उपवास…फेसबुकचा!

Tue, May 12, 2009

Clone, Fantastic 5

उपवास…फेसबुकचा!

जगभरातील सुमारे २० कोटी लोकांचे नेटवर्क असणारे फेसबुक भारतातही वेगाने पसरतेय. आतापर्यंत अॉर्कुटवर रमणारे आता फेसबुकवर सापडतात. ज्यांना अॉर्कुट अावडत नव्हतं, ते आधीपासूनच फेसबुकवर होते. आता त्यांच्या फेसबुकवरील मित्रांच्या संख्येतही वाढ झाली आणि त्यामुळे शेअरिंगचे प्रमाणही वाढलेय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर वावर असणं ही काळाची गरज असली तरी त्याचा अतिरेक होता कामा नये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही किमान दहा-बारा वेळा फेसबुकवर लॉग-इन होत असाल किंवा दिवसातील किमान दोन-अडीच तास फेसबुकवर घालवत असाल, तर तुम्ही फेसबुकच्या आहारी गेला आहात, असे समजा. यातील आकड्यांना फारसे महत्त्व नाही. कारण, वैद्यकीयदृष्ट्या ‘फेसबुक अॅडिक्शन’ असा काहीच प्रकार नसल्याने अतिरेक होतोय किंवा नाही, हे आपले आपल्यालाच ठरवावे लागेल. तुम्ही ‘फेसबुक अॅडिक्ट’ अाहात किंवा नाही, हे तपासण्यासाठी हे ढोबळ आकडे मांडले आहेत. पण यावरून तुम्हाला ‘अॅडिक्शन’चा अंदाज नक्कीच येऊ शकतो.

डोळ्यांवर आलेल्या झोपेला बाजूल ठेवून रात्री उशीरापर्यंत फेसबुकवर स्टेटस मेसेज अपडेट करणे, नेमून दिलेल्या कामाकडे दुर्लक्ष करून फेसबुकवर रमणे, अॉफलाईन असतानाही सतत फेसबुकचा विचार करणे, मोबाईल किंवा ब्लॅकबेरीवरून फेसबुक स्टेटस अपडेट करणे, ही फेसबुक अॅडिक्शनची काही प्राथमिक लक्षणे. ही लक्षणे तुमच्यात आढळून आल्यास तुम्हाला सविस्तर तपासणीची गरज आहे, हे लक्षात ठेवा. या तपासणीसाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त एक प्रश्नावली डाऊनलोड करावी लागणार आहे. ही प्रश्नावली (Source) भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ‘अॅडिक्शन’ची पातळी ठरवता येईल. एकदा का ही पातळी तुमच्या लक्षात आली की, त्यानंतर तुम्ही योग्य ते ‘उपाय’ करू शकता.

अगदी प्राथमिक स्तरावरील ‘अॅडिक्शन’ असल्यास तुम्ही ठराविक वेळीच फेसबुकला भेट देण्याचे ठरवून अतिरेक टाळू शकता.

मध्यम स्वरूपाचे ‘अॅडिक्शन’ असल्यास तुम्ही नेमकं कशासाठी फेसबुक वापरता, हे तपासून पाहा. मी गेल्या आठवड्यात अमूक कारणांसाठी फेसबुक वापरलं, हे चक्क कागदावर मांडा. त्यातून तुम्हाला आवश्यक-अनावश्यक गोष्टींचा अंदाज येईल व फेसबुकवरील वेळ कमी करण्यास मदत होईल.

गंभीर स्वरूपाचे ‘अॅडिक्शन’ असलेल्यांनी सारा ब्राऊनचा पर्याय वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल कोण ही सारा ब्राऊन आणि कसला पर्याय?

‘अो अॅण्ड एम’च्या शिकागो आणि न्यूयॉर्क अॉफिसमधील माजी क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि ‘द गुरू अॉफ न्यू’ ब्लॉगची लेखिका सारा ब्राऊनला आपण फेसबुकच्या आहारी जातोय, असे वाटू लागले. यावर उपाय म्हणून तिने चक्क फेसबुकचा उपवास धरण्याचेच ठरवले! तब्बल चाळीस दिवस ती फेसबुकपासून दूर राहिली - नो स्टेटस मेसेजेस, नो पोक्स, नो रायटिंग अॉन वॉल…नथिंग! आश्चर्य म्हणजे, उपास पूर्ण होण्यापूर्वीच तिला असे लक्षात आले की केवळ फेसबुकंच नव्हे; तर अख्ख्या सोशल नेटवर्किंगपासून काही दिवस दूर राहण्याची वेळ आता आलीय. या प्रक्रियेला तिने ‘सोशल मीडिया डिटॉक्सिफिकेशन’ असे नाव दिले. (आपण याला ‘सोशल मीडिया पंचकर्म’ :-) असं म्हणू शकतो.)

साराने सोशल मीडियाच्या अॅडिक्शनबद्दल अनेक चांगले मुद्दे मांडले आहेत. ‘आम्ही बिझनेससाठी सोशल नेटवर्किंग वापरतो,’ अशी वाक्ये तुम्ही अनेकवेळा ऐकली असतील. अनेकांना यातून बिझनेस मिळतंही असेल. पण तुम्ही फेसबुकवर घालवलेला वेळ आणि त्यातून मिळालेला बिझनेस यांचा मेळ जमतो का, हेही पाहायला हवं. आज जमवलेले मित्र उद्या बिझनेससाठी उपयोगी ठरू शकतात, हे खरे असले तरी त्यासाठी दिवसातील बहुतांश वेळ फेसबुकवर घालवणे कितपत योग्य आहे, याचाही विचार केला पाहिजे.

फेसबुकसारख्या सेवा वापरताना प्रत्येकाने आपल्या मनात आपली ‘सोशल मीडिया स्ट्रॅटेजी’ आखली पाहिजे. केवळ ‘अॉनलाईन नेटवर्क’ वाढवून काय साध्य होणार आहे, हे तपासलं पाहिजे. शक्य असल्यास या मित्रांचे ‘अॉफलाईन नेटवर्कही तयार करावे. अनेकवेळा समोरासमोर आल्यानं मैत्रीतला ओलावा वाढून त्याचा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात फायदा होऊ शकतो. एकमेकांना एकदाही ‘हाय’ न केलेले शेकडो चेहरे तुम्हाला तुमच्याच ‘फ्रेंडलिस्ट’मध्ये दिसतील. अशा चेहऱ्यांचे काय करायचे? तसेच ठेवायचे की डिलीट करायचे? या प्रश्नाचे उत्तरही तुमच्याकडे असले पाहिजे.

सोशल नेटवर्किंग वाईट आहे किंवा त्या मार्गाला जाऊ नये, असं मला यातून कुठेच म्हणायचं नाही. या सेवांची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध झाली आहे; पण त्यांचा योग्य तो आणि योग्य तितकाच वापर करावा एवढंच यातून सुचवायचं आहे.

Related Reading:
Are You Suffering from Facebook Addiction Disorder (FAD)?

Related posts:

  1. िबजनेस बढेगा क्या?
  2. अॉनलाईन आयडेंटिटी…
  3. एजंट फॉर ‘चेंज’ (Chris Hughes)

, , ,

This post was written by:

Clone - who has written 42 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro