अद्भूत (लेखकः मृत्युंजय)

Fri, Aug 28, 2009

Fantastic Readers

अद्भूत (लेखकः मृत्युंजय)

नमस्कार मित्रांनो,

‘फँटास्टिक फाईव्ह’च्या वाचकांना आपले लिखाण आमच्यापर्यंत पाठविण्याचे आव्हान केल्यानंतर आमच्याकडे आलेल्या पहिल्या कथेचे स्वागत. मृत्युंजय या आमच्या नियमित वाचकाने एक रोमांचक कथा आपल्यासाठी पाठवली आहे. ती कथा आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत. तुम्हीही तुमचे लेख, कथा, टिप्स, लिस्ट्स या साईटसाठी पाठवू शकता. तुमच्या लेखांच्या प्रतिक्षेत…
कळावे आपले,

फँटास्टिक फाईव्ह.

अद्भूत
लेखकः मृत्युंजय

“प्रसाद?” कॅफेच्या बाहेरून एक आजोबा विचारत होते.
“या ना, मीच प्रसाद,” मी त्यांना आदराने आत बोलावत म्हणालो.
आजोबा आत येऊन बसले.
“मी शरद कारखानीस, नानांनी तूमच्याकडे पाठवले होते.”
नानांचे नाव निघताच मी थोडा चमकलो. भूतकाळातील अनेक नको असलेल्या आठवणींची भूते माझ्याभोवती पिंगा घालू लागली. माझ्या अंगावर सरसरून शहारा आला.

जास्त नाही - आठ एक महिने झाले असतील या गोष्टीला. मी जयराज, वहिनी आणि त्यांची दोन गोजिरवाणी पाखरे जयराजच्या त्या कोकणातल्या जून्या घरी चार दिवसांच्या सुटीसाठी म्हणून दाखल झालो होतो. खरं तर हे जयराजच्या आत्याचे घर. तिच्या मृत्यूनंतर जयराज एकदाच काय तो इकडे येउन गेला होता. त्यानंतर घराची साफसफाई वगैरे सगळं कुळांच्या भरवशावरच होते.
आम्ही येणार म्हणून घर कसे मस्त झाडून, पुसून, सारवून घेतलेले दिसत होते. घराबाहेर एवढी मोठी मोकळी जागा बघून हरखून गेलेले रोहित आणि रसिका आल्या क्षणापासूनच हुंदडायला लागले होते. नजर जाईल तोवर मोकळा माळ, काही खुरटी आणि मधूनच काही पोफळीची झाडं दिसत होती. नजरेच्या शेवटच्या टप्प्यात समुद्र येत होता आणि कानावर त्याच्या लाटांचा तो धीरगंभीर आवाज पडत होता. पंधरा-वीस घरांचीच त्या छोट्याशा वाडीने मनात घर केलं.

नाचणीची भाकरी, फणसाची भाजी, खर्डा असे भरभक्कम जेवण करून मी आणि जय समुद्रावर एक चक्कर टाकून आलो. येता- येता दूसऱ्या दिवशीच्या ‘बैठकीची’ जागा पण ठरवून झाली होती. वाडीवर वीज नावापुरतीच आली होती. ती असायची कमी आणी नसायचीच जास्त. कंदिलाच्या टिमटिमत्या उजेडात वस्ती कशी एखाद्या चित्रासारखी दिसत होती.
आम्ही येईपर्यंत पोरं झोपून गेली होती. दोन बाजा टाकून मी आणि जयने अंगणात ताणून दिली. रात्रीचे अचानक मला जाग आली. कोणीतरी छातीवर बसल्यासारखं वाटलं. माझा श्वास गुदमरला होता. चारही बाजूंनी साकोळलेला काळोख आणि समुद्राचा गंभीर आवाज त्यात अजूनच भितीची भर घालत होता. मनाची समजूत घालत मी पुन्हा आडवा झालो. डोळे मिटायला तयार नव्हते. आकाशाकडे बघण्यात काही वेळ गेला. तोच कुणीतरी किंचाळल्यासारखा आवाज कानावर पडला. मी धडपडत उठलो आणि कंदिलाची वात मोठी केली. जय… हो जयंच कण्हत होता आणि तो आपल्या शरीरापासून कोणाला तरी दूर करण्याचा प्रयत्न करत होता. मी धावत त्याल हाका मारत त्याच्या दिशेने धावलो. ज्या वेगाने मी त्याच्याकडे धावलो त्याच्या दुप्पट वेगाने मी पुन्हा मागे फेकला गेलो. हे काहीतरी विचित्र आहे, अमानवी आहे हे माझ्या लक्षात आले. जयचे नशिब चांगले असावे; कारण काही वेळातच त्याची धडपड थांबली व तो डोळे उघडून आजुबाजूचा वेध घ्यायला लागला.
“जय, आर यू ओके मॅन ?” ठेचकाळलेले अंग सावरत मी म्हणालो.
जयची मान हळूहळू माझ्या दिशेला वळली आणी मी अंतर्बाह्य थरारून उठलो. परमेश्वरा! एखाद्या हिंस्त्र श्वापदा सारखी ती नजर माझा वेध घेत होती. मी पटकन दोन पावले मागे सरकलो. जयच्या तोंडातून गुरगुरल्यासारखे विचित्र आवाज निघत होते.

इथं थांबण्यात धोका आहे… माझे मन मला आतून सावध करत होते. पण मी पळून जाणार तरी कुठे होतो? एकतर या भागाची माहिती नाही. त्यात जय, वहिनी आणी त्या दोन गोजिरवाण्या जिवांना असं संकटात टाकून पळून जाणे मला खचितच जमले नसते. जे काय होईल त्याचा सामना करायचा असे मनाशी ठरवून मी हळूहळू घराच्या दाराकडे सरकू लागलो. तोच जयने अचानक वेगवान हालचाल केली. घराच्या खिडकीतून एखाद्या मांजरीने उडी मारून आत शिरावे अशा सहजतेने तो आत शिरला. आता मात्र वेळ घालवणे धोक्याचे होते. कसलाही विचार न करता मी त्याच्या मागोमाग आत शिरलो. आतला प्रकार खरंच भयानक होता. दोन कंदिलांच्या उजेडात वहिनी दोन्ही गुढगे छातीशी दुमडून त्या दोन लेकरांच्या मध्ये बसल्या होत्या आणि त्यांची नजर जयच्या डोळ्यात एकवटलेली होती.

“वहिनी, वहिनी…,” मी जोरात ओरडलो. दुसऱ्याच क्षणी सर्रकन वळून जयने माझ्या अंगावर झेप घेतली. एका क्षणात माझा गळा त्याच्या पंज्यात आवळला गेला आणी त्याची ती हिंस्त्र नजर माझ्या नजरेत सामावली. काही क्षणासाठी मी काळ, वेळ साऱ्याचे भान विसरलो. मेंदूवर एक काळसर थर साचायला सुरवात झाली. अचानक कुठून प्रेरणा आली कळले नाही, पण मी एका हाताने जयच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे काही क्षण गडबडून गेलेल्या जयच्या दोन्ही पायात एक जोरदार लाथ मारत मी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. मिणमिणत्या उजेडात जयचा तो रक्ताळलेला चेहरा भेसूर दिसत होता. पण या प्रकारामुळे एका गोष्टीचा मला अंदाज आला होता की, जयच्या शरीराचा ताबा घेतलेल्या त्या अमानवी शक्तीला जयच्या शरीराचीच मर्यादा होती.

“बाबा.”
रसिकाच्या हाकेने मी भानावर आलो. काहीतरी अॅक्शन घेणे अावश्यक होते; नाहीतर सुटका अशक्य होती. वहिनींनी दोन्ही मुलांना आपल्या कुशीत लपवून ‘अहो,अहो भानावर या,’ असा जप लावला होता. आणि त्याचवेळी अचानक माझ्या कल्पना किती बालिश होत्या याचे प्रत्यंतर देण्यासाठीच जणू जयने आपला आकार बदलायला सुरवात केली. विरळ होत जात त्याचे शरीर आता धूसर दिसायला लागले होते. एका झाडासारख्या आकाराने छतापर्यंतचा भाग व्यापला होता. हळूहळू तो विषारी आकार घरभर पसरणार होता. वहिनी जवळ-जवळ मूर्छीतावस्थेत पोचल्या होत्या.

मनाला येइल ते मंत्र, श्लोक, रामरक्षा यांचा जप चालूच होता. मी त्याच्या बरोबरीने घरभर काही मदतीसाठी उपयोगात येऊ शकते का, ते बघत होतो. पण त्या वापर नसलेल्या घरात असे होतेच काय? नाही म्हणायला एक सरस्वती, गणपती आणि लक्ष्मीचा एकत्र फोटो खिळ्यावर लटकत होता. मी ताबडतोब त्या दिशेने धाव घेतली. लटपटत्या हातानी मे तो फोटो काढून घेत असतानाच तो आकार त्या तिघांवर झेपावला होता.

“सोड त्यांना,” असे ओरडतच मी त्या धुक्यात प्रवेश केला. क्षणभर मेंदूतली प्रत्येक शीर उलटी-पालटी झाल्याचा अनुभव आला. छातीशी तो फोटो गच्च पकडून मी मनातल्या मनात देवाचा धवा सुरू केला. शरीराची नुसती आग होत होती. मेंदूच्या शिरा आक्रसल्या जात होत्या आणि…आणि त्याच क्षणी ते घडलं, फोटोतून बाहेर पडलेली एक तेजपुंज रेषा माझ्या शरीरात प्रवेशकर्ती झाली. काही क्षणासाठी माझे शरीर अक्षरश: झगमगून उठले. शरीर आणि मेंदूवरील बंधने तुटत असल्याची जाणीव होत असतानाचा मी शूद्ध हरपून खाली कोसळलो.

जाग आली तेव्हा जय, वहिनी आणि दोन्ही पाखरं माझ्या आजूबाजूला बसलेली दिसली. मला डोळे उघडताना बघून जयचा खुललेला चेहरा मला अजूनही आठवतोय. खरंच त्या रात्री काय ‘जागले’ होते अथवा ‘जागवले’ गेले होते, याची मला कल्पना नाही. पण जे घडले ते खरच अकल्पित आणि भयंकर होते. त्या विषयाची चर्चा टाळत आम्ही कोकणाचा निरोप घेतला.

आयुष्यात आलेली एक काळरात्र येवढीच आपल्याला तिची आठवण राहिल आणि मग हळू-हळू तीही धूरकट होत जाईल, असे मला वाटत होते. पण दैवयोग काही विचित्र होता. नियतीचे फासे काही वेगळेच पडले होते. या घटनेनंतर साधारण दोन महिन्यानंतर ध्यानी-मानी नसताना एक गोष्ट घडली.

शामराव - म्हणजे माझ्या काकांचे मित्र एक दिवस अचानक रस्त्यात भेटले. घाईघाईत कुठेतरी निघालेल्या शामरावांना मी हाक मारली. खरं तर मी तसा माणूसघाणा माणूस. कोणाला हाक वगैरे मारून गप्पा मारणे अशक्यच. पण काहीतरी विचित्र घडत होतं.

“शामकाका, अती घाई संकटात जाई, वाट बघा. शेवटी कापूसच मदतीला धावणार. विश्वास ठेवा,” असं काहीसं मी त्यांच्यासमोर बोलून गेलो. मी काय बोलतोय, हे माझं मलाच कळेना. ते शामराव थांबतात काय, मी वेड्यासारखं बरळतो काय - मला कशाचाच अर्थ लागेना.

दूसऱ्या दिवशी दुपारी शामराव माझ्या कॅफेत हजर झाले. मी काही बोलायच्या आतच त्यांनी माझ्या पायाला हात लावला. “लेकरा वाचवलेस रे संकटातून,” शामराव म्हणाले. मला काही अर्थबोधंच होईना. नंतर शामरावांच्या तोंडून कळाले की त्यांच्या कर्जाचे तीन हप्ते थकले होते. यावेळीही कापसाने हात दिला नाही, अशा अवस्थेत शामराव आत्महत्या करायला निघाले होते. मला भेटले तेव्हा ते ‘टिक ट्वेन्टी’ खरेदी करूनच निघाले होते. रस्त्यात मी त्यांना भेटलो. हाक मारली आणि काहीतरी बरळलो. त्यांच्या म्हणण्यानुसार, का कोणास ठाऊक, पण माझ्या शब्दांवर त्यांचा इतका विश्वास बसला की त्यांनी ती टिक ट्वेन्टीची बाटली फेकून दिली आणि आज सकाळीच गुजरातचा एक व्यापारी येऊन कापसाचा सौदा करून गेला.
मी सुन्न झालो…

हे सुन्न होणे एवढ्यावर थांबणार नाहीये, हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला. त्याच पंधरवड्यात अजून दोन विस्मयकारक घटना घडल्या. पार्किंग मध्ये असताना मला राजपाठक काकूंच्या घरातील सुरू राहिलेल्या गॅसचा वास आला. काकू राहतात पाचव्या मजल्यावार. त्यामुळे हा वास पार्किंगमध्ये येणं अशक्य होतं. आला तो आला वर हा वास कुठून येतोय, कसा येतोय असले कोणतेही विचार डोक्यात यायच्या आत गॅसचा वास येतोय आणि तो राजपाठकांच्या घरातून येतोय एवढ्या स्वच्छ विचारांनी डोक्यात उगम घेतला आणि त्याक्षणी मी पाचव्या मजल्यावर धावलो.

“अरे मला तर काहीच कळालं नाही. बरं झालं तू आलास बाबा,” काकूंच्या या वाक्यावर हसत मी त्याच्या घराबाहेर पडलो आणि शांतपणे जिन्यात बसून राहिलो.

या घटनेला आठवडा उलटत नाही तोच एकदा रस्त्याने जाताना मी अचानक सायकल थांबवली. रस्ता क्रॉस करून पलिकडे गेलो आणी फुटपाथवर झोपलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला या बाजूला घेऊन आलो. मी सायकलपाशी पोचतो न पोचतो तोच पलिकडच्या फुटपाथवर लाईटच्या खांबावरची तार कोसळली.

मी भानावर आलो तेव्हा रस्त्यावरून जाणारी लोकं थबकून माझ्याकडे बघत होती. मी पटकन तिथून काढता पाय घेतला. मला खरंच काही सुचत नव्हतं. हे सगळं जे घडत होतं ते माझ्या बुद्धीच्या आवाक्या बाहेरचे होते. बरं हे जे काही घडत होतं ते सांगणार तरी कुणाला?

शेवटी मीच त्रयस्थपणे या घटनांचा अर्थ लावायला सुरवात केली. लक्षात न आलेल्या बऱ्याच गोष्टी हळू-हळू माझ्या ध्यानात येऊ लागल्या. तसा मी देवभोळा वगैरे नाही; पण रोज आंघोळ झाली की अंग पुसता-पुसता अथर्वशीर्ष म्हणायचो. आजकाल अथर्वशीर्षाच्या जोडीने मी रामरक्षा आणी हनुमानस्रोत्रदेखील म्हणायला लागलो होतो. फावल्या वेळात हळूच ‘तसल्या’ वेबसाईटवर चक्कर मारणारा मी आजकाल नारदपुराण, स्कंदपुराण आदींचे दाखले इंटरनेटवर शोधू लागतो. आठवड्यातून एकदा का होईना दोन घोट मारणारा मी आजकाल जवळ-जवळ निर्व्यसनी या समूहात मोडायला लागलो होतो. हा केवढा बदल झालाय माझ्यात, याची जाणीव झाली आणि मी पुन्हा एकदा सुन्न झालो.

मी या मनःस्थितीत असतानाच आमच्या गल्लीतल्या ग्रुपने शनिवार-रविवार सज्जनगडावर जायची कल्पना काढली. हो-नाही करत मी तयार झालो. खरं तर मलाही थोडासा चेंज हवा होता. या सहलीत काही विचित्र माझ्या हातून घडू नये, एवढीच काय ती काळजी मनाला ग्रासून होती. पण गंमत म्हणजे आम्ही जसे सज्जनगडाच्या जवळ पोचत होतो, तसे माझे मन एका अनामिक शांतीने भरून जाऊ लागले. ही एक वेगळीच अनुभूती होती…या आधी कधीही न अनुभवलेली. एखाद्या कल्पवृक्षाकडे आपण निघालो आहोत, अशी काहीशी भावना मनात येत होती.

संध्याकाळच्या सुमारास गडावर पोचलो. हातपाय धुवून व्यवस्थित दर्शन घेतले. त्यानंतर प्रसादाचा लाभ घेऊन आम्ही आमच्या भक्त निवासातील खोलीवर परतलो. सगळ्यांनी पत्ते खेळायची टूम काढली. मी मात्र, ‘आलो जरा पाय मोकळे करून,’ असं म्हणून पुन्हा खाली आलो. पुन्हा तोच प्रकार घडला होता - मनात नसतानाही शब्द बाहेर आले होते. आता खाली आलोच आहोत तर निदान गडाच्या दरवाजा पर्यंत तरी जाऊन येऊ असा विचार करून मी निघालो.

“प्रसाद,” मागून एक अनोळखी हाक आली.
मी भांबावून मागे बघितले. साधारण पस्तीशीतले, भगवी वस्त्रे परिधान केलेले एक स्वामी मला हाताने थांबायची खूण करत माझ्यापाशी पोचले.
“तुम्हाला थोडा वेळ असेल तर नानाजींनी तुम्हाला भेटायला बोलावलंय.” स्वामी म्हणाले.
“नानाजी? कोण नानाजी? आणि तुम्हाला माझं नाव कसं काय कळालं?” मी अडखळत बोललो.
“तुम्हाला बघून मला नाना म्हणाले, तो बघ तो बावळट प्रसाद कसा हिंडतोय ते. जा त्याला बोलावून घेऊन ये.” स्वामींनी उत्तर दिले.

आता मात्र मला खरंच आश्चर्य वाटायला लागले. आपल्याला नावाने ओळखणारे सज्जनगडावर आहे तरी कोण, हे बघायला मी त्या स्वामीजींबरोबर निघालो.
“माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला सज्जनगडावर नावने ओळखणारे हे नाना कोण बुवा?” मी स्वामीजींना प्रश्न केला.
“त्यांनाच का विचारत नाही हे तुम्ही?” स्वामीजी मिस्किलपणे म्हणाले.
मग मात्र मी शांतपणे चालयला लागलो.
एका दुकानाच्या ओसरीवर पांढराशुभ्र सैलसर कुर्ता-पायजमा घालून एक साठीचे गृहस्थ बसले होते. का कोणास ठाऊक. पण त्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे, हे मला राहून-राहून जाणवत होतं.
“नारायणा, तू गेलास तरी चालेल हो.” नाना म्हणाले. मी अवघडून तसाच उभा होतो.
“काय प्रसादा, झाला का सगळ्यांना प्रसाद वाटून? दमला नाहीस ना?” नानांनी मिस्किलपणे हसत विचारले.
“प्रसाद? मी नाही वाटला कोणाला प्रसाद,” मी उत्तरलो.
“अरेच्या, बाजारात शामरावांना हाक मार, पाचव्या मजल्यापर्यंत धावत जा, कुत्र्याच्या पिल्लाला वाचव हे सगळे प्रसाद वाटणेच की लेका.” नाना उद्गरले.
मी त्यांच्याकडे पाहातच बसलो. मला काही सुचेचना. कोण आहे हा माणूस? याला सगळं कसं कळालं? हा खरंच इथे राहतो का हा माझ्या पाळतीवर वगैरे आहे? हा नक्की माणूसंच आहे ना? एकाच वेळी असे अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले.

“माणूसच आहे रे बाबा, अगदी तुझ्यासारखाच. हाडा-मासाचा.” नाना डोळे मिचकावत म्हणाले.
मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातच राहिलो.
“चल जरा माझ्या खोलीत बसू.” नाना म्हणाले. एखाद्या आज्ञाधारक शिष्याप्रमाणे मी त्यांच्यामागे निघालो.
तिथे असलेल्या समाधीला फेरा घालून, मागच्या बाजूला असलेल्या बैठ्या खोल्यांकडे नाना मला घेऊन गेले. नानांची खोली चांगलीच प्रशस्त होती. विशेषत: तिची उंची नजरेत भरत होती.
“बसा स्वामी.” नाना गमतीने म्हणाले.
मी काहीसा लाजतच नानांच्या बाजूला बसलो. समोर देव्हाऱ्यात राम,लक्ष्मण आणि सिता यांच्या मूर्ती होत्या. पायापाशी मारूतीराय बसले होते. बाजूलाच पद्मासन लावून बसलेली रामदास स्वामींची प्रसन्न मूर्ती होती आणि सगळ्यात मागे दत्त दिगंबर शांत चित्ताने उभे होते. त्या दर्शनानेच चित्तवृती प्रफुल्लीत होऊन गेल्या.

किंचित हास्य करून नानांनी माझ्याकडे बघितले आणि समईतला दिवा थोडासा मोठा करत रामरायाला हात जोडले… “रामराया घेऊन आलो रे तुझ्या लेकराला, आता तूच ताकद दे त्याला.” नाना म्हणाले.
मला तर काहीच उमगत नव्हते.
“प्रसाद, तुला गेले काही दिवस बरेच विचित्र अनुभव येताहेत ना?” नानांनी प्रेमळपणे विचारले.
“होय नाना, मला खरच काही कळत नाहीये. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे.” मी म्हणालो.
“खरं आहे. भांडं पूर्ण भरलं की दूध थोडं हिंदकळणारच. मी जरा आधीच सावध व्हायला पाहिजे होतो,” नाना काहीशा खेदाने म्हणाले.
“तुम्ही काय म्हणताय मला काहीच कळत नाहीये नाना,” मी म्हणालो.
“प्रसाद, नवनाथांचा अवतार का झाला माहितीये तुला?” नानांची विचारले.
“हो. कलीला रोखण्यासाठी.” मी सांगितलं.
“अगदी बरोबर. काळ्या शक्तीच्या प्रत्येक अनुयायाला, त्या शक्तीच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भगवंताकडून कोणाची ना कोणाची नेमणूक झालेली आहे प्रसाद. सागर जिथे परशूरामांना वंदन करून मागे हटलाय त्या पृथ्वीबिंदूचा, त्या अपरांत भूमीचा तू रक्षक आहेस प्रसाद. तू अपरांतक्ष आहेस प्रसाद. तुझ्या परवानगीशिवाय त्या बिंदूवरून कोणालाही आत प्रवेश नाहीये. त्या बिंदूशी संबंधित स्थळ, काळ, अवकाश यांचा रक्षणकर्ता म्हणून तूझी नेमणूक आहे अपरांतक्षा, जागा हो. आठव स्वत:ला,” एवढं बोलता-बोलता नानांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.

त्या क्षणी मी माझा असा उरलोच नाही. त्या अनुभूतीचे वर्णन तरी कसे करावे? क्षणार्धात अनेक फुलांचा सुवास माझे मन, मेंदू भरून गेला. मी जणू काही एखाद्या समुद्रात लाकडी ओंडक्यासारखा तरंगतोय, असा भास झाला. काही क्षणंच हे सुख टिकले आणि मग…मग मी कुठेतरी खोल-खोल काळगर्तेत खेचला जायला लागलो. अनेक जुन्या गोष्टी, घटना डोळ्यांसमोरून जायला लागल्या. काय काय नव्हतं त्यात? रूढी, परंपरा, वेगवेगळ्या पिढ्यांचे मानव, प्राणी, राक्षस, भूत-पिशाच्च, त्यांच्या रूढी, संकल्पना, अस्तित्वासाठीच्या लढाया, ते जागवले गेलेले दुष्टात्मे, त्यांच्या बरोबर अनेकदा घडलेले संघर्ष…सगळं माझ्या डोळ्यांसमोरून पुढे सरकत होतं आिण अचानक… हो तो प्रसंग तोच होता, तोच होता अगदी. कोकणात घडलेला. माझ्या आणि जयराजच्या आयुष्यात वादळ घेऊन आलेला.
त्याचा इथे काय संबंध? तो का दिसावा? हे काय गूढ आहे?
“जागा हो. जागा हो, प्रसाद” नाना हाक मारत होते. मी सावकाश डोळे उघडले, मैलोन् मैल प्रवास केल्यासारखे शरीर आणि मन थकले होते.
नानांनी समोर केलेला दुधाचा प्याला मी आधाशा सारखा संपवून टाकला.
“खूप ताण आलाय ना मनावर? मी समजू शकतो. पण हे होणे गरजेचे होते. तुझ्या जाणीवा, सुप्त शक्ती जागृत होणे गरजेचे होते अपरांतक्षा,” नाना धीरगंभीरपणे म्हणाले.
“पण नाना मला या कालक्रमणेत कोकणातला प्रसंग दिसायचे कारण काय?” मी मनात खदखदत असलेला प्रश्न विचारून मोकळा झालो.
“तुझ्या अजून लक्षात येत नाहीये? ‘तो’ परत आलाय. तुझ्या आज्ञेशिवाय त्याने आत प्रवेश करायचा प्रयत्न केला होता; पण तो अयशस्वी ठरला. त्यवेळी त्याला रोखणारा तूच होतास आणि आता ‘तो’ पुन्हा रेषा ओलांडयाला सज्ज झालाय अपरांतक्षा. आणि ते ही पूर्ण ताकदीनीशी. तुझ्या शक्तीला, अधिकाराला हे आव्हान आहे. जा त्याचा बंदोबस्त कर. त्याला शासन करायचा अधिकार फक्त तुला आणि तुलाच आहे अपरांतक्षा. पण या संघर्षात तुला पूर्ण ताकदीने उतरावे लागणार होते त्यासाठी रघूरायाच्या आदेशाने मी तुझ्या जाणीवा परत मिळवून दिल्या आहेत.” नाना आत्मीयतेने सांगत होते.
“कधी नाना? कधी होणार संघर्ष? आणि कोणत्या पातळीवर? माझ्या शक्ती जागृत झाल्या आहेत, म्हणजे काय झालं आहे? मी काय करायचे आहे मी नाना?” मी प्रश्नांचा भडीमार केला.
“लवकरच ती वेळ येणार आहे. खूप कमी वेळ उरलाय आपल्याकडे. आणि जो उरलाय त्यात जमेल तेवढी साधना तुला उरकून घ्यायची आहे प्रसाद. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे तुला योग्य वेळी मिळत जातीलच. त्यांची चिंता करण्यात वेळ घालवू नकोस. आणी मुख्य म्हणजे भिऊ नकोस. ‘आम्ही’ सदैव तुझ्या बरोबर आहोतच,” नाना हे सांगत असताना एका वेगळ्याच तेजाने त्यांचा चेहरा तळपत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नानांची भेट घ्यायचे आश्वासन देऊन मी नानांच्या खोलीबाहेर पडलो. जे काही घडून गेलं होतं त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. खरं तर मला अजून कशाचे पूर्ण आकलनच झाले नव्हते.
‘आई गं, एवढं चालत जायचं आता? देवांचे वगैरे बरे होते राव. हे असे डोळे बंद करून ‘आमच्या खोली समोर’ असं म्हणाले असते तर डोळे उघडले की आमच्या खोली बाहेर उभे दिसले असते.’ मी मनात म्हणालो आणि मघाशी गमतीने मिटलेले डोळे उघडले आणि… फक्त चक्कर येऊन पडायचा बाकी राहिलो. मी आमच्या खोली बाहेर उभा होतो!

माझ्यातल्या न जागलेल्या बऱ्याचशा शक्ती आता हळू-हळू जागृत होत आहेत, याची जाणीव मला त्या क्षणी झाली.

सकाळी लवकर उरकून नानांच्या भेटीला धावलो. मी पोचलो तेंव्हा नानांची पूजा सुरू होती. रामरक्षा म्हणता म्हणता मला एका हाताने बसायची खूण करत नाना पुन्हा पूजेत मग्न झाले. नानांच्या बरोबरीने नकळत मीही खड्या आवाजात रामरक्षा म्हणत त्यांना साथ द्यायला सुरवात केली. काही वेळाने मला जणू काही ती खोलीच त्या आवजाने भरून गेली आहे, असे वाटायला लागले. रामरक्षा म्हणणारे फक्त आपल्या दोघांचेच आवाज नाहीयेत; खूप जणांचे आवजही त्यात सामील आहेत, असे राहून राहून वाटत होते. या खोलीत आपल्या शिवाय अजून कोणीतरी आहे, अशी एक विचित्र भावना मनात दाटून येत होती.

“करायची सुरवात?” नानांनी माझ्याकडे बघून विचारले.

काय? कसली? अशा कसल्याही चौकशा न करता मी आज्ञाधारकपणे मान हलवली आणि माझ्या खडतर साधनेचा काळ सुरू झाला.

“अपरांतक्षा, या आधीसुद्धा आपण बऱ्याचदा विनाशक शक्तींशी मुकाबला केला आहे. कधी तुझ्या नेतृत्वाखाली, तर कधी अन्य कोणाच्या. या प्रत्येक संघर्षाची, त्यात वापरल्या गेलेल्या साधनांची, विरूद्ध शक्तीच्या ताकदीची आणि मुख्य म्हणजे आपले मित्र कोण आणि शत्रू कोण, याची जाणीव तुला पुन्हा प्राप्त होणे, हे सर्वांत महत्वाचे आहे.

“होय गुरूदेव,” मी म्हणालो. माझ्या संबोधनात पडलेला फरक बघून नाना अस्पष्टसे हसले.

“अपरांतक्षा, मला तुझे सहकार्य अपेक्षित आहे. मी आता तुझ्या जुन्या जाणीवा अजून स्पष्ट, अजून ठळक करण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रवासात तुला वेगवेगळे अनुभव येतील. वेगवेगळी दृष्ये दिसतील; पण तू फक्त एक मूकदर्शक आहेस, हे लक्षात ठेव. तू फक्त भूतकाळ पाहणार आहेस. त्यात हस्तक्षेप करायचा तुला अधिकार नाही.” नाना काहीशा करारी स्वरात म्हणाले.

मी आज्ञाधारकपणे मान डोलावली. नानांनी रामनामाचा गजर करत माझ्या डोक्यावर आपला हात टेकवला. काही क्षणातच मी समाधी अवस्थेत पोचलो, माझ्या डोळ्यासमोरून अनेक घटना, कालचक्रे धावायला लागली.

सर्वांत आधी मला दिसलं एक नयनरम्य पर्वतशिखर आणि तेथेच एका वृक्षाखाली मी बसलो होतो. माझ्या भोवताली पसरलेला अगम्य, गूढ प्रकाश आणि त्याच वेळी मनात उमटलेला तो दिव्य आवाज “भद्रशूला, ते येत आहेत. अमोघ शक्ती, अमोघ ज्ञानभांडार तुझ्यावर रीक्त करायला ते येत आहेत.” त्यानंतर भगव्या वेषात दमदार पावले टाकत येणारे नाना मला दिसले.

“गुरूदेव,” मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले. अत्यंत प्रेमाने मला आपल्या छातीशी लावून धरत गुरूदेवांनी मला बसते केले.

“तुझी परीक्षा पूर्ण झाली भद्रा. या अमोघ ज्ञानभांडारासाठी तू आता मानसिक आणि शारीरिकरीत्या उत्तम प्रकारे तयार झाला आहेस,” गुरूदेव म्हणाले.

त्यानंतरचा तो साधनेचा आणि शक्तीग्रहणाचा खडतर प्रवास, गुरूदेवांनी पुनःपुन्हा मला म्हणायला लावून, घोकून घेऊन मला दिलेले ते अमोघ मंत्र, विविध शक्ती, त्यांची पूजा, त्या शक्तींचा वापर, त्यांचे संवर्धन, या सर्वांसाठी घेतलेले अविरत कष्ट… सगळं सगळं काही माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चलचित्रासारखं दिसत होतं.

अशाप्रकारे अनेक खडतर दिवसांनतर एक दिवस गुरूदेवांनी मला जवळ बसवून घेतले आणि म्हणाले, “भद्रा, तू आता माझ्या एवढाच ज्ञानी आणि शक्तीशाली झाला आहेस. परिपूर्ण मी म्हणणार नाही; कारण त्यासाठी अजून बराच अवधी आहे. माझे कार्य आता संपले. मी आता पूर्वेकडे कूच करीन. भद्रा, भगवंताच्या इच्छेनुसार तू आता सागर किनारी प्रस्थान करावेस.”

आणि मग काही काळासाठी तो एकाकी समुद्रकिनाराच माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनून गेला. मी आणि माझी साधना, माझी तपश्चर्या बस्स! परंतू, कालचक्रात बदल हे घडतच असतात. हळू-हळू माझ्या किनाऱ्यावर कोळ्यांची वस्ती वाढली. मग छोटासा बाजार उभा राहिला. मग त्यांच्या शक्तींची मंदीरे आली. हळू-हळू एक वस्तीच उभी राहिली. मी मात्र या सर्वापासून निर्विकार होतो. माझा त्यांना व त्यांना माझा कधीच त्रास झाला नाही. उलट मदतच व्हायची!

आणि एक दिवस अचानक काहीतरी चुकले. समुद्राने नुसते थैमान मांडले, चारी दिशा काळोखून आल्या आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला अतिशय अस्वस्थ, अभद्र जाणीवा व्हायला लागल्या. वाईट शक्तीच्या वावराच्या खूणा जाणवायला लागल्या. त्या रात्री मला माझी कामगिरी बहाल करण्यात आली. त्या अगाध शक्तीकडून, भगवंताकडून मला आदेश प्राप्त झाला होता, “भद्रा, या क्षणापासून मी सृष्टीपालक, या पृथ्वीबिंदूचा रक्षक म्हणून तूला अधिकार प्रदान करतोय. यापुढे या कक्षेतून तुझ्या आज्ञेशिवाय देव, दानव, मर्त्य, जलचर, उभयचर कोणत्याही शक्तीला प्रवेश नाही. यापुढे या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सर्वशक्तीनिशी दंडीत करण्याचे पूर्ण अधिकार मी तुला प्रदान करतोय भद्रा. यापुढे या अपरांत भूमीचा एकमेव रक्षक तू आहेस. तू अपरांतक्ष आहेस. यशस्वी भव.”

काहीतरी गूढ, अगम्य, अमानवी या जगात प्रवेश करायचा प्रयन्त करत होते आणि त्याच्यापुढे खंबीर आव्हान म्हणून मला उभे राहायचे होते. इतक्या वर्षांची साधना, ज्ञानप्राप्ती या संघर्षासाठीच होती.

त्यानंतर घडलेला तो संघर्ष…कधी मानसिक तर कधी शारीरिक पातळीवर लढल्या गेलेल्या लढाया, ती मानसिक आंदोलने, त्रिमितिच्या कक्षा भेदून झालेला पाठलाग आणि शेवटी मला मिळालेले यश. सगळं-सगळं मला अगदी लख्ख दिसत होतं. त्यानंतर कित्येकदा कालचक्र फिरले , कित्येकदा त्या बिंदूवरून अभद्राने प्रवेशाचा प्रयत्न केला आणि प्रत्येकदा मी त्याला रोखत राहिलो. आज त्या जाणीवा पुन्हा जागृत झाल्या. मला स्वत:ची ओळख पटली.

मी शांतपणे डोळे उघडून नानांकडे पाहिले. आधी देवासमोर आणि मग नानांना साष्टांग दंडवत घातले.

“मी जागृत झालोय गुरूदेव. माझ्या जाणीवा, जेणीवा, माझे ज्ञान, माझ्या सर्व शक्तींसह मी तयार आहे संघर्षासाठी.” मी वदलो.

“अपेक्षेपेक्षा फार लवकर जागृत झालास अपरांतक्षा. मोठं सामाधान वाटलं. आता तू तूझ्या नेहमीच्या आयुष्याकडे वळ. योग्य वेळ येताच तुला आपोआप त्याची जाणीव होईल,” नाना स्मितहास्य करत म्हणाले.

त्यानंतरचे काही दिवस हे अतिशय समाधानाचे व असीम शांततेचे होते. माझ्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा मृदूपणा आला होता. हा कालखंड कधी संपूच नये, असे वाटत होते; पण मनाचा एक कोपरा मात्र कायम सावध होता. माझ्या रोजच्या साधना, प्रार्थना मी बिनबोभाटपणे पूर्ण करत होतो. माझ्या इतक्या दिवसांच्या सुप्त पडून राहिलेल्या शक्ती आता जागृत झाल्या होत्या. त्यांना साधनेची धार चढवून पुन्हा लखलखीत करणे फार आवश्यक होते.

सतत त्या येणाऱ्या संघर्षाच्या विचारत मेंदू गर्क असायचा. गुरूदेवांनी सांगितलेली वेळ कधी येणार, याची मलाही उत्कंठा लागलेली होती. आणि ध्यानी, मनी नसतानाच नानांचे नाव घेत अचानक आज हे कारखानीस माझ्यापर्यंत पोचले होते.

“मी शरद कारखानीस, जयराज माझा जावई,” कारखानीसांनी स्वत:ची ओळख करून दिली.

“मी प्रसाद. जयराजचा मित्र. पण तुम्ही नानांच्या ओळखीने आलात ना?” मी विचारले.

“हो. म्हणजे त्याचे काय आहे, नाना मला गुरुंच्या जागी. अनेक कौटुंबिक अडचणीच्या वेळी मी त्यांचाच सल्ला घेतो. पण यावेळी मात्र त्यांनी मला तुमच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.” कारखानीसांनी स्पष्टीकरण दिले.

“मला पूर्ण माहिती द्याल का?” मी विचारले.

कारखानीसांनी रूमाल कढून स्वत:चा चेहरा पुसला. ते कुठल्यातरी घटनेमुळे खूपच अस्वस्थ झालेले, घाबरलेले दिसत होते. मी शांतपणे रामरायाचे नाव घेत त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांना दिलासा दिला.

“शरदराव, या जगात अनेक गूढ, अगम्य गोष्टी घडत असतात. बऱ्याचशा घटनांचे मानवीय पातळीवर स्पष्टीकरण सुद्धा करणे शक्य नसते. माझा तुमच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे. बोला तुम्ही.” मी त्यांना आधार दिला.

माझा हात तसाच हातात दाबून ठेवत कारखानीसांनी सांगायला सुरवात केली.

“जयराजच्या वागण्या बोलण्यात आजकाल फार फरक पडलाय हो. मध्ये सहा महिन्यांसाठी त्याची गुजरातला बदली झाली होती. त्यामुळे माझी मूलगी आणि नातवंडे माझ्याकडेच राहात होती. मागच्या आठवड्यात जयराज अचानक रात्री परत आला तो मद्याच्या अंमलाखाली चूर होऊनच. तो जास्त काही बोलायला उत्सुक नसतो. बाल्कनीत खुर्ची टाकून एकटक कुठेतरी बघत बसलेला असतो. खाण्यापिण्याचीदेखील शुद्ध नसते त्याला हल्ली. मध्येच एकदम उठतो आणि बायको, पोरांना मारहाण सुरू करतो. सारखा कोकणात जायचा हट्ट धरून बसतो. का कळत नाही, पण मला कायम त्याच्या आजुबाजूला काहीतरी वावरत असल्याचे जाणवते. तो एकटा नाहीये, असं राहून राहून वाटतं. आणि परवा…परवा तर…”

कारखानीसांनी पुन्हा एकदा रूमाल काढून आपला घाम टिपला.

“परवा रात्री मला कसली तरी चाहूल लागली म्हणून मी उठून हॉल मध्ये आलो. जयराजच्या रूममध्ये डोकावलो तर आत जयराज नव्हताच; पण त्याच्या बेडवर जे काही होतं… विश्वास ठेवा ते खरच काहीतरी अभद्र होतं. एखाद्या मोठ्या सरड्याच्या किंवा मगरीच्या आकाराचे असे काहीतरी तिथे रांगत होते.” मी कसातरी मनावर ताबा ठेवून माझ्या रूमकडे पळालो. सकाळी दिशा उजाडल्या-उजाडल्या मी आधी नानांना फोन लावला.

“काय म्हणाले ते?” इतक्या वेळ पूर्ण घटनेचा आढावा घेणारा मी म्हणालो.
“ते म्हणाले, ती वेळ आली तर! कारखानीस, मी देतोय त्या पत्त्यावर ताबडतोब संपर्क साधा.” कारखानीसांनी उत्तर दिले.
“मला तुमचा पत्ता देऊन ठेवा कारखानीस. मी रात्री तुम्हाला भेटायला येतो.” मी म्हणालो.
संघर्षाच्या नुसत्या कल्पनेनेच मला स्फुरण चढले होते. त्या रात्री मला तसा थोडासा उशीरच झाला. साधारण दहा वाजता मी कारखानीसांच्या घराची बेल दाबली…
कारखानीसांनी दरवाजा उघडला. समर्थांचे नामस्मरण करून मी आत शिरलो. आत शिरल्या-शिरल्याच आपण एखाद्या वेगळ्या जगात प्रवेश केला आहे, हे जाणवले. छातीवर कसलेतरी ओझे वाटायला लागले. थोडेसे गुदमरल्यासारखेही वाटत होते. एक विचित्र वास हॉल मध्ये पसरला आणि त्याच क्षणी जयराजने हॉल मध्ये प्रवेश केला.

माझी त्याची नजरानजर होताच तो क्षणभर चरकला; पण लगेचच या वेळेची जणू तो वाटच बघत असल्या सारखा निर्लज्ज हसला. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत रोखून पाहू लागलो. जयराजच्या आत जे काही होतं त्याची ओळख पटवण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्याचीसुद्धा बहुतेक तीच धडपड सुरू असावी. एका सावध क्षणी मला त्याची ओळख पटली. माझा शत्रू मी ओळखला. तो कालसर्प होता…तोच तो खांडव वनात मारला गेलेला आणि पुन्हा या सृष्टीत प्रवेशासाठी आतूर झालेला!

कालसर्प हा खरं तर नागवंशी. इच्छाधारी सर्प आणि असूर कन्या यांच्या मिलनातून जन्माला आलेला एक घातकी जीव. आईकडून असुरी शक्ती आणी बापाकडून हवे तेव्हा सर्पात रूपांतर व्हायची शक्ती प्राप्त झालेला कालसर्प म्हणजे दुष्ट शक्तींचा एकत्र झालेला समूहच होता.

जस जसा तो मोठा होऊ लागला तशा त्याच्या विध्वंसक कारवायाही वाढू लागल्या. अशा माणसाची योग्य ती किंमत ओळखून जरासंधानी त्याला आपल्या गोटात सामील करून घेतला. मथुरेवर स्वारीच्या वेळी या कालसर्पाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायची त्याची इच्छा होती.

पण घडले भलतेच. बलरामाकडून दारूण पराभव पत्करून कालसर्पाने पलायन केले. जखमी झालेल्या कालसर्पाने एका गुहेत आश्रय घेतला. त्यानंतर मांस, मद्य आणि मैथुनाच्या आहारी गेलेल्या कालसर्पाने या गोष्टींसाठी आजूबाजूच्या लोकांना त्रास देण्यास सुरवात केली. त्याचा उन्मत्तपणा एवढा वाढला की, वनातून प्रवास करणाऱ्या जमदग्नी ऋषींना अडवून त्यांच्यावर शस्त्र उगारण्यासही त्याने कमी केले नाही. संतापलेल्या जमदग्नींनी तू कायमचा अंध होऊन सर्प रूपातच खांडववनात जाऊन पडशील, असा त्याला शाप दिला. जमदग्नींच्या शापाने ग्रस्त कालसर्प खांडव वनात जाऊन पडला. तिथे त्याने कलीची आराधना सुरू केली. अमरत्व आणि जीवनभर आकंठ मद्य, मास, मैथुनाचा उपभोग, हेच त्याचे ध्येय उरले.

अर्जुनाने खांडव वनाचे दहन केल्यावर कालसर्प आपले शरीर मरताना कलीला अर्पून गेला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन कलीने त्याला त्याच्या मालकीच्या युगात अनेक वरदान व युगाच्या अंतापर्यंत चिरतारूण्य बहाल केले. पण त्याच्या दुर्दैवाने पृथ्वीबिंदूच्या कुठल्याच सीमेवरून त्याला आत प्रवेश मिळत नव्हता. कित्येकदा त्याने आपल्या असुरी , घातकी शक्तीचा वापर करून आत प्रवेशाचा प्रयत्न केला अथवा प्रवेश केला; पण प्रत्येकवेळी दंडीत होऊन तो कक्षेबाहेर फेकला गेला होता. शेवटी त्याच्या सारख्या दुरात्म्यांना या जगात प्रवेश करण्यापासून रोखणे आणि कलीला अजून ताकद वाढवण्यापासून थांबवणे, हेच तर आमचे जीवितकार्य होते.

“बरे झाले आलास. मी उद्या कोकणात जावे म्हणतोय. येतोस बरोबर?” जयराजने मला अचानक प्रश्न केला.
“मी आज रात्री कोल्हापूरला निघणार आहे. उद्या संध्याकाळी मी तुला तिथेच गाठतो. खूप महिन्यांच्या गप्पा राहिल्यात, ” मी हसत हसत म्हणालो.
जयराजच्या डोळ्यात क्षणभर खूनशी भाव चमकले आणि नाहीसे झाले. माझ्या या उत्तराने आश्चर्यचकित झालेले कारखानीस मला सोडायला खालपर्यंत आले.
“तुम्ही दोघे खरच तिथे भेटणार आहात? या सगळ्यात जयराजच्या जीवाला तर काही धोका नाही ना?” कारखानीसांनी काळजीने विचारले.
“बिलकूल चिंता करू नका. तुमच्या जयराजला पूर्णपणे बरा करून लवकरच तुमच्या ताब्यात देतो.” मी त्यांना आश्वासित करत म्हणालो.

आता मला लवकरात लवकर कोकण गाठून कालसर्पाच्या प्रवेशाचे दार शोधणे आवश्यक होते. ते दार बंद करून इतर घातक शक्तींना आत येण्यापासून रोखणे महत्वाचे होते. मी तातडीने कोकणाकडे प्रयाण केले. पहाटे पहाटे मी जयराजच्या आत्याच्या वाडीत शिरलो. इथंच कुठेतरी तो प्रवेशबिंदू असणार होता. मी नामस्मरण करत अलख जागवला आणि तिथल्याच एका खडकावर समाधी लावली.

काही वेळातच मला तो प्रवेशबिंदू सापडला. प्रभू रामचंद्रांचा जयजयकार करत मी संरक्षक सूत्राने तो मार्ग बंदिस्त केला. एक काम तर झाले होते. खऱ्या कामाला मात्र आता रात्रीच सुरवात होणार, हे निश्चित होते. सूर्यवंदना करून मी आधी समुद्रात यथेच्छ डुंबून घेतले. पोटातल्या कावळ्यांनी पुन्हा एकदा मला मर्त्य जीवनात ओढून आणले.

पोटपूजा करून आधी एक मंदीर शोधून काढले. प्रभू कृपेने ते श्रीरामचंद्रांचेच मंदीर निघाले. आत भगवान परशूरामांचीही एक सुंदर मूर्ती प्रतिष्ठीत होती. पूजाऱ्याची परवानगी घेऊन मी मंदीरातच ध्यान लावले.

अधिकाराचा वापर करण्याआधी जगनियंत्रकाची परवानगी घेणे मला महत्वाचे वाटत होते. माझा रामनामाचा घोष इच्छीत स्थळी पोचला असावा.
“अपरांतक्षा, तुझ्या हाकेमागचे कारण मी जाणून आहे. वत्सा, ज्या कार्यासाठी तुला नेमले आहे, ते तू पूर्ण करशील याबद्दल शंकाच नाही. जा, तुझ्या आज्ञेशिवाय या पृथ्वीकक्षेत प्रवेश करणाऱ्या उद्दाम कालसर्पास ठेचून काढ. यशस्वी भव!”
“प्रभू, अनेकदा वेगवेगळ्या मितित भिरकाटून दिलेला हा कालसर्प पुनःपुन्हा प्रयत्न करून त्या मितितून सूटका करून घेत पृथ्वी प्रवेशाचे प्रयत्न करतच असतो. हे कुठवर चालणार प्रभू?”
“अपरांतक्षा, अरे मिळालेले ज्ञान विसरलास? शक्तीचा नाश संभव नाही. तसा प्रयत्नही करू नकोस. निसर्गनियमाविरूद्ध जाण्याचा अधिकार कोणालाच नाही. अगदी मलाही नाही. जा तुझे नेमून दिलेले कार्य निःसंकोचपणे पूर्ण कर. यशस्वी भव!”

आज कित्येक वर्षांनंतर मी हा पवित्र आवाज ऐकला होता. माझ्या चित्तवृती एकदम प्रफुल्लीत झाल्या होत्या. मंदीरातही एक प्रकारचा पवित्र गंध पसरून राहिला होता.
“जय श्रीराम” मी नामघोष केला. यावेळी पुन्हा एकदा मला माझ्या बरोबरीने अनेक आवाज हा घोष करीत असल्याचा अनुभव आला. कानात खडावांचा ध्वनी उमटला आणि मी अत्यंत आदराने हात जोडत डोळे उघडले.
सूर्यदेव अस्ताला निघालेच होते. मी समुद्राकडे म्हणजेच त्या प्रवेश बिंदूकडे प्रयाण केले. तो इथेच भेटणार होता…कालसर्प. त्याने इथून प्रवेश तर मिळवला होता; पण ह्या बिंदूच्या विशिष्ट परिघाबाहेर त्याच्या शक्ती क्षीण होत्या. त्याला संघर्षासाठी इथेच यावे लागणार होते हे मी जाणून होतो. त्याचवेळी अचानक…
अचानक समोरून कोणीतरी येताना दिसले. चंद्राच्या प्रकाशात ती व्यक्ती दूरून तरी ओळखीची वाटत होती. ते नाना होते, होय नक्कीच. नाना इथे? यावेळी? मी हा विचार करत असतानाच मी अचानक फेकलो गेलो आणि लांब वाळूत जाऊन पडलो.

“पृथ्वीच्या रक्षकांचा प्रमुख अपरांतक्ष असा माती खात का पडलाय?” नाना म्हणाले.
मी हसत हसत कपडे झटकत उभा राहिलो.
“अरे, किती बालिश चाळे करशील रे कालसर्पा मी फसेन, घाबरेन वगैरे गैरसमज तर करून घेतला नाहियेस ना तू?” मी प्रत्युत्तर देत म्हणालो.
थोड्याशा सावध मुद्रेत असलेला नानांच्या रूपातील कालसर्प आता मूळ रूपात प्रकट झाला.
“ओह! ओळखलेस तर मला. हरकत नाही. मरण्याआधी कोणाकडून मरणार आहे, हे तर तुला कळालं.” कालसर्प दहाडला.
“कालसर्पा, अजूनही वेळ गेली नाहीये. त्या सर्व शक्तीमान जगनियंत्याला शरण ये. मी तुला शेवटची संधी देत आहे.”
“मूर्ख द्वारपाला, या युगाचा स्वामी माझा मालक ‘कली’ आहे. प्रचंड शक्तीचा स्वामी! तुझ्या या वल्गना बंद कर आणि तूच माझ्या स्वामी कलीला शरण ये. सुखात लोळशील.” कलसर्प उदगारला.

दुसऱ्याच क्षणी मी प्रभूचे नाव घेत कालसर्पावर प्रहार केला. वादविवादाचा आता उपयोग न्हवता. शासन हाच आता अंतिम उपाय होता.
“बंद कर या पुरातन शक्तीचे प्रदर्शन. असल्या वारांना पुरून उरेन मी आता.” कालसर्पाने दर्पोक्ती केली.
आणि अचानक माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. कालसर्प मला एका वेगळ्याच मितीत ओढू पाहात होता, ज्याचे संपूर्ण स्वामित्व त्याच्याकडे होते. तिथला अणू-रेणू त्याच्या हुकूमाखाली होता. हे टाळायला हवे होते. त्या मितीत कालसर्प मला निश्चितच जड गेला असता. रामनामाचा जप करत मी बंधनपाश फेकून कालसर्पाला माझ्यासह पुन्हा एकदा माझ्या कक्षेत ओढून घेतलं. संतापलेल्या कालसर्पाने आता मात्र निर्णायक घावाची तयरी केली असावी. काही क्षण डोळे मिटून तो काही मंत्राक्षरे पुटपुटला. दुसऱ्या क्षणी आजुबाजूला काळ्या ढगांची गर्दी दाटली. काही क्षणांतच कालसर्पाच्या हातात ‘कालदंड’ प्रकट झाला.

आता मात्र मी हतबद्ध झालो. कालसर्पाने हा अघोरी दंड कसा आणि कधी प्राप्त केला, हेच मला कळेना. यमधर्माकडून कठोर तपश्चर्या करून कलीने हा प्राप्त केला होता आणि आता तो त्याच्या निष्ठावंताच्या हातात होता.
कालदंडाचा पहिलाच प्रहार माझे सुरक्षा कवच भेदून गेला. मी पूर्णपणे असुरक्षित झालो. जीवनाची अखेर मला समोर दिसू लागली. समोर दिसणाऱ्या मृत्यूपेक्षाही आपण आपले कार्य पूर्ण करू शकलो नाही, याचेच जास्त वाईट वाटत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून मी कठोर साधनेच्या वेळी प्रभू रामचंद्राकडून मिळालेली ‘तेजस्वीनी शक्ती’ जागृत करायचा प्रयत्न करू लागलो. आणि त्याचवेळी माझ्यावर कालदंडाचा दुसरा आघात झाला.

हा आघात माझी मंत्रशक्ती अर्ध्याने कमी करून गेला. आता तर मी एवढा दुर्बळ झालो, की मला शक्तीचे जागरण करणेही अशक्य झाले.
“रामराया, धाव रे प्रभू…, ” मी मनातल्या मनात आकांत केला. त्याचवेळी तिसऱ्या आणि अंतिम वारासाठी कालदंड माझ्यावर झेपावला.
“जय श्रीराम,” मी शेवटचे नाम:स्मरण केले. यावेळी मला पुन्हा एकदा तोच अनुभव आला. माझ्या बरोबरीने अनेक आवाज आसमंतात घुमले. मात्र यावेळची जाणीव अधिक ठळक होती. आणि आश्चर्य म्हणजे माझ्यावर झेपावलेला कालदंड एखाद्या संरक्षक कवचाला धडकल्यासारखा परत गेला होता. मी मान वळवून मागे बघितले आणि आश्चर्याने पाहातच राहिलो. मागे ‘ते’ उभे होते…

होय ‘ते सर्व’ आले होते. माझ्या रक्षणासाठी. या धरतीच्या रक्षणसाठी. माझे सखे सोबती. या पृथ्वीच्या प्रत्येक छेदन बिंदूचे रक्षक. त्यात एक नानाही होते.
“वाट कसली पाहतोयेस अपरांतक्षा? दंडीत कर या उद्दाम कालसर्पास. यावेळी त्याला अशी शिक्षा दे की तो पुन्हा असे धाडस करणार नाही.” नाना गरजले.
या पवित्र आत्म्यांच्या नुसत्या उपस्थितीनेच माझे बळ चौपट वाढले होते. मी ‘तेजस्वीनी शक्तीचे’ आवाहन केले. काही क्षणातच अत्यंत तेजस्वी असे ते शस्त्र माझ्या हातात प्रकट झाले.
“हे अघोरी कालसर्पा, माझ्या परवानगीशिवाय या छेदन बिंदूतून अघोरी कृत्ये करण्याच्या इराद्याने आता शिरल्याबद्दल मी या बिंदूचा रक्षक अपरांतक्ष तुला दंडीत करत आहे. मी तुला एकाचवेळी सात मितीत कैद करून तुला काळाच्या मागील स्तरात बंदीवान करत आहे.” एवढं उद्गारून मी ते पवित्र अस्त्र कालसर्पावर सोडलं. काही क्षण सगळीकडे एक लखलखाट झाला. ते शस्त्र आणि दंडीत कालयवन दोघेही नाहीसे झाले.

प्रभूच्या अस्त्राने आपले कार्य चोख बजावले होते.

(समाप्त)

(या कथेत मी दिलेले जरासंध, जमदग्नी, यम इत्यादींचे सर्व संदर्भ हे काल्पनिक असून ते फक्त कथेची रोचकता वाढवण्यासाठी वापरले आहेत.)

Related posts:

  1. जीवनगंधाची अनुभूती (लेखकः विनायक) (Film Review)

, , ,

This post was written by:

Reader - who has written 4 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro