाट बुद्धीमत्तेच्या आणि एक वेडं स्वप्न उराशी बाळगलेल्या या ड्रेक्सलरना त्यांच्या कामाचं योग्य श्रेय मिळाल नाही. हे ड्रेक्सलर उच्च पातळीवरील राजकारणाचे बळी ठरले.

‘नॅनो’ हा शब्द, किंबहुना या शब्दामागे अभिप्रेत असलेला अर्थ (आकाराने अत्यंत लहान, सूक्ष्म) जगासमोर आला तो नॅनोटेक्नॉलॉजीमुळे. ‘नॅनोज्’ या ग्रीक शब्दापासून ‘नॅनो’ हा इंग्लिश शब्द आला. ‘नॅनोज्’ म्हणजे ठेंगणा, ठुसका, बुटका. गणिताच्या किंवा शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर ‘नॅनो’ म्हणजे एक अब्जांश किंवा १० चा उणे नववा घात. नॅनोटेक्नॉलॉजी हा शब्द आज सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. याचे श्रेय ड्रेक्स्लर यांना जाते. ड्रेक्स्लर यांनी १९७७ मध्ये सर्वप्रथम हा शब्द वापरला आणि लोकप्रिय केला. त्यापूर्वी १९७४ मध्ये टोकियो विद्यापीठातील संशोधक नोरिओ तानिगुची यांनी सेमीकंडक्टरसंदर्भात अभ्यास करताना नॅनोटेक्नॉलॉजी शब्द वापरल्याची नोंद आहे. तथापि, ड्रेक्स्लर यांनी या विषयावर अधिक विस्ताराने संशोधन केल्यामुळे जागतिक पातळीवर नॅनोटेक्नॉलॉजी हा शब्द प्रसिद्ध झाला.

पण याच नॅनोटेक्नॉलॉजीचं वेड ड्रेक्स्लर यांच्या प्रगतीत अडथळा ठरलं.

‘मॉलेक्युलर असेम्ब्ली’बाबत ड्रेक्स्लर यांनी मांडलेली कल्पना अस्तित्त्वात येणंच शक्य नाही, असे मत नोबेल विजेते रसायनशास्त्रज्ञ रिचर्ड स्मॉली यांनी मांडले. ‘केमिकल अँड इंजिनिअरिंग न्यूज’ या नियतकालिकात ड्रेक्स्लर आणि स्मॉली यांचा या विषयावरील पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला. रसायनशास्त्र इतकं गुंतागुंतीचं अाहे की ड्रेक्स्लर यांच्या कल्पनेतले रोबोट्स किंवा ‘मॉलेक्युलर असेम्ब्लर्स’ना मॉलेक्युल्सची रचना बदलणे कदापि शक्य होणार नाही, असे मत स्मॉली यांनी व्यक्त केले. स्मॉली एवढ्यावर थांबले नाहीत. ड्रेक्स्लर यांची कल्पना अस्तित्त्वात आली आणि त्यांनी तयार केलेले तथाकथित रोबोट्स त्यांच्या लॅबमधून बाहेर पडले तर अख्ख्या पृथ्वीचे अस्तित्त्व धोक्यात येईल, असे सांगून ड्रेक्स्लर एका अर्थाने अतिरेकी आहेत असे त्यांनी भासवले. त्यांच्या या वक्तव्याने हा वाद चव्हाट्यावर आला. अर्थातच लोकांच्या भावनेला हात घातल्याने स्मॉली यांना लोकांचा आणि पर्यायाने सरकारचा पाठिंबा मिळाला. या वादानंतर सहा महिन्यांनी (जून २००४) वॉशिंग्टनमध्ये भरलेल्या ‘एनर्जी नॅनोसमिट’च्या आयोजनाचा आणि समारोपाच्या भाषणाचा मान स्मॉली यांना मिळाला.

दरम्यान, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी नॅनोटेक्नॉलॉजीच्या संशोधन आणि विकासासाठीच्या विशिष्ट कायद्याला मान्यता देत ‘मॉलेक्युलर इंजिनिअरिंग’ संदर्भातील अभ्यासासाठी ३.७ अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. थेट अध्यक्षांनीच मान्यता दिल्यामुळे अमेरिकेच्या शास्रीय संशोधनाच्या प्राधान्यक्रमात ड्रेक्स्लर यांचा अजेंडा सर्वांत वर आला होता. पण काही दिवसांतच राजकीय चक्रे फिरली आणि एकूण उपलब्ध करून दिलेला जवळपास सर्व निधी पारंपरिक रासायनिक संशोधनासाठी वळवण्यात आला. ड्रेक्स्लर यांचा अजेंडा एका क्षणात तळात गेला. या सगळ्यांत ड्रेक्स्लर संशोधकांच्या मुख्य प्रवाहातून प्रचंड लांब फेकले गेले.

‘मॉलेक्युलर नॅनोटेक्नॉलॉजी’ या विषयावरील अभ्यासाला दुर्लक्षित करणे म्हणजे अमेरिकेला जागतिक महासत्ता या पदावरून खाली खेचण्यासारखे आहे, अशा शब्दांत ड्रेक्स्लर या कुचंबणेचा िनषेध व्यक्त करतात. ‘मॉलेक्युलर स्ट्रक्चर’ बदलणे म्हणजे पृथ्वीचे अस्तित्त्व धोक्यात आणणे, अशा भंपक विधानाने घाबरून जाऊन या विषयावरील अभ्यास थांबवणे हे निश्चितच मूर्खपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणतात.

