एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)

Thu, May 28, 2009

Clone, Fantastic 5

एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)
This entry is part 8 of 9 in the series Pioneers

२००३ः हार्वर्डमधील हॉस्टेल रूममध्ये मार्क आणि ख्रिस एकत्र राहत होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटरनेटवर आपले अस्तित्त्व निर्माण करण्याकरता आणि आपापल्या आवडी-निवडीनुसार समूह तयार करता यावेत यासाठी एखादी साईट तयार करण्याचे विचार मार्कच्या डोक्यात घोळत होते. मार्क तांत्रिक बाजूने त्याच्या विचारांना आकार देत होता. पण विद्यार्थी अशा साईटवर कशासाठी येतील आणि आले तर त्यावर काय अॅक्टिव्हिटी करतील, याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे होते. ख्रिस या विषयाचा अभ्यास करत होता. डस्टिन आणि एड्वार्डोही त्यांना मदत करत होते.

२००७: एका अत्यंत महत्त्वाच्या ‘प्रकल्पा’साठी ख्रिसला आमंत्रित करण्यात आले. ख्रिसने आमंत्रण स्वीकारले आणि नेमून दिलेल्या कामाची चोख अंमलबजावणी केली.

मार्क (झुकरबर्ग), ख्रिस (ह्युजेस), डस्टिन (मोस्कोविच) आणि एड्वार्डो (सॅव्हरिन) यांनी तयार केलेली ती साईट (फेसबुक) आज तीस कोटी अमेरिकन डॉलर्सची प्रॉपर्टी बनलीय आणि ख्रिस ह्युजेसची ज्या प्रकल्पावर नेमणूक केली होती त्या प्रकल्पाच्या (ओबामांची अॉनलाईन प्रेसिडेंशियल कॅम्पेन) भक्कम पाठबळामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले!

ख्रिस ह्युजेस. वय वर्ष २५. होय. फक्त २५. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक हुसेन ओबामा यांनी अमेरिकेतील जनतेचा (विशेषतः तरुणांचा) भक्कम पाठिंबा मिळवला आणि ख्रिसने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले. २० जानेवारी २००९ रोजी ओबामांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली; पण या पदापर्यंत पोचण्याची तयारी त्यांनी तीन वर्षांपूर्वीच सुरू केली होती. ‘फेसबुक’ आकार घ्यायला लागल्यानंतर मार्क आणि डस्टिन यांनी हार्वर्डमधील आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि ‘फेसबुक’च्या पुढच्या वाटचालीकरता व्हेंचर कॅपिटलिस्ट शोधण्यासाठी पालो अल्टो गाठलं. ख्रिसची घरची परिस्थिती बेताची होती. शिवाय स्कॉलरशिप मिळवून त्याने हार्वर्ड जॉईन केले होते. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडणं त्याला शक्य नव्हतं. पण तरीदेखील ‘फेसबुक’च्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा सहभाग होता. २००६ च्या मध्यावधी निवडणुकांदरम्यान उमेदवारांना त्यांची ‘प्रोफाईल पेजेस’ तयार करण्याची सुविधा ‘फेसबुक’ने उपलब्ध करून दिली होती. बराक ओबामा त्यावेळी इलिनॉयचे सिनेटर होते. उमेदवार नसूनही ‘फेसबुक’वर आपले अस्तित्त्व असावे, असे त्यांना वाटले. ओबामांचा पर्सनल सेक्रेटरी रेगी लव्ह याने त्यांचे ‘प्रोफाईल’ तयार केले. ओबामांचे त्यावेळचे ‘इंटरनेट डायरेक्टर’ जिम ब्रायटन यांना देखील ‘फेसबुक’ भावले होते. जिम आणि रेगी यांना ‘फेसबुक’च्या ताकदीचा अंदाज आला होता आणि ‘प्रेसिडेंशियल कॅम्पेन’साठी या साईटचा प्रचंड फायदा होणार, हे त्यांनी अचूक हेरले होते. पण याचा नेमका वापर कसा करावा, याची खोलवर माहिती त्यांना नव्हती. यासाठी आम्हाला मदत करशील का, अशा आशयाचा ई-मेल रेगीने ख्रिसला पाठवला.

ख्रिसने होकार दिला आणि रेगी लव्हने त्याची ब्रायटनशी भेट घालून दिली. वैयक्तिक कारणांमुळे ब्रायटन पुढे या टीममधून बाहेर पडला. ओबामांच्या ‘प्रेसिडेंशियल कॅम्पेन’साठी ख्रिसची डायरेक्टर अॉफ अॉनलाईन अॉर्गनायझिंग या पदावर नेमणूक झाली. ओबामांच्या विविध ठिकाणच्या कॅम्पेनसाठी लोकांना एकत्र करणे आणि प्रचारासाठी निधी उभा करण्यासाठी इंटरनेट आणि न्यू मीडिया टूल्सचा प्रभावी वापर करणे, हे ख्रिसचे मुख्य उद्दिष्ट होते. यासाठी ओबामांच्या ‘फेसबुक’ प्रोफाईल व्यतिरिक्त एखादी स्वतंत्र साईट असावे, असे त्याला वाटत होते. व ओबामांना पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेच्या विविध प्रांतातील लोकांना एकत्र आणणे, त्यांचे समूह तयार करणे व प्रचारासाठी निधी गोळा करण्याची सोय उपलब्ध करून देणे यासाठी त्याने ‘माय बराक ओबामा डॉट कॉम’ (मायबीओ) या साईटची कल्पना विकसित केली. बराक ओबामा यांना अध्यक्षपदापर्यंत पोचवण्यात या साईटने मोलाचा वाटा उचलला. कॅम्पेनच्या अखेरीस सुमारे वीस लाख लोकांनी या साईटवर आपले प्रोफाईल तयार करून ३५ हजार ग्रुप्स तयार केले होते. लोकांनी चार लाखांहून अधिक ब्लॉग पोस्ट्स लिहिल्या आणि तीन कोटी डॉलर्सचा निधी गोळा केला होता. या साईटच्या माध्यमातून दोन लाख ग्राऊंड इव्हेन्ट्स घेतले गेले. अमेरिकेचे पहिले अश्वेत अध्यक्ष होऊन बराक ओबामांनी इतिहास घडवला; तसाच इतिहास त्यांच्या कॅम्पेननेही घडवला.

<b>माय बराक ओबामा डॉट कॉम </b>

या सगळ्या कॅम्पेनदरम्यान ख्रिस स्वतः ‘माय बराक ओबामा’वरील अनेक अॅक्टिव्ह कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून होता. त्यांच्यासोबत त्याने अनेक मिटिंग्जही केल्या. त्यांच्या प्रयत्नांना दिशा दिली. ‘माय बराक ओबामा डॉट कॉम’ पुढील तीन सिद्धान्तावर आधारित होते, असे निरिक्षण पॉलिटिकल ब्लॉगर मार्क अम्बिन्डर यांनी नोंदवले आहेः

  • उत्साहवर्धन ः बराक ओबामा या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर होता. त्यांच्या कॅम्पेनसाठी काम करण्याची अनेकांची इच्छा होती. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहही होता. त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्याचे काम करणे.
  • नव्या तंत्रज्ञानाचा वापरः एसएमएस, सोशल नेटवर्किंग, ब्लॉगिंग, जिओकोडिंग, टॅगिंग आदींचा प्रभावी वापर करणे.
  • योग्य दिशाः सर्वासामान्य लोक, तरुण आणि कार्यकर्ते यांना समाजाच्या विकासासाठी हातभार लावणे म्हणजे काय, याविषयीचे ज्ञान देऊन योग्य मार्गदर्शन करणे.

या साईटवरील प्रत्येक व्यक्तीला ती काय करतेय आणि तिच्या कामाचं फलित काय, याचा ट्रॅक ठेवता येत होता. ओबामांच्याच एका सहकाऱ्याने याला ‘अकाऊंटेबल एम्पॉवरमेंट’ असं नाव दिलं आहे. ख्रिस ह्युजेसने ‘फेसबुक’ तयार करताना ज्या मंत्राचा अवलंब केला होता त्याच मंत्राचा अवलंब त्याने ‘माय बराक ओबामा डॉट कॉम’ची बांधणी करताना केला - कीप इट रिअल, कीप इट लोकल हाच तो मूलमंत्र! बराक ओबामांच्या अॉनलाईन कॅम्पेनचा डायरेक्टर, हे पद मोठं होतं. मागेल त्या सुविधा ख्रिसला मिळाल्या असत्या. पण त्याने एखाद्या इंटरनेट स्टार्ट-अपप्रमाणे कॅम्पेनचं काम करणं पसंत केलं. ओबामांच्या शिकागोतील कॅम्पेन मुख्यालयातील एका कोपऱ्यात ख्रिसची टीम बसत असे. फेसबुक प्रगतीच्या वाटेवर असताना आणि ओबामांची अॉफर स्वीकारण्याचा धोका ख्रिसने पत्करला होता. सुरवातीचे दोन महिने त्याच्यासाठी खूप खडतर गेले. लाखांमध्ये खेळणाऱ्या ख्रिसला हजारांत खेळण्याची सवय नव्हती आणि ‘माय बराक ओबामा डॉट कॉम’वरील कार्यकर्त्यांची संख्या संथ गतीने वाढत होती. ‘फेसबुक’मध्ये त्याच्या कल्पनांना प्रत्यक्षात अाणणारे तितक्याच ताकदीचे डेव्हलपर्स होते. इथे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार केलेले एक सॉफ्टवेअर तो वापरत होता. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे त्यावर मात करत त्याच्या कल्पनेतील साईट प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागला. पॉलििटकल कॅम्पेनचा पूर्वानुभव नसल्यामुळे मतदारांच्या याद्या मिळवण्यापासून जमवलेल्या निधीचे व्यवस्थापन करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी त्याला आधी शिकून घ्याव्या लागल्या. सुरवातीला त्याने केवळ आयोवा प्रांतावर लक्ष केंद्रित केले होते. तिथल्या कॅम्पेनसाठी ‘माय बराक ओबामा डॉट कॉम’च्या माध्यमातून अनेक नवे कार्यकर्ते मिळाले. या बदलाने ख्रिस आणि त्याच्या टीमचा उत्साह वाढला आणि ‘माय बराक ओबामा डॉट कॉम’ने त्यानंतर इतिहास घडवला.

'<b>फास्ट कंपनी'वर ख्रिस

यानंतर ख्रिसने आणखी दोन अॉनलाईन प्रॉपर्टीज विकसित केल्या. ‘नेबर-टू-नेबर’ अॉनलाईन कॉलिंग टूल आणि ‘व्होट फॉर चेंज’ या अॉनलाईन व्होटर रजिस्ट्रेशन साईटचा यात समावेश होता. ओबामा की मॅककेन, अशा द्विधा मनःस्थितीत असलेल्या मतदारांना अॉनलाईन कॉल करण्यासाठी ‘नेबर-टू-नेबर’ हे टूल कामास आले. याचा वापर करून सुमारे ८० लाख कॉल्स करण्यात आले. यासाठी वापरण्यात आलेली तंत्रप्रणाली प्रचंड आधुनिक होती, असं ख्रिस सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार, “पॉलिटिकल कॅम्पेन यशस्वी करण्यासाठी त्यात ‘जीव’ असणं खूप महत्त्वाचं असतं. ‘फेसबुक’ची बांधणी करतानाही मी हाच मंत्र डोळ्यासमोर ठेवला होता. पॉलिटिकल कॅम्पेनच्या शेवटी तुम्हाला त्यात सहभाग घेतलेल्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याचे मतामध्ये रूपांतर करायचे असते. बराक ओबामांनी संपूर्ण कॅम्पेनच्या काळात शक्य तितक्या लोकांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि अधिकाधिक लोकांना त्यांच्यापर्यंत नेण्याचे काम ‘माय बराक ओबामा डॉट कॉम’ने केले.”

ख्रिस आता पुन्हा ‘फेसबुक’ला जॉईन होणार की नाही, अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. पण ‘जनरल कॅटालिस्ट’ या व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपनीत आंत्रप्रिन्युअर-इन-रेसिडन्स पदावर जॉईन होऊन ख्रिसने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आंत्रप्रिन्युअर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ख्रिसने पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतला आहे. ‘फेसबुक’ आणि ओबामांच्या अॉनलाईन कॅम्पेनचा मजबूत अनुभव असलेल्या ख्रिसच्या तालमीत भविष्यातील ‘टेक आंत्रप्रिन्युअर्स’ नक्कीच तयार होतील, यात शंका नाही!

(आपल्याकडेही नुकत्याच निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल तुमच्या समोर आहेतच. इंटरनेट, एसएमएस आदी नव्या माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या भाजपची (आणि मित्रपक्षांची) देशभर वाताहत झाली. याचे मुख्य कारण त्यांच्या अॉनलाईन कॅम्पेनमध्ये ‘जीव’ नसणे, हेच असू शकते. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी जिथे इंटरनेट अॅक्सेस आहे ितथे सुद्धा भाजपला नव्या माध्यमांचा फारसा उपयोग झाल्याचे दिसून येत नाही. अर्थात, यावरून या माध्यमाच्या उपयुक्ततेबद्दल शंका घेणे योग्य नाही. या माध्यमाचा आधार घेऊन एखाद्या ‘ख्रिस’कडून त्यात ‘जीव’ ओतण्याची किमया करणारा पक्ष (किंवा नेता) पुढच्या निवडणुकांत नक्कीच बाजी मारू शकतो. तुम्हाला काय वाटतं?)


संदर्भः

The Man Behind Obama’s Online Election Campaign
The Facebooker Who Friended Obama
How Chris Hughes Helped Launch Facebook and the Barack Obama Campaign

Series Navigation«लाँग लिव्ह ‘वेब’! (Tim Berners-Lee)इन्स्पायर्ड बाय पीपल (Axel Meyer)»

No related posts.

, , , , , , , , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

2 Comments For This Post

  1. Om Says:

    Lekh avadala tuacha tumchya blogvaracha…..

  2. Clone Says:

    Thanks Om.
    Do visit the site for more informative articles and please forward the link to your friends.

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro