बाधित

“सर, ती जागा घेऊ नका. बाधित आहे ती.”
“छे छे… मी नाही असल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवत. आणि असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास ठेवून इतक्‍या कमी रेटमध्ये हाती पडणारी मोक्‍याची जागा काही मी घालवणार नाही.’
“रागावू नका. पण आमचं सांगायचं काम होतं, ते आम्ही केलं. नंतर म्हणू नका, की यांनी असली जागा आमच्या गळ्यात मारली.’
“काही म्हणणार नाही मी. तुम्ही व्यवहार पूर्ण करून टाका. कधी एकदा त्या फ्लॅटमध्ये राहायला जातोय, असं झालंय मला.’
“ठीक आहे. जशी तुमची इच्छा.’

प्रसाद आणि एजंटमध्ये चर्चा सुरू होती. प्रसादला तो पॉश एरियातला पॉश फ्लॅट मनापासून आवडला होता. चौथ्या मजल्यावरचा ड्युप्लेक्‍स फ्लॅट. टेरेस. अगदी मस्त, हवेशीर आणि पॉश! त्याच्या टेरेसमधून मस्त रात्र, गार हवा आणि चंद्र अनुभवता येणार होता. मित्रांचा अड्डा जमवता येणार होता. मुख्य म्हणजे फ्लॅट उगवतीच्या दिशेला नव्हता. त्यामुळे घरात थेट सूर्यकिरणंही येत नव्हती आणि उजेडामुळे झोपमोड होणार नव्हती. थोडक्‍यात, तो फ्लॅट त्याला हवा तसा होता आणि किंमतही कमी होती. त्यामुळे मालकाचं मन बदलण्याआधी व्यवहार पूर्ण करण्याची त्याला घाई झाली होती आणि एजंट ही नसती खुसपटं काढत होता. काय तर म्हणे बाधीत जागा. खरंतर जागा वगैरे काही बाधित नव्हती, तो मालकच सरकलेला आहे, असं प्रसादला वाटत होतं. काय त्याचे डोळे, काय त्याचे केस… सगळं जरा विचित्रच होतं. त्या मालकाला मानसोपचारांची गरज होती; पण जाऊ दे. घराचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे शहाणपण सुचू दे. आधीच सुचलं, तर फ्लॅट हातचा जायचा, त्याच्या मनात स्वार्थी विचार डोकावला.

प्रसाद बॅचलर होता आणि साताऱ्याला असणारे आई-बाबा लग्नासाठी त्याच्या मागे लागले होते. आज ना उद्या ते करायचंच होतं. त्यामुळेच त्यानं फ्लॅट शोध मोहीम हाती घेतली होती आणि अचानकच हा उत्तम फ्लॅट त्याच्या हाती लागला होता. तो, आई आणि बाबा असं छोटंसं कुटुंब. घरची परिस्थिती ठीकठाक; पण उपजतच हुशार असलेला प्रसाद शहराकडे वळला आणि एक एक पायरी मोठ्या कष्टानं पार करत पुढे चालला होता. असो, तर प्रसादनं तेच घर घेण्याचं निश्‍चित केलं. विशेष म्हणजे त्या घराच्या मालकानंही प्रसादशी बोलण्याचा प्रयत्न केला होता; पण प्रसादनं त्यांनाही उडवून लावलं.

त्यानं सारा व्यवहार पूर्ण केला आणि तो त्या फ्लॅटमध्ये राहायलाही गेला. अगदी आनंदात होता तो. घरी आई-बाबांनाही कळवलं. तेही लवकरच त्याचं नवं घर पाहायला, काही दिवस राहायला येणार होते. नव्या घराची मित्रांना पार्टीही देऊन झाली. एक आठवडा झाला. सगळं काही मस्त चाललं होतं. प्रसाद त्या जुन्या घर मालकाला आणि एजंटला मनातल्या मनात हसत होता. पुढच्या वेळी तो एजंट भेटल्यास, त्या मालकाला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्लाही तो देणार होता. अर्थात त्या घरात राहायला आल्यापासून प्रसादला स्वतःमध्ये काही बदल घडत असल्याचं जाणवत होतं; पण ते खूप पॉझिटिव्ह होते. पॉश वस्तीतल्या पॉश घरात राहायला लागल्यानंतर घडतील तेवढे! तो आता स्वतःची नीट काळजी घेऊ लागला होता. कपड्यांबाबत चुझी झाला होता. वागण्यात थोडा आखडूपणा आणि थोडा डौल आला होता. शनिवार रविवारी एकदम फॅशनेबल कपडे घालू लागला होता. पण हे बदल आज ना उद्या होणारच होते. तरुण लग्नाळू होता तो! ते बाधित वगैरे म्हणतात, त्यातलं त्याला काही जाणवलंही नव्हतं.

होता होता महिना सरला. आणि तो एजंट अचानकच अवतरला. रविवारचा दिवस होता तो. रात्रभर धिंगाणा घालून प्रसाद दिवसभर डाराडूर झोपला होता. त्याला उशीरानं जाग आली. अंधार पडला होता. तसा तो अजूनही आळसावलेलाच होता; पण उठून आवरावं, जरा भटकून यावं, थोडी पोटपूजाही करावी, असा विचार करून तो पलंगावरून उठला. बेसिनसमोर दात घासत उभा राहिला आणि बेल वाजली. त्यानं दार उघडलं, तर समोर एजंट उभा होता. एजंट प्रसादला पाहून आणि प्रसाद त्या एजंटला पाहून दचकलाच.
“”तुम्ही? आत्ता? काय विशेष?” प्रसादनं विचारलं.
“”काही नाही. म्हटलं, तुमचं कसं चाललंय ते पाहावं…”
“”त्यात काय पाहायचं ? मस्त चाललंय माझं. या आत या.”
“”पण तुम्ही हे काय करताय आत्ता ?”
“”काय म्हणजे ? दिसत नाही, दात घासतोय… थांबा जरा. आलोच तोंड धुवून…”
प्रसाद आत गेला आणि एजंट अचंब्यानं घर पाहू लागला.
“”बोला, काय म्हणताय ? कसं चाललंय तुमचं काम ?”
“”आमचं चालूच आहे ? काल तुम्ही दिसला नाही पालखीला…”
“”पालखी ? हां… जाऊ द्या हो. नाही जमलं मला…. शनिवार होता काल…”
“”आहो पण पालखी चुकवलीत?”
“”जाऊ द्या हो… किती वेळ तुम्ही तेच ते विचारणार आहात. काल शनिवार होता आणि आमची मस्त पार्टी होती. ती एंजॉय करायची, की तुमच्या त्या पालखीबिलखीला यायचं? असल्या भाकड गोष्टींवर विश्‍वास नाही ठेवत मी…’”
“”प्रसादराव… काय बोलताय काय तुम्ही… आहो…”
“”तुम्ही कशाला घाबरता. मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. जरा डोळे उघडून पाहा आजूबाजूला, जग कुठे चाललंय आणि आपण कुठे आहोत…”
“”म्हणजे तुम्ही कोणतीच गोष्ट मानत नाही…”
“”जे मला पटतं, तेच मी मानतो. शनिवारची रात्र धिंगाणा घालायची असते, तो मी घालतो. उगाचच या पालखी वगैरे भाकड गोष्टींमध्ये वेळ कशाला घालवायचा ?”
“”काय बोलताय काय तुम्ही ? आहो आपण कोण आहोत, याचा तरी विचार करा…”
“”काही गरज नाही विचार करण्याची. त्या सुद्धा भाकड कथाच आहेत शेवटी…”
“”काय ? तुम्ही आपलं अस्तित्वही नाकारता आहात…”
“”नाहीतर काय ? उगाचच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी का स्वीकारयच्या ?”
“”तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही काय बोलताय ते ?”
“”न यायला काय झालंय… तुमचं बोलणं झालं असेल, तर सांगा. मला अजून आवरायचं आहे. मस्त शॉवर घ्यायचा आहे… आज क्‍लबवर जायचं ठरलंय आम्हा मित्रांचं.”
“”आंघोळ ? मी आलो तेव्हा तुम्ही दात घासत होता…”
“”आता यात काही चुकीचं आहे का ? दात घासणं आणि आंघोळ करणं यात वावगं काय आहे ? उगाच चारचौघात बोलाल, तर लोक वेड्यात काढतील तुम्हाला…”
“”वावगं नाही ? आपला संबंध काय या गोष्टींशी ?”
“”तुमचा नसेल संबंध स्वच्छतेशी; पण माझा आहे आणि प्रियाला भेटायला जाताना मला नाही आवडत असं पारोसं जायला…”
“”प्रिया ? कोण ही प्रिया ?”
“”तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी ? तो माझा खासगी प्रश्‍न आहे. तुम्ही टळा पाहू आता… मला उशीर होतोय…”

