मोठ्यांमधील लहानांसाठी 5 अॅनिमेशनपट आणि एक बोनस! (Lists)

Wed, May 20, 2009

Fantastic Lists

सध्या मी एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहे. म्हणजे कसे की अशावेळी नेहमी चमचमीत आवडणारा मी तुमीभा म्हणजे तुप-मीठ-भात खातो; तब्येत आणि मन अशावेळी थोडं हळुवार असतं म्हणून मग धाडधाड रॉक सोडून ईगल्सचं ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ किंवा रहमानचं ‘तू ही रे’ ऐकतो. तर कधी-कधी मूड असा असतो की रात्री उशीरा एखादा मस्त हॉलीवुड किंवा स्टायलीश कोरियन सिनेमा बघण्याऐवजी मी चक्क लवकर झोपतो! थोडक्यात काय तर मी एकदम एक शहाणं बाळ असतो. म्हणजे आईला वाटावं की एकतर चिरंजीव वेडे तरी झाले आहेत किंवा देव तरी पावला.

मला खात्री आहे की आपण सर्वच जण असा मूड कधी कधी एकदम एन्जॉय करतो. चला मग…आज आपण आपल्यातल्या बाळाला मस्त ट्रीट देऊ.

5. वॉल-ई

Wall-E Wall-E 1

पिक्सार म्हणजे क्वालिटी! त्यामुळे त्यांचा वॉल-ई हा चित्रपट त्यांच्या दर्जाला अगदी साजेसा झाला आहे. सर्व-विनाशानंतरच्या पृथ्वीवर प्रामुख्याने घडलेली ही कथा. उदास-भकास असणारे आकाश, कायम नजरेच्या टप्प्यात असणारे क्षितिज, सर्वत्र पसरलेले आणि युद्धभूमिची जाणिव करून देणारे लोखंडी भंगार – ही या कथेची सेटींग. या अशा सेटींगमध्ये आशेचे किरण दोन – एक म्हणजे 700 वर्षे अविरतपणे भंगार-कॉम्प्रेसिंगचे काम करणारा आपला नायक वॉल-ई आणि अजूनही तग धरून असलेले एक हिरवे रोपटे. माणसे सगळी BnL (बाय अॅन्ड लार्ज) या कंपनीच्या एका स्पेसशिपवर आपला इतिहास विसरून जीवन कंठत असतात. हालचाल काहीच नसल्याने म्हणा किंवा त्याची गरज नसल्याने माणसे सगळी फिरत्या खुर्च्यांना खिळलेली…अगदी संवादसुद्धा व्हिडीओ मेसेजिंगद्वारे! स्पेसशिप पुर्णपणे रोबोट-नियंत्रित. अशा वेळी ईव्ह नावाची एक रोबोट पृथ्वीवर जीवनाच्या खाणाखुणा शोधायला पाठवण्यात येते. 700 वर्षांमध्ये माणसांसारख्या भावभावना निर्माण झालेला आपला वॉल-ई या अनाहूत ईव्हच्या प्रेमात पडतो, त्याच्या ईव्हवरील प्रेमामुळे घडत जाणाऱ्या घटनांमुळे माणसांना पुन्हा पृथ्वीचा ‘शोध’ लागतो आणि ते पृथ्वीवर परततात – अशी ही कथा. सुंदर कथा!

4. रॅटॅटुई [Ratatouille]

पिक्सारचाच अजून एक नितांतसुंदर सिनेमा म्हणजे रॅटॅटुई. रॅटॅटुई म्हणजे एक फ्रेंच पदार्थ…याच्या रेसिपीमध्ये रस असणाऱ्यांसाठी ही लिंक.

Ratatouille Dish

या चित्रपटाचा नायक आहे एक उंदीर! या मुषकमहोदयांना उष्टे अन्न आवडत नाही, यांना चवीचे ज्ञान अगाध. बल्लवांची राजधानी असलेल्या पॅरीसला जाऊन यांना वेगवेगळ्या रेसिपी बनवायच्या आहेत…मग त्याचं पॅरीसला येणं, सगळ्यात प्रसिद्ध रेस्तरॉंमध्ये एका पोऱ्याच्या टोपीत बसून पदार्थ तयार करणं वगैरे सगळ्या साहसांची भन्नाट कथा म्हणजे ‘रॅटॅटुई’.

Ratatouille Ratatouille 1 Ratatouille 2

3. मॉन्स्टर्स

या सिनेमात सगळ्यात भारी काय आहे तर याची कल्पना. आपल्या लहानपणी रात्री स्वप्नात वगैरे येऊन आपल्याला घाबरवणारी राक्षसमंडळी (गब्बर, पोलीसमामा वगैरे मंडळी तिकडे नाहीत) यांच्या दुनियेभोवती ही कथा फिरते. या मॉन्स्टरांच्या जगातले इंधन म्हणजे लहानग्यांनी यांना घाबरून फोडलेल्या किंकाळ्या! या किंकाळ्या बाटलीत बंद करून त्यापासून वीज निर्मिती केली जाते. अशा या जगात किंकाळ्या बाटलीत भरून आणणाऱ्यांची एक वेगळी फौजच असते. या फौजेमध्ये सुलीव्हन-माईक जोडगोळी म्हणजे स्टार परफॉर्मर. सुलीव्हनसोबत चुकून एक गोड मुलगी यांच्या जगात येते आणि मग धमाल चालू होते.  सुलीव्हन-माईकला लक्षात येते की छोट्यांच्या किंकाळ्यांपेक्षा त्यांच्या हास्यामध्ये वीजनिर्मिती जास्त होते. शिवाय त्यांच्या बॉसने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापासून कसलाही जंतुसंसर्ग होत नाही. उलट ही मुलगी सुली-माईकला असा काही लळा लावते की तिला वाचवण्यासाठी आणि तिला पुन्हा तिच्या घरी पोचवण्यासाठी या जोडगोळीची धडपड चालू होते. या धडपडीची कथा म्हणजे हा चित्रपट.

Monsters 1 Monsters 3Monsters 2 Monsters

2. आईस-एज

आपल्या मंडळींपासून दुरावलेले एक बाळ, त्याचा फडशा पाडायचाच असा विडा उचलेला वाघ, बाळाला त्याच्या बाबांकडे पोचवायची जबाबदारी गळ्यात पडलेली मॅनी हत्ती आणि सिड स्लोथ यांची जोडगोळी, त्यांना रस्ता दाखवायच्या आमिषाने वाघांच्या जाळ्याकडे घेऊन जाणारा दिएगो वाघ, आणि यांच्या पार्श्वभुमीवर आईस-एजच्या भीतीने दक्षिणेकडे स्थलांतर करणारे समस्त प्राणी – ही थोडक्यात या चित्रपटाची कथा. मनात कपट असणारा दिएगो वाघ बाळाच्या निर्व्याज प्रेमाने हळूहळु माणसाळतो आणि वाघांच्या जाळ्यातून आपल्या नविन मित्रांना वाचवायला मदत करतो. या साऱ्या गदारोळात आपल्या एकमेव ओक-नटला वाचवायचा जीवापाड प्रयत्न करणारी खार ‘सत्या’मधल्या भिकुसारखा भाव खाऊन जाते.

Ice Age Ice Age 1

1. मादागास्कर 1, 2

न्युयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातून पळून जाऊन थेट मादागास्करला पोचलेले मार्टी झेब्रा, अॅलेक्स सिंह, मेलमन जिराफ आणि ग्लोरीया पाणघोडी हे या चित्रपटाचे नायक. याशिवाय अंटार्क्टिकेला चक्क जहाज हायजॅक करून निघालेले चार अफलातून पेंग्विन आणि लेमुरांचा राजा ज्युलीयन या चित्रपटाची खरी शान आहेत. पहील्या भागात मादागास्करला पोचलेले तिघे, अंटार्क्टिकेहून भ्रमनिरास होऊन परत आलेल्या पेंग्विन आणि ज्युलीयनसमवेत अफ्रिकेत क्रॅश लॅन्डींग करतात. तिथे अॅलेक्सला त्याचे आई-वडील भेटतात, मार्टी, मेलमन आणि ग्लोरीयाला त्यांचे भाऊबंद भेटतात वगैरे वगैरे…या सगळ्यांत पेंग्विन आणि ज्युलीयन यांचे दुसऱ्या भागातले संवाद म्हणजे भन्नाट!

Madagascar 3Madagascar Madagascar 1 Madagascar 2

बोनस: ‘स्पिरिटेड अवे’

जपानमध्ये एकुणच कॉमिक्स आणि अॅनिमेशनपट तंत्र आणि हाताळलेल्या विषयांचे वैविध्य यात खूपच प्रगत आहेत. आजकाल  जपानी ‘मंगा’ आणि ‘अॅनिम’आपल्याकडेही सगळ्यांना भुरळ घालत आहेत. जपानमध्ये उत्पन्नाच्याबाबतीत ‘टायटॅनिक’ला मागे टाकणारा, Best Animated Feature चे ऑस्कर मिळवणारा आणि जगभरातील आबालवृद्धांवर मोहिनी घालणारा हा चित्रपट म्हणजे नितांतसुंदर असा कलाविष्कार आहे. रेटींगच द्यायचे असेल तर याला 5 पैकी 7 रेटींग मी आनंदाने देईन.

तुमच्या-आमच्या बालपणी आपल्याला भुरळ पाडणाऱ्या सगळ्या गोष्टी यात आहेत. वाट चुकल्याने आई-वडीलांसोबत एका अद्भुत प्रदेशात पोचलेली शाळकरी शिहीरो, तिथे तिच्या आई-वडीलांना डुकराचे रूप दिल्याने त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी तिने हाकू या मुलाच्या मदतीने केलेले प्रयत्न, तिथे असलेले चित्र-विचित्र प्राणी, आत्मे, चेटकीणी, या साऱ्यांमध्ये वावरतांना दिसलेली तिची परिपक्वता या सगळ्या गोष्टी अॅनिमेटर-दिग्दर्शक मियाझाकीने अशा काही खुबीने मांडल्या आहेत की ‘मी आधी हा सिनेमा का पाहिला नाही?’ अशी भावना हा चित्रपट बघितल्यावर होते.

जपानी असल्याने हा चित्रपट कदाचित तुम्हाला कुठे मिळणार नाही…पण नाराज होऊ नका – यत्र युट्युब, तत्र नो चिंता, नो टेंशन!

या लिंकवर क्लिक करा आणि 10-10 मिनीटांच्या 12 भागात असलेल्या या वन ईन मिलीयन्स सिनेमाचा आनंद घ्या!

Spirited AwayHaku & ChihiroChihiro while entering the other worldChichiro and YubabaChihiro and the HeadsYubaba palaceChihiro with her parentsChihiro and No-Face
ता.क.: पाचांच्या लिस्टची आपली पद्धत असल्याने कुंग फू पांडा, श्रेक, इनक्रेडीबल्स, फाईंडींग नेमो सारखे सिनेमे यांत आले नाहीत. ते मला आवडत नाहीत असा याचा कुणीही अर्थ काढू नये! :)

Related posts:

  1. पाच ‘अॉफ-द-लीग’ चित्रपट (Lists)
  2. मोक्षप्राप्तीसाठी: 5 युद्धपट (Lists)

,

This post was written by:

Oracle - who has written 16 posts on Fantastic Five.


Contact the author

Leave a Reply

Powered By Indic IME
This site is protected by WP-CopyRightPro