३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
लाईट गेले क्षणभरच आणि
झाला एकच कल्लोळ
हॅपी न्यू इयरचा दणदणाट
बाटल्या उघडल्याचे आवाज
अन् चिअर्सचा जल्लोश३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
रंगला गप्पांचा फड
जाग्या झाल्या जुन्या आठवणी
आठवले काॅलेजचे दिवस
ते लबाड्या करून केलेले नाइटआऊट
आणि पै पै जमवून घेतलेल्या बाटल्या३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
रंगली पार्टी, झिंगली सारी प्रजा
रस्त्यावरून झोकात फिरताना
गाडीची काच खाली करून दिल्या आरोळ्या
पोलिस नसल्याचं पाहून
हळूच फेकली एक बाटलीही३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
रस्त्यावरून रमतगमत फिरताना
रस्त्याच्या कडेला बसलेलं होतं
एक हाडकुळं कुत्रं, अंगाचं मुटकुळं करून
गाडीतही मागच्या सीटवर
दोघे पेंगत होते हातपाय जवळ घेऊन३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
भरपूर पिऊन आणि शक्य तेवढं खाऊन
लडखडत्या पावलांनी शोधला एक कोपरा
अन् भडाभड बाहेर पडला सारा जल्लोष
त्याचवेळी ते कुत्रं पाहात होतं आशाळभूतपणे
त्या ऊतू चाललेल्या आनंदाकडे३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
रस्त्यावरचं दिसेल ते शोधत फिरणाऱ्या कुत्र्याकडे
पाहात होते काही डोळे
थोडेसे झुकलेले, थोडेसे काळवंडलेले
अन् साऱ्या जगाला शिव्या घालून घालून थकलेले
अंगाचं मुटकुळं करून थिजून गेलेले३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
एके ठिकाणी होता उधाणता जल्लोष
बाहेर फेकला जाणारा आनंद
अन् एके ठिकाणी होता आक्रोश
फेकण्याऐवजी इकडे टाका म्हणणारा क्षीण आवाज
हॅपी न्यू इयर… आवाज मात्र दोन्हीकडे होते३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
इंडिया आणि भारत एका पातळीवर आले
काही क्षणांपुरते का होईना…
फरक एकच होता,
एक झिंगून लडखडत होता
अन् दुसरा त्राण नसल्यानं…३१ डिसेंबरच्या मध्यरात्री
तेच घडत होतं,
जे घडलं होतं आधीच्या वर्षी
तेच घडत होतं,
जे घडणार होतं पुढच्याही वर्षी
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री…
Related posts:


Leave a Reply