प्रसादनं एजंटला बाहेर काढलं; पण एजंट मात्र त्याच्या मागावरच राहिला. दोन रात्रीत त्यानं साऱ्या गोष्टी टिपल्या आणि त्याची खात्रीच झाली, की प्रसादला त्या घरानं झपाटलं आहे…
आता मात्र तो थांबला नाही. त्यानंच निर्णय घेतले आणि प्रसादच्या आई-बाबांना बोलावून घेतलं. सोबत चार-पाच जणांनाही घेऊन यायला सांगितलं.

“”काय हो, झालं काय असं ?” प्रसादच्या बाबांनी विचारलं
“”तुम्हीच पाहा आणि खात्री करा…”

त्यानुसार प्रसादचे आई-बाबाही लगेच आले. ते प्रसादच्या घरी राहिले आणि दुसऱ्याच दिवशी घाबरेघुबरे होऊन एजंटकडे धावले…
“”आहो, हा असा काय वागतोय ? आमच्यासमोर दात घासत होता. आंघोळीला जातो म्हणाला. रात्री कुठला क्‍लब की काय तिकडे गेला. आणि आज त्याच्या प्रिया नावाच्या मैत्रिणीला घेऊन येणार आहे… आहो, ती मनुष्य आहे हो… भुतानं कधी मनुष्याशी लग्न केलं आहे का ? सगळंच विपरीत. आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहायची समाजात. तरी मी सांगत होते, त्याला शहरात नका पाठवू. बिघडला ना आता तो… आपण भूत आहोत, हेही विसरून गेलाय. नाहीतर दात घासणं, आंघोळी करणं, कसले कसले स्प्रे फवारणं याचा काही उपयोग असतो का आपल्याला. ज्यांना शरीर आहे, त्यांना ठीक आहे ते… आपल्याला काय ? पाणीही भिंतीवर पडणार आणि स्प्रेचा फवाराही भिंतीवरच उडणार… आणि त्या मुलीला कसा भेटतो, ते वेताळच जाणे.”
“”वेताळ काय जाणे… परवा तो पालखीलाही आला नव्हता वेताळाच्या…” एजंट म्हणाला.
“”काय सांगता… आता काय करायचं हो. तुम्हीच सांगा काहीतरी. मार्ग काढायलाच हवा आता…”
“”माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे इथं. वेताळबाबांचा साक्षात्कार झालाय त्याला. त्यांच्या मंदिराचाच पुजारी आहे तो. तेच काहीतरी मार्ग काढतील. तुम्ही फक्त तुमच्या चिरंजीवांना तिथपर्यंत न्यायची व्यवस्था करा…”
“”ते करतो आम्ही; पण हे असं कसं झालं हो… त्याला इतक्‍या चांगल्या हडळी सांगून येत होत्या… आता ही बातमी पसरली तर… पुढचं अवघडच होईल हो. आम्हाला एक मुलगीही आहे. तिचं कसं जुळावं… मनुष्याच्या नादी लागलेल्या भावाच्या बहिणीला कोण पत्करेल…”
“”तुम्ही नका काळजी करू. ही गोष्ट आपल्या बाहेर जाणार नाही. तुम्ही फक्त आज रात्री वेताळबाबांच्या मंदिरात या.”

प्रसादच्या आई-बाबांनी मग त्याची समजूत काढून, लग्नाचा मुहूर्त शोधण्याच्या आमिषानं आणि लग्न आपल्याच पद्धतीनं लागेल या अटीवर त्याला तयार केलं, त्याची समजूत काढली आणि वेताळबाबांच्या मंदिराचा रस्ता धरला.
“”पुजारीबुवा, तुम्हाला यांनी साऱ्या गोष्टी सांगितल्याच असतील. आता तुम्हीच मार्ग काढा…”
“”हं… एकंदर अवघड दिसतंय सगळं. हा ज्या घरात राहात होता, ते घर आहे एका कट्टर नास्तिकाचं. त्यांचा त्यांच्या देवावर विश्‍वास नसतो, तर आपल्यावर कसा असेल ? त्यांनीच झपाटलंय याला. आता त्याचा स्वतःवरच विश्‍वास नाही. त्याला माणूस व्हायचंय आता…”

अखेरीस सुमारे चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर प्रसाद पुन्हा एकदा माणसात, आपलं भुतांत आला… त्याचं एका हडळीशी लग्नही झालं आणि एक भूत मार्गी लागलं…

****

“”सच्या… कसल्या गोष्टी सांगतोस रे…”
सचिन, राहूल, अम्या, मंद्या आणि दीपक मस्त अड्डा जमवून बसले होती. भुतांच्या गोष्टीचा विषय निघाल्यावर सच्यानं त्यांना ही मजेशीर गोष्ट सांगवून गप्पांतली रंगत वाढवली…
“”नाहीतर काय… दरवेळी तुमचं तेच काहीतरी भितीदायक, म्हटलं जरा बदल करावा.”
“”बरोबर आहे. मजा आली…” साऱ्यांनी एका सुरात अनुमोदन दिलं…
“”मग… चला यावर होऊन जाऊ दे एक एक…”
“”अम्या… चल रे उठ…”
“”अम्या, अरे अम्या… अम्या कुठे गेला रे ?”
“”इथं तर होता. असेल बघ. नाहीतर टॉयलेटला गेला असेल.”
“”….”"
“”अबे, बराच वेळ झाला. पडला बिडला नाही ना… मंद्या त्याला पाहून ये जरा…”
“”अरे इथं नाहीये…”
“”गेलाय कुठं?”
“”मित्रांनो… मी आहे. इथंच आहे. सच्या, थॅंक्‍यू. तुझ्या त्या कथेमुळे माझे डोळे उघडले. जे आपलं नाही, त्याला मोह धरू नये आणि आपलं जपून ठेवावं हे समजलं… इतके दिवस मी तुमच्यात राहिलो. तुम्हीही मला आपलं मानलंत. धन्यवाद ! सच्या तुझ्या गोष्टीतल्या प्रसादसारखीच माझी गत झाली होती. माणूस नसताना मी स्वतःला माणूस समजून बसलो होतो. स्वतःची भूतयोनीच विसरून गेलो होतो. घाबरू नका. मी मित्रच आहे तुमचा. यापुढे कधी गरज भासली, तर हाक मारा मी आहेच…”

कथेला भलतंच वळण मिळालं होतं. त्या कथेमुळे एकाला दिशा सापडली होती आणि इतरांची दशा बिघडली होती…

No related posts.

,

This post was written by:

Sudoku - who has written 39 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro