- नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅरोमाईंडेडनेस (Eric Drexler)
- व्हॉट शूड आय डू नेक्स्ट? (Evan Williams)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #1)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #2)
- आधुनिक शिल्पकार (Jonathan Ive, #3)
- प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न (Paul Buchheit)
- लाँग लिव्ह ‘वेब’! (Tim Berners-Lee)
- एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)
- इन्स्पायर्ड बाय पीपल (Axel Meyer)
पाहताक्षणी प्रेमात पडणं म्हणजे काय असतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर जवळच्या कोणत्याही मोबाईल स्टोअरमध्ये जा आणि नोकियाचा नवा ‘एन-९७’ हा हँडसेट पाहा. अट एकच - मोबाईल या प्रकारावर मर्यादेपलीकडे प्रेम असणं अावश्यक. टीव्ही, पेपर आणि मॅगझिन्समधल्या जाहिराती पाहून हा फोन आपल्या खिशात कधी येईल, अशी स्वप्नं तुम्हाला पडत असतील तर मोबाईल या प्रकारावर तुमचे जीवापाड प्रेम आहे म्हणून समजा. अशा परिस्थितीत तुमच्या समोर ‘एन-९७’ आला तर तुमची काही खैर नाही. ‘कमजोर बँक बॅलेन्सवाले यह धोका न पत्करें,’ अशी पुणेरी सूचना आताच देऊन टाकतो. असो. तर, मनात घर करणारा हा फोन आता भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. अॅपलच्या ‘अायफोन’शी थेट स्पर्धा करणारा हा फोन ‘आयफोन-किलर’ वगैरे नसला तरी देखणा मात्र नक्कीच आहे.
नव्या पिढीची मानसिकता बरोबर हेरून अॉनलाईन जगात वावरणाऱ्यांसाठी हा फोन डिझाईन केलाय. २००६ मध्ये नोकियाच्या टोक्योतील केंद्रात या फोनचे बीज रोवले गेले आणि त्याला आकार देण्याच्या प्रक्रियेत शेकडो डिझायनर्स, इंजिनिअर्स, प्रोग्रामर्स, मार्केटिंग मॅनेजर्ससह नोकियाच्या ‘एन सिरीज’ डिझाईन विभागाची धुरा सांभाळणारा दक्षिण अमेरिकी अॅक्सेल मायर याने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. या फोनच्या प्रचारासाठी अॅक्सेल नुकताच भारतातही येऊन गेला. ‘टेक्नॉलॉजी पायोनियर्स’च्या या भागात अॅक्सेल आणि ‘एन ९७’ वर एक नजर.
मोबाईल फोन डिझाईन करणे म्हणजे किती कठीण काम असतं, याची कल्पना तुम्हा-आम्हाला येणार नाही. कोणताही नवा फोन आला की तो आपल्याला घ्यावासा वाटतो. यावरून हे काम किती कठीण आहे, याची कल्पना तुम्हाला आली असेल. मोबाईल डिझाईन करताना सतत नावीन्याचा शोध घ्यावा लागतो. एक साचा तयार केला की काम संपलं, असं होत नाही. मोबाईलच्या बाह्यरूपात आणि फंक्शनॅलिटिजमध्येही सातत्याने बदल करावे लागतात. गेल्या १०-१५ वर्षांत जग इतके बदलले आहे की एकेकाळी केवळ बोलण्यासाठी आणि एसएमएस पाठवण्यासाठी वापरले जाणारे मोबाईल फोन आज पर्सनल कॉम्प्युटरची भूमिका पार पाडत आहेत. चोवीस तास अॉनलाईन राहणे आजची गरज बनली आहे. ही गरज ओळखून, ग्राहकांशी थेट संवाद साधून, त्यांच्या मनातील आदर्श मोबाईल फोनची कल्पना काय आहे, हे जाणून घेऊन नव्या फोनची रचना करावी लागते. या साऱ्याचा विचार करून जगातील आघाडीच्या मोबाईल फोन उत्पादक नोकियाने २००२ मध्ये मल्टिमीडिया हँडसेटचे स्वतंत्र उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. ही सिरीज ‘एन-सिरीज’ या नावाने ओळखली जाणार होती.
एक ग्राहक म्हणून विचार केल्यास सर्वांत आधी आपण फोनचा आकार, रंग, रूप पाहून त्यानंतर त्याच्या फंक्शनॅलिटिजकडे वळतो. त्यामुळे पाहताक्षणी नजरेत भरणारे डिझाईन यास कोणताही मोबाईल उत्पादक प्राधान्य देतो. त्यामुळे मनमोहक डिझाईन आणि तेवढ्याच ताकदीच्या फंक्शनॅलििटज यांची सांगड घालू शकणाऱ्या एका व्यक्तीच्या खांद्यावर नोकियाने ‘एन-सिरीज’च्या डिझाईन विभागाची जबाबदारी सोपवली. अॅक्सेल मायर हे त्या व्यक्तीचे नाव. नोकियात नोकरी सुरू करून अॅक्सेलला अगदी काही महिनेच झाले होते; पण त्याचा पूर्वानुभव तगडा होता.
अॅक्सेल मूळचा अर्जेंटिनाचा. बारावीची परीक्षा दिलेल्या मुलाला, आता पुढे काय करायचे असा प्रश्न जेव्हा पडायला लागतो त्या वयात अॅक्सेलने आपली भविष्याची दिशा ठरवून टाकली होती. त्याला पुरातत्त्व संशोधक व्हायचे होते. पण झालं भलतंच. सर्वसाधारणपणे मुलं आपल्या वडिलांवरून प्रेरणा घेऊन त्यांच्याच व्यवसायात उतरतात. अॅक्सेलचे वडिल उद्योगपती होते आणि आई मानसतज्ज्ञ. पण अॅक्सेलला त्याच्या होणाऱ्या सासऱ्याचा जॉब भयंकर आवडला. त्याचे होणारे सासरे एका स्थानिक कंपनीसाठी कार डिझाईन करत होते. त्यांच्या डिझाईन्सवरून प्रेरित होऊन त्यानेही याच क्षेत्रात अभ्यास करण्याचे ठरवले आणि ब्युनॉस अायर्स विद्यापीठातून ‘प्रॉडक्ट डिझाईन’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर फ्रीलान्स डिझायनर म्हणून काम करताना लोकांचे आयुष्य सुखकर करणारी अनेक उत्पादने त्याने डिझाईन केली. १९९४ मध्ये अॅक्सेलने फिलिप्सच्या डिझाईन विभागात नोकरी पत्करली. २००० पर्यंत तो फिलिप्समध्ये नोकरीस होता. फिलिप्सने याच काळात मोबाईल उत्पादनात पाऊल टाकले होते. मोबाईल डिझाईनिंगचा पहिला अनुभव अॅक्सेलला इथेच मिळाला. इथला त्याचा अनुभव त्याला पुढे खूप कामास आला. त्यानंतर दोन वर्षे अर्जेंटिना, बेल्जियम, नेदरलँड आदी ठिकाणी त्याने डिझाईन कन्सल्टन्ट म्हणून काम केले आणि २००२ मध्ये तो नोकियाच्या डिझाईन विभागात रूजू झाला. ग्राहकांच्या स्वप्नातील फोन प्रत्यक्षात आणण्याची अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी अॅक्सेलवर सोपवण्यात आली आणि त्याने ती आनंदाने स्वीकारली. “मला कुठेही स्वप्न पाहण्याची सवयच जडली आहे. खरं सांगू, यातूनच मला फोनच्या कल्पना सुचतात. एन-९७ नेही अशाच एका छोट्याशा कल्पनेतून आकार घेतलाय.” ‘बिझनेस वर्ल्ड’ला दिलेल्या मुलाखतीत अॅक्सेलने असा उल्लेख केला आहे.
अर्थात, त्याला सुचलेल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्या सोबत काम करणाऱ्या ३२० जणांच्या टीमचेही योगदान तितकेच मोलाचे आहे. या टीमबद्दल अॅक्सेल म्हणतो, “कोणत्याही फोनचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी थेट ग्राहकांचा फीडबॅक घेणं आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. फोनचे प्रोटोटाईप देऊन त्यावर ग्राहकांच्या प्रतिक्रिया मागवल्या जातात. त्यानुसार आवश्यक ते बदल करून त्या उत्पादनाला अंतिम स्वरूप दिलं जातं. त्यामुळे आगामी तीन ते पाच वर्षांत ग्राहकांच्या आवडी-निवडी कशा बदलणार आहेत हे जाणणारे; तसेच समाजात होणारे बदल हेरून त्यानुसार उत्पादनात बदल सुचवणारे तज्ज्ञही माझ्या टीममध्ये आहेत. या टीममध्ये तब्बल १७ देशांतील कर्मचारी आहेत. एन-९७ हा प्रोजेक्ट टोक्योत सुरू झाला. मेकॅनिक्सवर काम करणारी टीम टोक्योत, इंडस्ट्रियल डिझायन टीम फिनलंडमध्ये आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर्स बोस्टन, डल्लास, भारत, चीन आणि सिंगापूरमध्ये होते. पण सर्वांचे ध्येय एकच होते - जनरेशन ‘सी’साठी एक अजोड मोबाईल फोन तयार करणे!”
जनरेशन ‘सी’ अर्थात जनरेशन कटेन्ट! फेसबुक, फ्लिकर, यू ट्यूबवर जगणाऱ्या आजच्या पिढीला ‘सोशल मीडिया’बद्दल वेगळं सांगण्याची काही एक गरज नाहीये. अॅक्सेलच्या म्हणण्यानुसार, आज जवळपास दोन अब्ज लोक फेसबुकवर आपले फोटो अपलोड करताहेत. एन-सिरीजच्या फोनवरून काढलेले सुमारे दोन कोटी फोटो आतापर्यंत फ्लिकरवर अपलोड केले गेले असून यू ट्यूबवर एका मिनिटाला तब्बल नऊ तासांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. हा दररोज तयार होणारा ताजा मजकूरच आहे. अॅक्सेलच्या अंदाजानुसार २०१२ पर्यंत विविध माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या मजकुरापैकी तब्बल २५ टक्के मजकूर हा सर्वसामान्य लोकांनीच तयार केलेला असेल. असं भविष्य समोर दिसत असेल तर लोकांना ‘एन-९७’ सारखेच मोबाईल फोन लागणार, यात शंका नाही. म्हणूनच N97 is inspired by people, असं अॅक्सेल म्हणतो.
‘एन-९७’च्या प्रत्येक फीचरचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला गेल्याचे नोकियाने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. फोन स्लाईड करताना होणाऱ्या आवाजापासून ते होम स्क्रीनवर कोणते अॅप्लिकेशन कुठे असावे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर अॅक्सेलच्या टीमने रात्रं-दिवस कष्ट घेतल्याचे हा फोन पाहिल्यावर लक्षात येते. अगोदर म्हटल्याप्रमाणे हा फोन अगदी परफेक्ट अाहे, असं मुळीच म्हणता येणार नाही. फोन लाँच झाल्यानंतरच्या आठवड्यात लगेचच या फोनबद्दल तक्रारी येण्यास सुरवात झाली; पण अशा तक्रारी ‘आयफोन’बाबत आजही सुरू आहेत. ‘एन-९७’च्या माध्यमातून नोकियाच्या निस्सिम चाहत्यांना ‘आयफोन’च्या तोडीचा एक पर्याय उपलब्ध झालाय, हे मात्र खरे आणि ही तर केवळ सुरवात आहे, असं खुद्द अॅक्सेलचं म्हणणं आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात याहूनही सरस, आकर्षक आणि लोकांच्या अधिक जवळ जाणारे हँडसेट्स बाजारात येणार हे निश्चित!
Making of the Nokia N97 video (with “blood, sweat and tears”)
No related posts.



Leave a Reply