आयुष्यातील सर्व महत्त्वाची वर्षं मॉलेक्युलर नॅनोटेक्नॉलॉजीच्या संशोधनात घालवल्यामुळे भरपूर पैसे वगैरे कमावण्याचा विचारदेखील ड्रेक्स्लर यांच्या मनाला कधी शिवला नाही. अमेरिकन लाईफस्टाईलमध्ये जगण्याइतपत पैसे ते कमवत असत. मुख्य प्रवाहातूनच बाहेर फेकले गेल्यामुळे पैशांचे अनेक स्रोत आता बंद झाले आहेत. बंगला सोडून ते आता साध्या फ्लॅटमध्ये राहतात. पण याची त्यांना बिलकूल खंत नाही. आपला विषयाचा अभ्यास करायला मिळतोय, हीच त्यांच्यासाठी जगण्याची उमेद आहे.

२५ एप्रिल १९५५ ला कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे जन्म घेतलेल्या ड्रेक्सलर यांना लहानपणापासून शास्त्राची आवड होती. १९७४ च्या दरम्यान त्यांना ‘स्पेस सायन्स’ची गोडी लागली. याच विषयात आपण पुढे करियर करावे, असे त्यांना वाटू लागते. याच काळात ‘जेनेटिक इंजिनिअरिंग’च्या अभ्यासाने जोर धरला होता. ड्रेक्स्लर यांना या विषयात रस निर्माण झाला. पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांनी जैविक पद्धतीने तयार होणाऱ्या गोष्टी यांत्रिकरित्या तयार करता येतील का, या विषयाचा सखोल अभ्यास केला. जैविक पातळीवर जी गोष्ट तयार होऊ शकते तीच गोष्ट ‘मॉलेक्युलर स्ट्रक्चर’ बदलून यांत्रिकरित्यादेखील करता येऊ शकते, या निष्कर्षावर ते येऊन पोचले. एका महत्त्वाकांक्षी संशोधनाचा आविष्कार त्यांना झाला आणि त्यांनी याच विषयाचा अभ्यास करण्याचे निश्चित केले. या प्रक्रियेस ‘मॉलेक्युलर इंजिनिअरिंग’ असे म्हणता येऊ शकते, असे ड्रेक्स्लर यांचे मत होते. त्यांचा विषय कठीण होता. एरवी अनेक महत्त्वाकांक्षी संशोधनांचा पुरस्कार करणारे ‘एमआयटी’देखील ड्रेक्स्लर यांच्या विचित्र संशोधनाबाबत साशंक होते. यावेळी ड्रेक्स्लर यांची पहिली पत्नी क्रिस्तिन पीटर्सन हिने त्यांना सर्वतोपरी मदत केली.

ड्रेक्स्लर आणि क्रिस्तिन दर शनिवार-रविवार पार्टी आयोजित करून हुशार विद्यार्थ्यांना एकत्र करत आणि या पार्टीत ‘मॉलेक्युलर इंजिनिअरिंग’विषयी चर्चा घडवून आणत. अशा चर्चांमधून त्यांनी या विषयाला ‘एमआयटी’त मानाचे स्थान मिळवून दिले. १९८१ मध्ये ‘मॉलेक्युलर इंजिनिअरिंगः अॅन अप्रोच टू द डेव्हलपमेंट अॉफ जनरल कपॅबिलिटिज फॉर मॉलेक्युलर मॅनिप्युलेशन’ या विषयावरील त्यांचे पहिले संशोधन प्रसिद्ध झाले. पुढे १९८६ मध्ये ‘इंजिन्स अॉफ क्रिएशन’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकात त्यांनी नॅनोटेक्नॉलॉजीचा सर्वप्रथम उल्लेख केला आणि हा शब्द जगासमोर मांडला. १९९१ मध्ये ‘एमआयटी’ने त्यांना ‘मॉलेक्युलर नॅनोटेक्नॉलॉजी’ या विषयातील पीएच.डी बहाल केली. या विषयातील ते पहिलेच डॉक्टरेट होते. यानंतर त्यांना काय-काय सहन करावे लागले, हे आपण पाहिलेच.

या विषयातील राजकारण बाजूला ठेवले तरी एक प्रश्न अद्यापही अनुत्तरित राहतो. ड्रेक्स्लेरियन नॅनोटेक्नॉलॉजी - अर्थात ‘मॉलेक्युलर मॅन्युफॅक्चरिंग’ शक्य आहे किंवा नाही? कितीही चर्चा केली, वाद घातले, परिषदा आयोजित केल्या, शोधनिबंध लिहिले तरी या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. याचे उत्तर केवळ प्रयोगानेच मिळू शकते. असा प्रयोग करण्यासाठी ड्रेक्स्लर यांना राजकीय पाठिंबाही नाही आणि पुरेसे आर्थिक पाठबळही नाही. त्यामुळेच
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ग्लोबल वॉर्मिंग’सारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आणि मोठ्या कंपन्यांना सल्ला देण्याचे काम सध्या एरिक ड्रेक्स्लर करतात. याच विषयावर ते भाषणही देतात. ‘मॉलेक्युलर नॅनोटेक्नॉलॉजी’चा महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेण्यासाठी एखादा प्रायोजक पुढे येत नाही तोपर्यंत एरिक ड्रेक्स्लर यांच्यापुढे याच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही…

एरिक ड्रेक्स्लर यांची वेबसाईटः http://e-drexler.com
एरिक ड्रेक्स्लर यांचा ब्लॉगःhttp://metamodern.com/

Series Navigationव्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)»

Related posts:

  1. लाँग लिव्ह ‘वेब’! (Tim Berners-Lee)
  2. व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)
  3. आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
  4. प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न (Paul Buchheit)
  5. एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)

,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro